कृष्णेतील मगरींच्या घरट्यांना पावसाचा फटका; घरट्यांच्या सर्वेक्षणाची गरज

    17-Jun-2024   
Total Views |
crocodile


मुंबई (अक्षय मांडवकर) - सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रातील मगरींचा विणीचा हंगाम संपत आला आहे (Krishna river crocodile). मगरीची इवलीशी पिल्ले कृष्णा माईच्या पाण्यात डोक काढताना दिसू लागली आहेत (Krishna river crocodile). यंदाच्या हंगामात मगरींच्या अंदाजे १८ घरट्यांचे निरिक्षण वन्यजीवप्रेमींनी केले आहे. आठवड्याभरात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने काही घरटी पाण्याखाली गेल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले आहे. (Krishna river crocodile)

कृष्णा आणि त्याला येऊन मिळणाऱ्या वारणेसारख्या उपनद्यांमध्ये 'मार्श क्रोकोडाईल' प्रजातीच्या मगरी आढळतात. सांगली शहर आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात मानव-मगर संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली दिसून येते. सद्यस्थितीत वन विभाग आणि स्थानिक वन्यजीवप्रेमी संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळे हा संघर्ष काही अंशी निवळलेला आहे. कृष्णेच्या पात्रातील मिरज, अर्जुनवाड घाट, जुनी धामणी,अंकली, हरिपूर, सांगली, सांगलवाडी, डिग्रज ,पदमाळे, तुंग, वाळवा, डिग्रज, सरनोबतवाडी, ब्रम्हनाळ, चोपडेवाडी, भिलवडी, अंकलखोप आमनापूर, पलूस आणि वारणेच्या पात्रातील समडोळी, कवठेसार, दुधगाव, बागणी भाडोले, शिराळा परिसरातील गावे, बिलाशी ,तांबवे, मोरणा नदीत मगरींचा वावर प्रामुख्याने दिसून येतो. याच ठिकाणी त्यांची घरटी देखील आढळून येतात. या परिसरातील नदीच्या काठाला किंवा शेतजमिनीला लागूनच असलेल्या वाळूमिश्रित मातीमध्ये मगरी घरटी तयार करुन त्यामध्ये अंडी घालतात.

साधारण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मगरी घरट्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेची निश्चित करतात. मार्च-एप्रिल महिन्यात त्यांचे मिलन होते. एप्रिलमध्ये त्या प्रत्यक्षात घरटी बांधतात. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते जून संपेपर्यंत या घरट्यामधून पिल्लं बाहेर येतात. यंदा मगरींच्या साधारण १८ घरट्यांचे निरीक्षण सांगलीतील वन्यजीवप्रेमींनी केल्याची माहिती सांगलीचे मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी दिली. तसेच आठवडाभर झालेल्या पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढली आणि निम्म्याने उघडलेली दोन घरटी पाण्याखाली गेल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदवले आहे. कृष्णा काठच्या मगरींच्या घरट्यांची संख्या अधिक असू शकते, त्यासाठी नियमित सर्वेक्षण करण्याची गरज असून वन विभागाच्या दप्तरी त्याची अधिकृतपणे नोंद असणे देखील आवश्यक आहे.

घरट्यांंवर बिबट्याचाही डोळा
कृष्णा काठच्या मगरींच्या घरट्यांना मानवनिर्मित धोक्यांबरोबर अनेक नैसर्गिक धोके देखील आहेत. यामध्ये उन्हाळ्यातील तापमान वाढ, पावसाळी हंगामात पाण्याच्या पातळीत होणारी वाढ आणि भक्षक अशी काही कारणे आहेत. नदी शेजारील अधिवासांमध्ये राहणारे मुंगूस आणि कोल्हे हे घरटी उकरुन त्यामधील अंडी आणि पिल्लं खात असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्यावर्षी वाळवा भागात बिबट्याने देखील घरटं खोलून त्यामधील मगरीची पिल्लं खाल्याची नोंद करण्यात आली आहे.

वाळू उपशामुळे प्रजननाला बाधा
कृष्णा नदी पात्रात मगरींकडून माणसांवर होणारे हल्ले हे मगरीच्या प्रजनन काळातच झालेले आहेत. त्यासाठी कारणीभूत प्रमुख कारण म्हणजे नदीतील गाळ आणि वाळू उपसा. मगरीचा प्रजननाचा काळ आणि नदीतील वाळू उपसा हे एकाच वेळी सुरू होतात. त्यामुळे मगरींच्या प्रजननात बाधा निर्माण होते. गेली पाच वर्षे वाळू उपसा बंदी झाली, तशी मगरीच्या हल्ल्यात मनुष्यहानी झालेली नाही. - अजितकुमार पाटील, मानद वन्यजीव रक्षक
 
 
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.