कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडे मोफत रेवडी वाटण्यासाठी पैसे संपले; पेट्रोल, डिझेलवर लावला अवाजवी कर
16-Jun-2024
Total Views |
बंगळुरू : काँग्रेसशासित कर्नाटकात राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ केली आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी कर लावला आहे. यासोबतच पेट्रोलचा दरही १०२.८५ रुपये प्रतिलिटर झाला आहे. वृत्तानुसार, कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री कर अनुक्रमे ३ रुपये आणि ३.२० रुपयांनी वाढवला आहे. या आदेशानुसार पेट्रोलवरील विक्रीकर २५.९२% वरून २९.८४% आणि डिझेलवर १४.३४% वरून १८.४४% करण्यात आला आहे.
यानंतर पेट्रोलचा दर ३ रुपयांनी वाढून १०२.८५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचा दर ३.०२ रुपयांनी वाढून ८८.९३ रुपये प्रतिलिटर होईल. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. आतापर्यंत बेंगळुरूमध्ये पेट्रोल ९९.८४ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८५.९३ रुपये प्रति लीटर दराने विकले जात होते, परंतु नवीन आदेशानंतर, वाढलेल्या किंमती तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत.
माहितीनुसार, इंधनाच्या किमती वाढल्याने या आर्थिक वर्षात सुमारे २,५००-२,८०० कोटी रुपये उभारण्यास मदत होईल. काँग्रेस पक्षाने राज्यात सरकार स्थापनेवेळी मोफत सवलतींची हमी जाहीर केली होती, ज्यासाठी अतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी, राज्य सरकारने इंडियन मेड लिकर (आयएमएल) वर सर्व स्लॅबवर २० टक्के अतिरिक्त उत्पादन शुल्क (एईडी) आणि बिअरवर १७५ टक्के एईडी लादले आहे.
त्यासोबतचं कर्नाटकातील राज्य सरकारने नवीन नोंदणीकृत वाहतूक वाहनांवर अतिरिक्त ३ टक्के उपकर लावला. विशेष म्हणजे संपूर्ण देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आाणि केंद्र सरकार प्रयत्न करत असताना कर्नाटकमध्ये मात्र, इलेक्ट्रिक वाहनांवर कर लावला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कर्नाटकमध्ये जनतेचा रोष वाढला आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं सुद्धा या निर्णयावर टीका केली आहे.