यंदा कोकणातून सागरी कासवाची दीड लाख पिल्ले समुद्रात रवाना; 'या' जिल्ह्यात संख्या अधिक

    16-Jun-2024   
Total Views |

sea turtle hatchlings



मुंबई (अक्षय मांडवकर) -
कोकण किनारपट्टीवरुन यंदा समुद्री कासवांची १ लाख ५८ हजार ८७३ पिल्ले (sea turtle hatchlings) समुद्रात सोडण्यात आली आली आहेत. २०२३-२४ सालच्या सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात राज्यातील तीन सागरी जिल्ह्यांमध्ये कासवांची २ हजार ५६६ घरटी आढळली आहेत. पिल्लांची आणि घरट्यांची ही संख्या २०२२-२४ सालच्या हंगामापेक्षा दुप्पट आहे (sea turtle hatchlings). तसेच पिल्लांचा जन्म होण्याचा दरही ६४ टक्के आहे, ज्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. (sea turtle hatchlings)

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमधील काही प्रमुख किनाऱ्यांवर 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या सागरी कासवांची घरटी आढळतात. रायगड जिल्ह्यातील चार, रत्नागिरी जिल्ह्यातील १७ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ किनाऱ्यावर कासव संवर्धनाचे काम होते. यंदाच्या सागरी कासव विणीच्या हंगामात काही काही किनाऱ्यावर पहिल्यांदाच सागरी कासवाची घरटी आढळून आली. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्ये, वरवडे आणि रोहिले किनाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील कासव विणीच्या किनाऱ्यांमध्ये वाढ होऊन ती १७ झाली आहेत. यंदा तीन सागरी जिल्हे मिळून समुद्री कासवांची एकूण २ हजार ५६६ घरटी आढळून आली. त्यामाध्यमातून २ लाख ४६ हजार ६०९ अंड्यांचे संवर्धन करण्यात आले. या अंड्यांमधून बाहेर पडलेल्या १ लाख ५८ हजार, ८७३ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.


सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्मदर अधिक
यंदा कोकण किनारपट्टीवरील जन्मास आलेल्या सागरी कासवांच्या पिल्लांचा जन्म दर हा ६४ टक्के आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तो अधिक आहे. २०१९-२० साली हा जन्म दर ३५ टक्के, २०२०-२१ साली ५७ टक्के आणि २०२१-२२ साली ५८ टक्के आणि २०२२-२३ साली ५५ टक्के होता. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिल्लांचा जन्म दर हा रत्नागिरी आणि रायगड पेक्षा अधिक आहे. यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्री कासवाची १ हजार ६२२ घरटी आढळली. या घरट्यांमध्ये संवर्धित करण्यात आलेल्या १ लाख ५२ हजार ५९३ अड्यांमधून १ लाख ६ हजार ३८० पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील पिल्लांचा जन्म दर हा यंदा ७० टक्के आहे. जो रत्नागिरीमध्ये ५५ टक्के आणि रायगडमध्ये ६५ टक्के आहे. किनारपट्टीवर कासव संवर्धन करण्यासाठी वन विभागाकडून कासव मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. या कासव मित्रांकडून कासवांची अंडी शोधणे, त्यांचा सांभाळ करणे, घरट्यामधून बाहेर पडलेल्या पिल्लांना समुद्रात सोडण्याची जबाबदारी असते.


sea turtle kokan



अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.