हिंदू आहोत म्हणून?

    15-Jun-2024   
Total Views |
terror attack on devotees


दि. ९ जून रोजी जम्मूच्या रियासी येथे शिवखोडी या तीर्थस्थानाहून परत येणार्‍या भाविकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंंतर लागोपाठ जम्मूमध्ये दहशतवाद्यांनी हल्ले केले. त्यानिमित्ताने हिंदूविरोधी, देशविरोधी विघातक शक्तींवर कशी मात करणार? धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही हिंदू म्हणून एकसंध राहण्याशिवाय पर्यायच नाही. या सगळ्याचा मागोवा घेणारा हा लेख...

दोन वर्षांचे बाळ लव्यांश... जम्मू येथील रियासीमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मारले गेले. त्या बाळाचा काय दोष होता? तो हिंदू आईबाबांच्या पोटी जन्माला आला होता हाच? याच हल्ल्यात पाच वर्षांच्या दीक्षाच्या डोक्याला जबर मार लागला आणि तीन वर्षांच्या राघवचा हात तुटला. या हल्ल्यात दहा जण मृत्युमुखी पडले, तर ४२ जण जखमी झाले. देवदर्शन करून आलेल्या भाविकांवर हल्ला करणारे हे दहशतवादी यांचा धर्म, पंथ कोणता, हे मात्र विचारायचे नसते. कारण, म्हणे दहशतवाद्यांना धर्म नसतो. पण, मग या दहशतवाद्यांनी तीर्थक्षेत्री जाणार्‍या भाविकांवरच हल्ला का केला? कारण, सोपंंंं आहे - ज्या बसवर त्यांनी हल्ला केला, त्या बसमध्ये कोण होते, तर वैष्णोदेवी मातेचे दर्शन घेऊन पुढे शिवखोडी या हिंदू धर्मस्थळाचे दर्शन घेणारे हिंदू. यात अल्लाशिवाय कुणीच श्रेष्ठ नाही असे म्हणणारे नक्कीच नसतील, हे या दहशतवाद्यांना साहजिकच ठावूक होते.

एकगठ्ठा हिंदूंना ठार मारायचे त्यांचे नियोजन होते. पण, गोळीबार झाल्यावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. बस दरीत कोसळल्यावरही ते अतिरेकी २०-२५ मिनिटे बसवर गोळ्या झाडतच होते. इतका द्वेष, इतकी क्रूरता? बसमधला प्रत्येक जण मेलाच पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न होता. ही घटना नेमकी त्याचवेळी घडली, ज्या वेळी दिल्लीत नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत होते. त्यानंतर कठुआ, डोडा भागातही अतिरेक्यांनी हल्ले केले. दोन अतिरेक्यांचा खात्मा जवानांनी केला, तर एक सैनिक हुतात्माही झाला. देशासाठी ही खरंच दुःखाची आणि तितकीच संतापाची वेळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार इतकेच नव्हे, तर तमाम भारतीय यावेळी दहशतवाद्यांच्या विरोधातच आहे. या घटनेवरून राहुल गांधी आणि त्यांच्यासारख्याच समविचारी लोकांनी राजकारण सुरू केले. राहुल गांधी म्हणाले की, “भाजपच्या राज्यात ते अतिरेक्यांना पकडू शकत नाहीत.”

त्यांच्या या विधानावरून २०२३ सालचे त्यांचे केंब्रिज विद्यापीठातले भाषण आठवले. सध्या विरोधी पक्षनेते असलेले राहुल त्यावेळी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांसमोर म्हणाले होते की, ”मी जेव्हा भारत जोडो यात्रा करत होतो, तेव्हा माझा सामना दहशतवाद्यांशी झाला. मी त्यांना पाहिले आणि त्यांनीही मला पाहिले. पण, त्यांनी मला काहीच केले नाही. ही ऐकून घेण्याची ताकद आहे.” राहुल गांधी तेव्हा बिनदिक्कतपणे म्हणाले होते की, दहशतवाद्यांनी त्यांना काहीच केले नाही. कारण, त्यांच्याकडे ऐकून घेण्याची ताकद आहे. जे दहशतवादी निरपराध बालकांना, आयाबहिणींना निर्घृृणपणे हत्या करतात, ते दहशतवादी राहुल यांना पाहून शांतपणे निघून गेले. पण, हे विधान सत्य असू शकते. कारण, पाकिस्तानच्या नेत्यांची भारताचा पंतप्रधान म्हणून पहिली पसंती राहुल गांधी यांनाच होती.
 
भारतात नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू नये, असे पाकिस्तान या भिकारड्या राष्ट्रातील नेत्यांना मनोमन वाटत होते. कारण, नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीमध्ये पाकिस्तानचे आर्थिक आणि राजकीय कंबरडे पुरते मोडले आहे. त्यामुळे पाकिस्तानची पहिली पसंती राहुल गांधी हेच होते. तिथल्या नेत्यांनी अनेकवेळा बोलून दाखवले की, भारतामध्ये राहुल गांधी हेच पंतप्रधान व्हायला हवेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, पाकिस्तानचा नावडता व्यक्ती पंतप्रधानपदाची शपथ घेत असतानाच, दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आणि नंतर हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृतच आहे, हे नंतर सिद्धही झाले.

कारण, सैनिकांनी मारलेल्या अतिरेक्यांकडच्या वस्तू याची साक्ष देते. या अतिरेक्यांच्या बॅगेत काय होते तर ३ मॅगजीन (३० राउंड), १ मॅगजीन (२४ राउंड), पॉलीथीन मध्ये ७५ राउंड, ३ जिवंत ग्रेनेड, १ लाख भारतीय करेन्सी (५०० आणि २००च्या नोटा),१ सिरिंज, -४ बॅटरीचे २ पॅक, १ हॅडसेट, ४ कार्बाइन आणि एक एके ४७ आणि पाकिस्तानमध्ये बनवलेले चॉकलेट, चण्याचे पॅकेट, पाकिस्तानमध्ये बनवलेली औषधं, पेन किलरचे इंजेक्शन. हे दहशतवादी पाकिस्तानी होते हे स्पष्टच. त्यांच्याकडे असलेल्या भारतीय चलनाच्या एक लाख रुपयांच्या नोटा बरेच काही सांगून जातात. हे अतिरेकी देशाचे शत्रू तर आहेतच. पण, त्यांना भारताच्या जम्मूमध्ये पोहोचण्यास आणि सुखैनेव राहण्यास मदत करणारे, शिवखोडी इथून येणारी यात्रेकरूंची बस किती वाजता कुठून येणार आहे, याची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी त्या दहशतवाद्यांना मदत करणारे कुणी तरी असेलच ना? ते कोण आहेत? अर्थात, हा केवळ एक प्रश्न आहे. असू शकतात किंवा नसूही शकतात.

पण, कालच अनंतनाग गडोले परिसरात रियाज अहमद भट नावाच्या व्यक्तीचे दोनमजली घर अवैध गतिविधी (रोकथाम) अधिनियम (णअझअ) च्या अंतर्गत छापेमारी करून ते घर ताब्यात घेतले. तसेच रियासी परिसरातील स्थानिक पण संशयास्पद असलेल्या ५० लोकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतिहास पाहता हेच वाटते की, या दहशतवाद्यांना मदत करणारे काही लोक स्थानिक बनूनही राहतात. मागच्याच महिन्यात संबंधित सुरक्षा यंत्रणेने जाहीर केले की, ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर अबु हमजा तसेच पाकिस्तानी सैन्यातील कमांडर आणि आदनू नावाचा एक इसम जम्मू-काश्मीरमध्ये दिसले होते. हे तिघेही देशाबाहेरील. मात्र, घुसखोरी करत ते काश्मीर आणि जम्मूमध्ये आले. यावर वाटते की, इथे आल्यावर त्यांना राहणे, खाणे आणि दैनंदिन व्यवस्था तर कराव्याच लागत असतील. ती व्यवस्था उपलब्ध करून देणारे कोण आहेत? भारतात राहायचे, भारतात खायचे आणि निष्ठा मात्र पाकिस्तानच्या चरणी वाहायची, असे लोकही देशात आहेत. त्यामुळेच ‘टेरर फंडिंग’च्या गुन्ह्यात तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेला इंजिनिअर राशिद हा लोकसभा निवडणुकीत काश्मीरच्या बारामुल्ला मतदारसंघातून निवडून आला.
 
भारताविरोधात दहशतवादी कृत्यात शिक्षा भोगत असलेलाही खासदार झाला. फुटीरतावादी शक्ती विजयी होते. कारण, बहुसंख्य सज्जनशक्तीचे म्हणणे आपल्याला काय करायचे आहे? कुणीही जिंकला तरी आपल्याला काय? या पार्श्वभूमीवर फुटीरतावाद्यांना चांगले माहिती आहे की, सत्तेत यायलाच हवे, तरच राष्ट्र म्हणून एकसंध असलेल्या भारताचे चांगल्या प्रकारे वाटोळे करू शकू. ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. ‘व्होट जिहाद’चे हत्यार त्यांना गवसलंयच म्हणा. या सगळ्या परिक्षेपात काश्मिरी नेत्यांचे आणि इतर नेत्यांचे म्हणणेही असेच काहीसे असते. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला कालपरवा म्हणाले की, ”दहशतवादी हल्ले थांबवायचे असतील, तर पाकिस्तानशी बातचीत संवाद साधणे गरजेचे आहे.” तर मागे काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर म्हणाले होते की ”पाकिस्तानचा सन्मान करा, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे.” थोडक्यात पाकिस्तान म्हटले की, नतमस्मक होणारेे हे नेते. दुसरीकडे काश्मीरमधील ‘कलम ३७०’ हटवून तिथे शांती प्रस्थापित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही केले ते वादातीत आहे. मात्र, काश्मीरला देशापेक्षा वेगळे महत्त्वाचे ठरवणारे ‘कलम ३७०’ पुन्हा लागू करावे. मग, काश्मीरमध्ये फुटीरता पुन्हा सुखैनेव नांदेल, अशा विचारांचे नेतेही आहेतच. काश्मीरचे अब्दुल्ला, गिलानी आणि मुफ्ती कुटुंब आणि काही इतर नेते याच पठडीतले!
 
असो. अभ्यासकांच्या मते, दहशतवाद्यांचा डेरा पिरपंजाल या पर्वतशृंखलेमध्ये आहे. ही पर्वतशृंखला पाकिस्तानपासून काश्मीर, जम्मू ते हिमाचल प्रदेशापर्यंत पसरली आहे. बर्फ वितळू लागला की, अतिरेकी या पर्वतशृंखलेतून घुसखोरी करतात. पूर्वी त्यांचा ठिकाणा काश्मीर होता. मात्र, काश्मीरमध्ये गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने प्रभावी सुरक्षा यंत्रणा राबविली. त्यामुळे काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद्यांना हातपाय पसरता येत नाहीत. त्यामुळे ते जम्मूमध्ये घुसखोरी करत आहेत. दुसरे असे की, काश्मीरमध्ये मुस्लीम बहुसंख्य आहेत. तिथे दहशतवादी हल्ले केले तर लोक दहशतीमुळे काश्मीरला जात नाहीत. त्यामुळे काश्मीरच्या पर्यटनावर परिणाम होतो. यामुळे काश्मीरमध्ये वसलेल्या कौमवाल्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच ढासळते. आपल्या कौमवाल्यांचा विचार करूनही दहशतवादी तिथे सध्या हल्ले करत नाहीत, असे काही लोकांचे म्हणणे, तर जम्मूमध्ये ६० टक्के हिंदू आणि ४० टक्के मुस्लीम आहेत. त्यामुळे इथे दहशतवादी हल्ले करून हिंदूंची मोठ्या प्रमाणात हत्या करता येऊ शकते. तसेच हिंदू-मुस्लीम दंगलही घडवता येऊ शकते. या दंगलीचे लोण भारतभर पोहोेचवून भारताला अस्थिर करण्याचे पाकिस्तानचे षड्यंत्र आहे. अर्थात, भारताच्या सीमेबाहेर शत्रू आहेतच, पण देशांतर्गतही ज्यांची निष्ठा भारताशी नाही, असे छुपे शत्रू आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दहशतवादी सीमेपलीकडून येतात, मात्र देशाच्या सीमेंतर्गत असलेले जे लोक त्यांना मदत करतात आणि समर्थन करतात, ते या सीमेपलीकडच्या दहशतवाद्यांपेक्षाही भयंकर आहेत. दुर्दैैव हेच की, हे शत्रू कोण हे माहिती असूनही भ्याड शांततेचे आणि तितक्याच भ्याड तकलादू सहिष्णूतेचे गोडवे गात आपण बसलो आहोत.

या पार्श्वभूमीवर शिवखोडी काय आहे, हे सांगितले पाहिजे. भस्मासुराने शंकराकडून वर मागितला. त्यानुसार तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो जळून मरणार, हा वर त्यांला मिळाला. पण, भस्मासुर लबाड आणि दुष्ट, कृतघ्न (हे गुण कुणामध्ये आहेत, याचा मागोवा घेतला तर कोण डोळ्यांसमोर येते!) तर अशा भस्मासुराने शंकराच्या डोक्यावर हात ठेवून प्रत्यक्ष शंकरालाच मारण्याचा कट केला. मात्र, शंकरांनी त्याच्या मनातले हेरले. ते शिवखोडी या गुंफेत आले. भस्मासुरही तिथे आला. शंकराने सुंदर स्त्रीचे रूप घेतले आणि नृत्य करू लागले. त्या स्त्रीवर मोहित होत भस्मासुरही तिच्याबरोबर नृत्य करू लागला. नृत्य करता करता त्या स्त्रीने म्हणजे शंकराने हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला. भस्मासुरानेही त्या स्त्रीसारखे स्वतःचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि वर मिळाल्याप्रमाणे तो भस्मसात झाला. शिवखोडीची ही आख्यायिका. देशद्रोही, दहशतवादी आणि त्यांना फूस लावणार्‍या पाकिस्तानचे भस्मासुराचेही असेच होताना दिसत आहे. तरीही, जम्मूमध्ये झालेले ते हल्ले अस्वस्थ करतातच. ‘आईज ऑन रियासी’ म्हणत मेणबत्त्या पेटवत बसायचे की देशाच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही एकसंध हिंदू म्हणून समाजविघातक शक्तींवर विजय मिळवायचा, हे आता आपल्या हातात आहे. जम्मूच्या दहशतवादी हल्ल्यात केवळ हिंदू म्हणून मारल्या गेलेल्या त्या भाविकांना त्यातही त्या दोन वर्षांच्या लव्यांशला हीच खरी श्रद्धांजली!

९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.