दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादक योगिता साळवी यांना ‘इंडियन मीडिया वॉरियर’ पुरस्कार जाहीर

    15-Jun-2024
Total Views |

येगिता साळवी
 
मुंबई :‘नेटवर्क एन3 सत्यमेव न्यूज’ यांच्यावतीने देण्यात येणारा ‘पुरनराव स्मृती सन्मान : इंडियन मीडिया वॉरियर’ हा पुरस्कार दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादक योगिता साळवी यांना जाहीर झाला आहे. सोमवार, दि. 17 जून रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत राजस्थान, जयपूरमधील नारायण सिंह सर्कल येथील पिंक सिटी प्रेस क्लब येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. पत्रकारिता क्षेत्रात अमूल्य कार्य करणार्‍या देशातील 20 पत्रकारांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. त्यांपैकी महाराष्ट्रातून उपसंपादक योगिता साळवी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
राष्ट्रीय सुरक्षा, महिला सक्षमीकरण, सामाजिक समरसता या विषयांच्या अभ्यासक असणार्‍या योगिता साळवी यांच्या पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच दै. ‘मुंबई तरुण भारत’ यांच्यावतीने आयोजित ‘लव्ह जिहाद’ विरोधात घेण्यात येणार्‍या 200 सभापैंकी 194 सभा योगिता साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल्या आहेत. योगिता साळवी यांना आजवर मुंबईमधील ‘महापौर पुरस्कार 2009’, ‘बजाज अलायन्स कंपनी’तर्फे 2012 साली ‘मोस्ट इन्स्पायरेबल वर्किंग वूमन’, ‘लोकगौरव पुरस्कार’, ठाणे येथील ‘समर्थ भारत व्यासपीठ’ यांच्यावतीने ‘समर्थ ‘ती’ पुरस्कार’, यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.