एक धागा धागा जोडते नवा...

    14-Jun-2024   
Total Views | 682
mrunal kulkarni



भरतकामासारख्या अगदी दुर्मीळ कलेला जोपासत त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. जाणून घेऊया लातूरच्या मृणाल उदय कुलकर्णी यांच्याविषयी...

मृणाल उदय कुलकर्णी यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील. वडील दयानंद बाम बँकेत, तर आई गीता या शाळेत मुख्याध्यापिका होत्या. रांगोळी, वाचन, भरतकाम अशा अनेक गोष्टी मृणाल यांनी आईकडून शिकून घेतल्या. महात्मा गांधी विद्यालयातून मृणाल १९८६ साली इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्या. शालेय वयात त्यांना नृत्य, मेहंदी, चित्रकला, रांगोळी अशा अनेक गोष्टींची आवड निर्माण झाली. बॅडमिंटनमध्ये त्यांनी राज्यस्तरापर्यंत शाळेचे प्रतिनिधित्व केले. इयत्ता दहावीनंतर त्यांनी जानकीदेवी बजाज सायन्स कॉलेजमधून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. नृत्य, रांगोळी स्पर्धांमध्येही त्या भाग घेत असत. विज्ञान शाखेतून पदवी मिळविल्यानंतर त्यांनी बिझनेस मॅनेटमेंटचा डिप्लोमा केला. मध्य प्रदेशातल्या देवास इथे राहणार्‍या उदय कुलकर्णी यांच्याशी मृणाल यांचा विवाह झाला.

उदय यांचे वडील नोट प्रेसमध्ये अधिकारी असल्याने, संपूर्ण कुटुंब देवासला राहात होते. विशेष म्हणजे, मृणाल यांना सासरदेखील कलेच्या क्षेत्रात वावरणारे मिळाले. सासूबाई भरतकामासह सितारवादक होत्या. पतीदेखील सितार वाजवतात. देवास हे कुमार गंधर्व यांचे गाव असल्याने, घराघरांत संगीत होते. पुढे काही वर्षांत सासरे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या इच्छेखातर कुलकर्णी कुटुंब लातूर जिल्ह्यातील ’खडक उमरगा’ या मूळ गावी स्थायिक झाले. यावेळी, केमिकल कारखाना आणि कलेची आवड अशा दोन्ही गोष्टींची सांगड मृणाल यांनी घातली. स्थानिक वृत्तपत्रात त्यांच्या मेहेंदीच्या कलाकृती छापून येत असत. दरम्यान, पती उदय यांच्या आत्यांना भरतकामाची विशेष आवड होती. बंगळुरूमध्ये भरतकामाच्या स्पर्धेविषयी मृणाल यांना समजले.

सुरुवातीला त्यांनी ठिपक्यांची रांगोळी बनविली, मात्र स्पर्धेत यश मिळाले नाही. दुसर्‍या वर्षी निसर्ग हा विषय होता. त्यानुसार मृणाल यांनी हरिण आपल्या पाणी पिणार्‍या पिल्लावर लक्ष ठेवत आहे, अशा आशयाचे भरतकाम केले, ज्याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. भरतकाम हा विषय मृणाल यांच्यासाठी अगदी नवीन होता. मात्र, चित्रकला येत असल्याने त्यांना भरतकाम करणे सोपे झाले. मग कापड, सुई, दोरे अशा अनेक गोष्टींची माहिती मृणाल यांनी जाणून घेतली. भरतकामात टाके घातले, तर ते उसवता येत नाहीत. तसे केल्यास कापड फाटण्याची शक्यता असते. थोडक्यात, भरतकामात चुकीला माफी नाही! हळूहळू त्यांनी सराव सुरू केला. उत्साह आणि ऊर्जा वाढत गेली. छोटे टाके, सतत दोरा बदलणे, रंग मिश्रणाचे आव्हान अशा अनेक अडचणी भरतकामात असतात. भरतकामातून मृणाल यांनी चित्रे बनवायला सुरुवात केली.

छोट्या आकारानंतर मोठ्या आकाराची चित्रे त्यांनी साकारली. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, प्रभू श्रीराम अशी अनेक चित्रे त्यांनी कापडावर भरतकामाच्या माध्यमातून काढली आहेत. सध्या भारतमातेची पाच फूट आकाराची प्रतिकृती साकारण्याचे काम गेल्या दहा महिन्यांपासून सुरू आहे. ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी त्या यंदा सप्टेंबरमध्ये विशाखापट्टणमला जाणार आहेत. यावेळी क्रोशियापासून जगातील सर्वात मोठी शाल विणली जाणार आहे. यासाठी ५० जणांची टीम प्रयत्न करणार आहे. हा विक्रम त्या आईला समर्पित करणार आहेत. भरतकामासाठी त्या सर्व साहित्य शक्यतो पुण्याहूनच घेऊन येतात. डोळे, नाक, कान अशा अनेक गोष्टी साकारताना विशेष काळजी घ्यावी लागते. विलासराव देशमुख, वासुदेव कामत, सुनील विश्वकर्मा यांसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या कलेचे कौतुक केले आहे. मृणाल भरतकामाबरोबरच नाटकांसाठी संहितालेखनही करतात. भविष्यात आपल्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या त्या ‘संस्कार भारती’च्या लातूर जिल्हा अध्यक्षा आहेत. शासनाची फेलोशिप घेण्यासाठीदेखील त्या प्रयत्न करत आहेत, जेणेकरून भरतकाम कलेचा प्रचार आणि प्रसार करणे सोयीचे होईल. पुढील काळात आवड असणार्‍यांना ही कला शिकविण्याचीदेखील त्यांची इच्छा आहे.

भरतकामासाठी दररोज किमान तीन तासतरी द्यावे लागतात. एका कलाकृतीला बर्‍याचदा महिनेसुद्धा लागतात. भरतकामाची कला चिरंतन टिकणारी आहे. चित्रासारखी खराब होण्याची शक्यता कमी असते. भरकामाच्या कलाकृतीचे आयुष्यही मोठे असते. भरतकामामुळे मनाची एकाग्रता वाढते. भरतकाम हे चित्रकलेच्या तुलनेत आव्हानात्मक आहे. चित्रकलेला कमी वेळ लागतो, मात्र भरतकामाचे तसे नाही. भरतकामाद्वारे कापडावर चित्रकृती बनविण्यासाठी आवड असणे गरजेचे आहे. यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, असे मृणाल सांगतात. व्यवसाय, सामाजिक कार्य करत भरतकामासारख्या अतिशय दुर्मीळ कलेला जोपासत त्याचा प्रचार - प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणार्‍या, कलाकार मृणाल उदय कुलकर्णी यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने आगामी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा...

७०५८५८९७६७

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.
अग्रलेख
जरुर वाचा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समजून घेणे आवश्यक!, रा.स्व.संघाबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य समजून घेणे आवश्यक!, रा.स्व.संघाबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी?

( Narendra Modi work of the Rashtriya Swayamsevak Sangh ) “बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकींना उपस्थित राहणे माझ्यासाठी आनंददायी होते. आपण देशासाठी समर्पित जीवन जगावे, हे मला रा. स्व. संघाने शिकवले. यावर्षी 100 वर्षे पूर्ण करणार्‍या रा. स्व. संघापेक्षा जगात अन्य दुसरा मोठा स्वयंसेवी संघ नाही.‘आरएसएस’ समजून घेणे सोपे काम नाही, त्याचे कार्य समजून घेणे आवश्यक आहे,” अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत ..