२० जून २०२४ या दिवशी हिंदू कालगणनेनुसार ज्येष्ठ शु. १३ शके १९४६ ही तिथी आहे. अवघ्या हिंदू समाजाचा प्राण आणणारा आमचा शककर्ता राजा, श्रीशिवराय, ठीक ३५० वर्षांपूर्वी याच तिथीला सिंहासनारूढ झाले. अभिषिक्त छत्रपती झाले. त्यामुळे त्या दिवसापासून शिवशक ३५१ ला सुरुवात होत आहे. शिवराज्य हे लोकराज्य कसे होते, याबद्दल ऊहापोह करणारा हा लेख...
’लोकांनी, लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य म्हणजे लोकशाही, हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे उद्गार प्रसिद्धच आहेत. अब्राहम लिंकन १९व्या शतकात अमेरिकेत सरकार चालवत होता. शिवाजी महाराज १७ व्या शतकात भारतात राज्य करत होते. त्यांच्या कालखंडात, जगभरात तीन विशाल साम्राज्ये होती. खुद्द भारतात, भारताचा अर्ध्याहून अधिक भाग व्यापलेले मुघल साम्राज्य होते. याचा राज्यप्रमुख औरंगजेब होता. भारताच्या लगत इराण किंवा पर्शियाचे सफाविद साम्राज्य होते. त्याचा राज्यप्रमुख अब्बास दुसरा हा होता. याच्या पलीकडे फारच विशाल असे तुर्की साम्राज्य-ऑटोमन एम्पायर-पसरलेले होते. त्याचा राज्यप्रमुख महम्मद चौथा किंवा महम्मद-ई-रबी म्हटले जात असे, तो होता. त्यांच्यापलीकडे रशिया, फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड आणि स्पेन ही युरोपीय राष्ट्रे, आपला राज्यविस्तार करण्यासाठी धडपडत होती. पण, असून ती राज्येच होती, साम्राज्ये नव्हती.
अशा त्या १७ व्या शतकातले चौथा महम्मद, दुसरा अब्बास आणि आलमगीर औरंगजेब, हे राज्यप्रमुख म्हणजे अनियंत्रित हुकूमशहा होते. ते म्हणतील तो कायदा होता. ते कुणालाही वजीर बनवू शकत होते, नि कुणाच्याही घरादारावरून गाढवाचा नांगर फिरवू शकत होते. प्रजा, रयत, लोक हे त्यांचे गुलाम होते. लोकांच्या मताला यांच्या कारभारात कवडीची किंमत नव्हती. या उलट शिवरायांच्या राज्यव्यवस्थेत प्राचीन हिंदू न्यायपद्धतीप्रमाणे, म्हणजेच लोकसहभागाने प्रकरणे सोडवली जात असत. कोणतेही प्रकरण प्रथम गावातल्या पंचांसमोर, मग गोत सभेसमोर, मग गरज पडल्यास धर्मसभेसमोर, आणि मग फारच गरज पडल्यास शिवरायांच्या अष्टप्रधानांपैकी न्याय खात्याच्या मंत्र्यांसमोर येत असे. सुरुवातीच्या पुणे जहागिरीच्या कालखंडात, बाल शिवबाराजे स्वतः मातुश्री जिजाऊसाहेब यांच्याबरोबर, किंवा मुख्य कारभारी पंत दादोजी कोंडदेव यांच्याबरोबर न्यायसभेत असून तंटे सोडवत असत. यामुळे ’शिवराज्य’ ही अनियंत्रित हुकूमशाही नसून, ते लोकांना, रयतेला ’आपले’ वाटणारे राज्य होते.
म्हणून, तर आग्य्राहून अतिशय चतुराईने सुटका करून घेऊन शिवराय स्वराज्यात परतल्यावर, त्यांनी आता अभिषिक्त राजा व्हावे, असे सगळ्यांना वाटू लागले. केवळ महाराजांच्या जिवलग साथीदारांना, केवळ जिजाऊ साहेबांनाच नव्हे, तर सर्वसामान्य रयतेलासुद्धा. कारण, अनुभवाने त्यांची खात्री पटली होती की, आदिलशाही, निजामशाही, मोगलाई, तशी ही काही भोसलेशाही नव्हे. हे हिंदवी स्वराज्य आहे. हे रयतेचे राज्य आहे. लोकशाही हा शब्द, मतदानाचा अधिकार वगैरे संकल्पना तेव्हा नव्हत्याच.
ज्येष्ठ शु. १३ शके १५९६ या दिवशी शिवराय सिंहासनारूढ होणार, अभिषिक्त छत्रपती होणार, ही बातमी साधारण सहा महिने आधी म्हणजे शके १५९५ च्या मार्गशीर्ष पौष महिन्यात (डिसेंबर १६७३ - जानेवारी १६७४) प्रथम कानोकानी पसरली. आणि मग तर रायगडावरून कारभारी मंडळींची पत्रेच, गावोगाव रवाना होऊ लागली. गावकामगार म्हणजे गावाचे प्रमुख कारभारी, जे पाटील-कुलकर्णी, देशपांडे त्यांना उद्देशून ही पत्रे असायची. त्यातला मजकूर साधारणपणे असा असे की, ’येत्या ज्येष्ठ महिन्याच्या पहिल्या त्रयोदशीला आपले राजे तख्ती बसत आहेत. तरी या दिवशी गावात मोठा उत्सव करावा. तसेच राज्याभिषेकाच्या कार्यासाठी गावाने मिळून शक्य असेल ते द्यावे. ज्याला जे शक्य असेल, ते खुशीने घेऊन, एकत्र करून रायगजवर धाडावे’. पुढे ताकीदही असे, ’यासाठी कुणावरही कसलीही जबरदस्ती करू नये. साहेबांचे (म्हणणे शिवरायांच्या) मनास येणार नाही’.
आता लोकांना इतका जपणारा राजा असेल, तर लोकांची प्रतिक्रिया काय होईल? लोक आनंदाने वेडे झाले. रायगडाच्या घेर्यातल्या एका धनगराने, एक हंडाभर मध काढून दिला. एका अनाथ म्हातारीने गाडगे भरून गायीचे तूप दिले. एका वैद्याने उत्तमपैकी त्रिफळाचूर्ण आणि च्यवनप्राश ताजा-ताजा बनवून ,रायगडाच्या औषधशाळेत पाठवला. एका गावच्या पाटलाने आणि ग्रामजोशाने काही वर्षांपूर्वी काशीयात्रा केली होती. त्या काळात ही गोष्ट फार अप्रूप होती. काशीहून दोन मोठे हंडे भरून गंगेचे पाणी आणून, त्यांनी जपून ठेवले होते. केव्हातरी रामेश्वराची यात्रा करून ते गंगाजल रामेश्वराला वाहायचे, असा त्यांचा विचार होता. राज्याभिषेक होणार हे कळल्यावर ग्रामजोशी पाटलाला म्हणाला, ’आपला शिवाजी राजा हाच आपला रामेश्वर, आपण हंडे रायगडावर नेऊन दिले, तर ?’ पाटील आनंदून म्हणाला, ’ नुसते नेऊन द्यायचे नाहीत. हंडे पालखीतून मिरवत, गावापासून मिरवणुकीने रायगडापर्यंत नेऊया.’
परमानंद नेवासकर हे शिवरायांचे राजकवी होते. राजांनी त्यांना ’कवींद्र’ असा किताब दिला होता. महाडजवळ पोलादपूर इथे कवींद्रांचा मठ होता. तिथून अनेक उत्तमोत्तम ग्रंथ, पोथ्या कवींद्रांनी रायगडच्या ग्रंथशाळेसाठी पाठवले. समर्थ रामदासांनी कल्याणाला खास शिवरायांसाठी, दासबोधाची नवी प्रत लिहायला बसवले. कल्याणाने बरोबर २० दिवसांत नवी प्रत तयार केली. असा अगदी सामान्यातल्या सामान्य माणसापासून साधुसंतांपर्यंतचा मराठी मुलुख,ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला रायगडाकडे नजर लावून बसला होता. कारण, त्यांचा ’आपला’ अतिशय आवडता राजा, त्या दिवशी अभिषिक्त छत्रपती होणार होता.
आपला नेता, आपले सैन्य
लोकांच्या मनात ही ’आपले’पणाची भावना जो नेता जागृत करू शकतो, तो खरा नेता. आणि असे नेते वेगवेगळ्या काळात जगात सर्वत्र होऊन गेलेले आपल्याला दिसतात. आपण आता पुढच्या शतकाकडे जाऊया. शिवछत्रपती १७ व्या शतकात होऊन गेले. १८ व्या शतकात अमेरिका खंडातल्या मूळच्या युरोपातल्याच, पण स्थलांतरित होऊन अमेरिकेत गेलेल्या लोकांची अस्मिता जागृत झाली. त्यांनी चक्क आपल्या मूळच्या मायदेशाविरुद्ध बंड पुकारून ते जिंकले सुद्धा. हे विजेते लोक वेगवेगळ्या वसाहतींमधले होते. नंतर या वसाहतींची राज्ये म्हणजे स्टेट्स बनली होती. या राज्यांनी एकत्र येऊन, एक राज्यघटना बनवून आपले एक राष्ट्र-नेशन निर्माण केले. म्हणून त्याचे नाव ’युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका’ असे आहे.
कालचक्र आणखी पुढे सरकले. १९वे शतक अर्धे संपले. गुलामगिरीची पद्धत कायद्याने रद्द करावी की, न करावी; या प्रश्नावरून अमेरिकेची उत्तरेकडची राज्ये ,आणि दक्षिणेकडची राज्ये यांच्यातले मतभेद वाढत गेले. शेवटी दक्षिणेकडच्या राज्यांनी आपले वेगळे ’कॉन्फेडरेशन’ बनवून, उत्तरविरुद्ध चक्क सशस्त्र बंड पुकारले. हेच ते १८६१ सालचे प्रख्यात अमेरिकन यादवी युद्ध:
अब्राहम लिंकन, हा यावेळी अमेरिकेचा लोकनियुक्त राष्ट्राध्यक्ष होता. लोकांचे म्हणजे समाजाचे भले कशात आहे, याची लिंकनला पुरेपूर जाणीव होती. आणि लिंकन जो काही निर्णय घेईल, तो आपल्या भल्यासाठीच असेल, याची सर्वसामान्य लोकांना पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे युद्ध चालू असतानाच लिंकनने १८६२ साली गुलामगिरी कायद्याने, अधिकृतपणे रद्द केली. संघर्ष अधिकच तीव्र झाला. पण लोक लिंकनच्या शब्दाखातर काहीही करायला तयार होते. फक्त पुरुषच नव्हे, स्त्रियासुद्धा.
१८६२ सालचे न्यूयॉर्क शहर हे आजच्यासारखे राक्षसी महानगर नव्हते. हडसन नदीच्या काठचे ते एक टूमदार नगर होते. एक दिवस खबर आली की, बंड जोरात पेटले आहे. लिंकनने सार्वत्रिक सैन्यभरतीचे आवाहन केले आहे. तीन दिवसांत एक हजार माणसे इथून वॉशिंग्टनला जायला हवीत. एक हजारांच्या सैन्यासाठी शिकागोहून सामग्रीच्या पेट्या आल्या. एक हजार स्वयंसेवक एका दिवसातच जमले. सामग्रीच्या पेट्यांमध्ये बंदुका, तलवारी, पट्टे, डगले, बूट होते. पण गर्द निळ्या गणवेशाच्या विजारी नव्हत्याच, तारा पाठवण्यात आल्या. सामग्रीच्या पेट्या भरताना शिकागोमध्ये काहीतरी गडबड झाली होती. आता काय करायचे? न्यूयॉर्कचे स्वयंसेवक सैनिक युद्धआघाडीवर जाताना घरच्याच विजारी घालून जाणार? वॉशिंग्टनमध्ये लिंकन जेव्हा हे बघेल, तेव्हा त्याला काय वाटेल?
मारिया गटे ही पोरगी पुढे सरसावली. अवधी १६ वर्षांची ही मारिया एका शिंप्याचीच पोरगी होती. तिने स्वतःच्या हिमतीवर एक हजार विजारी शिवण्यासाठी दोन हजार वार निळा कपडा बाजारातून मिळवला. मग ती बापाला म्हणाली, ’तुम्ही विजारी बेतण्यासाठी पुरुष शिंपी शोधा. मी शिलाई करण्यासाठी महिला शोधते. पुढच्या दोन रात्री आणि एक दिवस, पन्नास पुरुष शिंपी कपडा बेतत होते, नि दोनशे महिलांच्या शिलाई मशिनी अखंड धडधडत होत्या. तिसर्या दिवशी सकाळी ११ वाजता गणवेशाच्या गर्द निळ्या एक हजार विजारी, न्यूयॉर्कच्या पथकाच्या कॅप्टनसमोर हजर झाल्या.
थक्क झालेला तो कॅप्टन मारियाला म्हणाला, ’मुली, तू माझ्याबरोबर वॉशिंग्टनला यायचे आहेस.’ कॅप्टनने मारियाला राष्ट्राध्यक्ष लिंकनसमोर उभे केले. न्यूयॉर्कची एक हजाराची पलटण यांचे गणवेश, मारियाची जिद्द हे सगळे लिंकनला ऐकवले.
मारिया सांगायची, ’ओव्हल ऑफिसमध्ये आपल्या भव्य टेबलामागे बसलेला एल (अब्राहमचे लघुरूप) लिंकन आपल्या सव्वासहा फूट उंचीने उठून उभा राहिला, त्याने इतक्या कौतुकभरल्या नजरेने माझ्याकडे पाहिले की, माझ्या डोक्यावर जणू कौतुकाचा अख्खा ढगच जलवर्षाव करतो आहे, असे मला वाटले. टेबलाच्या बाजूने पुढे आला. आपला भव्य पंजा त्याने माझ्या डोक्यावर ’ठेवला आणि तो मला म्हणाला, ’मुली तू जशी सुंदर आहेस, तसेच तुझे जीवनही सुंदर होवो!
मारिया गटे सर्वसामान्य होती आणि पुढच्या आयुष्यातही सामान्यच राहिली. पण आपण लिंकनला कशा भेटली आणि तो आपल्याला काय म्हणाला, हे सांगताना प्रत्येक वेळी तिचा कंठ दाटून येत असे. असामान्य नेता सामान्य माणसांनाही अलौकिक पराक्रम करण्यास कसा प्रेरणा देतो, त्याचे हे आधुनिक काळातले, जगातल्या सर्वात आधुनिक देशातले उदाहरण आहे.
लोकशाहीची, लोकराज्याची आधुनिक संकल्पना लिंकनने शब्दांत मांडली.
स्वतःच्या जगण्यातून लोकांना तसे जगायला प्रवृत्त केले. शिवरायांनी त्याच्या आधीच दोनशे वर्षे हिंदवी स्वराज्य-सुराज्य-लोकराज्य अस्तित्वात आणले होते. त्यांच्या समकालीन मुघल, सफाविद आणि तुर्क सम्राटांना लोकराज्य म्हणजे काय, याचा पत्तासुद्धा नव्हता, त्या काळात.