"देशातील प्रत्येक जिल्ह्यात स्लीपर सेल तयार करण्याची योजना"; NIA ने दाखल केले इसिसच्या ७ दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र

    14-Jun-2024
Total Views |
 nia
 
नवी दिल्ली : केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या एनआयएने गुरुवार, दि. १३ जून २०२४ रोजी आयएसच्या बेल्लारी मॉड्यूलमध्ये सामील असलेल्या सात दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (आयएस) चे मॉड्यूल नष्ट करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे. एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात या दहशतवाद्यांवर स्लीपर सेल म्हणून काम करण्यासाठी तरुणांना 'मुजाहिदीन' म्हणून भरती आणि कट्टरपंथी बनवल्याचा आरोप आहे.
 
यातील सहा दहशतवाद्यांनी सहआरोपी मोहम्मद सुलेमान उर्फ मिनाजकडून 'बायथ' (निष्ठेची शपथ) घेतली होती. सुलेमानने स्वत:ला गटाचा अमीर घोषित केले होते. एनआयएने म्हटले आहे की २०२५ पर्यंत भारतातील प्रत्येक जिल्ह्यात ५० स्लीपर सेल तयार करण्याचा आयएसचा डाव होता. भारतीय सैनिक, पोलीस आणि धार्मिक संघटनांच्या नेत्यांवर हल्ले करण्यासाठी स्लीपर सेल तयार केले जात होते.
  
 
भारत सरकारविरुद्ध जिहाद पुकारून भारतात खिलाफत व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी स्फोटके तयार करण्यातही आरोपींचा सहभाग होता, असा आरोप एनआयएने आपल्या आरोपपत्रात केला आहे. मोहम्मद सुलेमान उर्फ मिनाज, मोहम्मद मुनिरुद्दीन, सय्यद समीर आणि मोहम्मद मुझम्मील, इक्बाल शेख, मोहम्मद शाहबाज उर्फ झुल्फिकार आणि शायान रहमान उर्फ हुसेन अशी आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आहे.
 
आरोपींवर भारतीय दंड संहिता, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, शस्त्र कायदा आणि स्फोटक द्रव्ये कायद्याच्या विविध कलमांखाली आरोप ठेवण्यात आले आहेत. डिसेंबर २०२३ मध्ये नोंदवलेल्या खटल्याचा तपास करत असलेल्या एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, बेल्लारी मॉड्यूल आयएसच्या फुटीरतावादी आणि हिंसक विचारसरणीपासून प्रेरित होते.
 
  
तपासादरम्यान, एनआयएने स्फोटक साहित्य, शस्त्रे, जिहाद, खिलाफत, आयएससह विविध दहशतवादी संघटनांद्वारे प्रकाशित केलेली मासिके असलेली डिजिटल उपकरणे आणि भारतात इस्लामिक शासन स्थापन करण्यासाठी आयएसचा रोडमॅप ठळक करणारी अनेक दस्तऐवज/डेटा जप्त करण्यात आला. आरोपींनी देशाच्या विविध भागात दहशतवादी हिंसाचार घडवून आणण्यासाठी स्फोटक उपकरणे बनवली होती. आरोपींनी बेल्लारी येथे चाचणी स्फोट घडवून आणला होता, अशी माहिती एनआयएने आरोपपत्रात दिली आहे.