"मैं नरेंद्र दामोरदरदास मोदी, ईश्वरसाक्ष शपथ लेता हूं की..." या शब्दांनी रविवारी राष्ट्रपती भवन दुमदुमलं आणि उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात या घटनेचं स्वागत केलं. नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीसह राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या मंत्रिमंडळानेही शपथ घेतली. यात ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार आणि ३६ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, कालच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली. लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर ही लोकसभेची पहिलीच निवडणूक होती. या निवडणूकीत जवळपास ७४ महिला खासदार निवडून आल्या आहेत. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात किती आणि कोणत्या महिलांना संधी मिळाली आणि त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमी काय आहे, हे जाणून घेऊया.
दि. ९ जून रोजी राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणामध्ये एनडीए सरकारच्या शपथविधीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची शपथ दिली. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत इतिहास रचला. त्यानंतर याठिकाणी ७२ मंत्र्यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, मुरलीधर मोहोळ, प्रतापराव जाधव, रामदास आठवले आणि रक्षा खडसे यांना मंत्रिमंडळात सामील होण्याची संधी मिळाली. पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात ७ महिलांना संधी मिळालीये. यात निर्मला सीतारामन, अन्नपूर्णी देवी, शोभा करंदलाजे, सावित्री ठाकूर, निमूबेन बांभनिया, अनुप्रिया पटेल आणि महाराष्ट्रातून भाजपच्या रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तर या सातही महिला मंत्र्यांविषयीची थोडक्यात माहिती घेऊया.
सर्वात आधी आपण निर्मला सीतारामन यांच्याविषयी जाणून घेऊया. तमिळनाडूतील मदुराई इथे निर्मला सीतारामन यांचा जन्म झाला आणि त्यांनी जेएनयूमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. निर्मला सीतारामन २००६ मध्ये भाजपमध्ये सामील झाल्या आणि २०१० मध्ये त्यांची पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांना पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री म्हणून समाविष्ट करण्यात आलं. निर्मला सीतारामन यांनी पूर्णवेळ अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्री म्हणून काम केलंय. २०१७ ते २०१९ या कालावधीत त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून काम केलं. तर २०१९ ते २०२४ या मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्या अर्थमंत्री राहिलेल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सामील होण्याची संधी मिळालीये.
नव्या मंत्रिमंडळात संधी मिळालेल्या दुसऱ्या कॅबिनेट मंत्री आहेत, अन्नपूर्णा देवी. १९९८ मध्ये अन्नपूर्णा देवी यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रीय जनता दल या पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्या झारखंडमधील कोडरमा इथून लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या सलग पाचवेळा आरजेडीच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात विजयही मिळवला. त्यानंतर आता त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी मिळालीये.
मोदींच्या मंत्रिमंडळात शोभा करंदलाजे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीये. त्या बंगळुरू उत्तर मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. याआधी मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात त्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या. कर्नाटक राज्यात त्या भाजपच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा भाजपशी जवळपास २५ वर्षांचा संबंध आहे. १९७७ मध्ये त्यांनी उडुपी जिल्ह्यातील भाजपच्या महिला मोर्चाचं अध्यक्षपद भुषवलं होतं. त्यानंतर २००० मध्ये त्यांना कर्नाटक राज्यात भाजपचे सचिव बनवण्यात आले. २००८ मध्ये त्यांनी यशवंतपूर विधानसभेतून निवडणूक जिंकली. पुढे २०१२ मध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटक जनता पक्षाची (केजेपी) स्थापना केली होती. त्यानंतर शोभा यांनीही भाजप सोडून केजेपीमध्ये प्रवेश केला. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केजेपी भाजपमध्ये विलीन झाली आणि येडियुरप्पा यांच्यासोबत शोभा करंदलाजे यासुद्धा भाजपमध्ये परतल्या. आता त्यांना राज्यमंत्रीपदाची संधी मिळालीये.
मध्य प्रदेशातील धार लोकसभा मतदारसंघातून दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झालेल्या खासदार सावित्री ठाकूर यांनादेखील मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालंय. खासदार सावित्री ठाकूर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. विशेषत: त्या आदिवासी समाजातून येतात. मुख्य म्हणजे सावित्री ठाकूर यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वबळावर राजकारणात आपलं स्थान निर्माण केलंय. २०१४ मध्ये सावित्री ठाकूर यांना धार लोकसभा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली होती आणि त्या निवडूनही आल्या होत्या. त्यानंतर २०१९ ला त्यांचं तिकीट कापून भाजपने छतरसिंह दरबार यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सावित्री ठाकूर यांना भाजपने संधी दिली. शिवाय निवडणूकीत विजयी झाल्यानंतर आता त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीये.
राज्यमंत्रीपदाची सपथ घेणाऱ्या पाचव्या खासदार म्हणजे निमुबेन जयंतीभाई बांभनिया. निमुबेन बांभनिया या एक सामाजिक कार्यकर्त्या असून गुजरातमधील भावनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. २००८ मध्ये त्या भावनगरच्या महापौर होत्या. याशिवाय त्या गुजरात भाजपच्या अध्यक्षही राहिलेल्या आहेत. आता त्यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय.
अनुप्रिया सिंग पटेल उत्तर प्रदेशमधील एक शिक्षिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या २०१६ पासून अपना दल (सोनेलाल) पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्या मिर्झापूर लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात. २०१६ ते २०१९ या काळात त्या भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्री होत्या. २०१२ मध्ये अनुप्रिया सिंग यांनी अपना दलाच्या वतीने वाराणसीच्या रोहनिया मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर पटेल यांनी २०१४ ची सार्वत्रिक निवडणूक भाजपच्या पाठिंब्यावर लढवली होती. मिर्झापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या अनुप्रिया पटेल यावेळी राज्यमंत्री बनल्या आहेत.
रक्षा खडसे या मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या महाराष्ट्रातील एक युवा खासदार आहेत. त्या २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्या कोथळी गावच्या सरपंच होत्या. त्यानंतर त्या जिल्हापरिषद सदस्यपदी निवडून आल्या. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार मनीष जैन यांचा सव्वातीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्या रावेर मतदारसंघातून पुन्हा निवडून आल्या. रक्षा खडसे या शरद पवार गटाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. यावेळीसुद्धा भाजपने त्यांना रावेर लोकसभेतून उमेदवारी दिली होती. त्यानंतर आता त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
गेल्या २ टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र यांनी महिलांसाठी राबवलेल्या वेगवेगळ्या योजना आणि विविध कायद्यांमधून त्यांनी देशातील महिलांना विशेष सन्मान मिळवून दिलाय. त्यामुळे महिलांचं जीवन अधिक सुकर बनलंय. शिवाय आता मोदींच्या मंत्रिमंडळात महिलांना मिळालेल्या संधीमुळे एकप्रकारे महिलांचं एक वेगळं स्थान निर्माण झालंय. या महिला निश्चितच देशाच्या जडणघडणीत आपला मोलाचा देतील, यात शंका नाही.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....