मुंबई : उबाठा गटाने नाशिकमध्ये काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेस नेते संदीप गुळवे यांनी शनिवारी उबाठा गटात प्रवेश केला आहे. तसेच संदीप गुळवे यांना नाशिक शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
शनिवार, दि. १ जून रोजी शिवसेना भवनात माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते आणि अनंत गीते यांच्या उपस्थितीत संदीप गुळवे यांनी पक्षप्रवेश पार पडला. संदीप गुळवे हे काँग्रेसचे जेष्ठ नेते गोपाळराव गुळवे यांचे पुत्र आहेत. ते २०१२ ते २०१७ या कालावधीत नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य होते. मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. नाशिक जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. नाशिकमधील विविध सहकारी, शिक्षण आणि कृषी संघटनांशी ते निगडीत आहेत.
किशोर दराडे हे नाशिक शिक्षक मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील पक्षाकडून पाठिंब्याची चाचपणी केल्यामुळे 'उबाठा' गटाने त्यांची उमेदवारी कापली आहे. त्यांच्याऐवजी काँग्रेस नेते संदीप गुळवे हे उबाठा गटाचे उमेदवार असतील.