पुणे अपघातानंतर पोलिस आयुक्तांना फोन केला का? काय म्हणाले अजितदादा?
01-Jun-2024
Total Views |
मुंबई : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना फोन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत होता. दरम्यान, आता त्यांनी यावर प्रत्युत्तर दिलं आहे. मी आयुक्तांना फोन केलेला नाही, असे ते म्हणाले आहेत. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "आम्ही सारखे सारखे कॅमेरासमोर येत नाही म्हणजे यात काहीतरी लपवाछपवी सुरु आहे असं अजिबात नाही. विरोधक काय आरोप करावे हा त्यांचा अधिकार आहे. पण ही अपघाताची घटना घडल्यापासून आजपर्यंत जो जो दोषी आढळतो त्याच्यावर कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: पुण्यात आले असून मुख्यमंत्रीदेखील बारकाईने लक्ष देत आहे.
"माझा कार्यकर्ता चुकीचं वागला आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यास मी सांगतो. मी पोलिस आयुक्तांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात वर्षभर फोन करत असतो. परंतू, याप्रकरणात मी त्यांना फोन केलेला नाही. जर मी फोन केला असता तर त्यांना दोषींवर कारवाई करण्यास सांगितलं असतं आणि हे सांगणं लोकप्रतिनिधींचं कामच आहे," असे ते म्हणाले.
या अपघात प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते सुनील टिंगरे यांच्यावरसुद्धा आरोप करण्यात येत आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, "आमदाराच्या भागात एखादी घटना घडली तर त्याला रात्री अपरात्री तिथे जावं लागतं. ही घटना रात्री उशीरा घडली. त्यानंतर सुनील टिंगरे यांना कुणाचातरी फोन आला आणि ते पोलिस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी कुठेही कुणाला पाठीशी घाला असं सांगितलं नाही," असेही ते म्हणाले.