देशात व्होट जिहाद हवे की रामराज्य, हे ठरवण्याची निवडणूक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

    07-May-2024
Total Views |
Narendra Modi On Vote Jihad
 
नवी दिल्ली : देशात व्होट जिहाद हवा की रामराज्य हवे, हे ठरविण्याची ही अतिशय महत्त्वाची लोकसभा निवडणूक आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेश येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील खरगोन आणि धार येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आज भारत इतिहासाच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभा आहे. भारतात व्होट जिहाद सुरू राहणार की रामराज्य सुरू राहणार हे मतदारांनी ठरवायचे आहे. काँग्रेस तुष्टीकरणाच्या दलदलीत इतकी बुडाली आहे की तिला दुसरे काही दिसत नाही. काँग्रेसची सत्ता आल्यास भारतात राहण्याचा पहिला अधिकार त्यांच्या व्होट बँकेला आहे, असे ते म्हणतील.

आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात विरोधकांचा पराभव झाला, दुसऱ्या टप्प्यात विरोधक नेस्तनाबूत झाले आणि आज तिसऱ्या टप्प्यात जे काही उरले आहे तेही नामोहरम होणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.काँग्रेसच्या नकली धर्मनिरपेक्षतेस भारताची मूळ ओळख पुसू देणार नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले, काँग्रेस आणि इंडी आघाडीचे घातक मनसुबे हाणून पाडण्यासाठी आपल्याला ४०० जागा हव्या आहेत. काँग्रेस आणि इंडी आघाडी हताश झाली असून त्यातूनच ते आता मोदी सरकार संविधान बदलणार असल्याचा आरोप करत आहे. मात्र, काँग्रेस आणि इंडी आघाडीनेच देशाचे संविधान आणि संविधानाचे रचनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारंवार अपमान केल आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले आहे.