जीवनपटाचा सुरेल नजराणा‘स्वयें श्रीरामप्रभु ऐकती, कुश-लव रामायण गाती...’ 1955 पासून मंत्रमुग्ध करणार्या स्वरांतून प्रभू श्रीरामाची महती घराघरांत पोहोचविणारे गीतकार, संगीतकार, गायक सुधीर फडके अर्थात बाबूजी आणि कवी ग. दि. माडगूळकर यांनी ‘गीत रामायणा’ या अजरामर कलाकृतीचा अमूल्य ठेवा पुढील कित्येक पिढ्यांना दिला. बाबूजींच्या जीवनावर आधारित संगीतमय चरित्रपट ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ दि. 1 मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झाला. त्यानिमित्ताने...
आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला संवाद साधावा लागतो. पण, जरा एखाद्या व्यक्तीला त्याच्या भावना संवादातून न मांडता संगीत किंवा सुरावटीतून मांडायच्या असतील तर? ते शक्य करून दिलं बाबूजींनी. बाबूजींच्या भावगीतांची मेजवानी संगीत श्रोत्यांना आजही भक्तिरंगात तितकीच तल्लीन करणारी. बालपणापासूनच कानांवर ज्यांच्या सुरांचे संस्कार झाले, त्या बाबूजींच्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चरित्रपटात बाबूजींचं वैयक्तिक जीवन, त्यांचा संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास हा दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी खुबीने मांडला आहे. कलावंताला त्याची कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपार कष्ट सोसावे लागतात. आजवर आपण बाबूजींना ऐकलं आहे. त्यांचं ’जगाच्या पाठीवर’ हे आत्मचरित्रही वाचलं आहे.
पण, त्यांनी सोसलेले कष्ट, गायनासाठी, राष्ट्रासाठी देशभर केलेली वणवण याविषयी फारशी माहिती नसते. पण, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट खरंच बाबूजींसोबत त्यांच्या संगीत प्रवासात घेऊन जातो. चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचे झाल्यास, सुरांशी लहानपणापासून असलेली ओळख वडिलांनी अधिक घट्ट करून देण्यासाठी राम फडके अर्थात सुधीर फडके यांची गाठ वामनराव पाध्येंशी बांधून दिली. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून राम फडके यांचा संगीतप्रवास सुरू झाला. त्यांच्या जीवनात संगीत महत्त्वाचे होतेच, पण त्यासोबतच आपलं कुटुंब, राष्ट्रप्रेमाची भावनादेखील तितकीच प्रखर होती. या चरित्रपटात गायनाच्या कार्यक्रमांसाठी गावोगावी बाबूजी कशी आणि किती भटकंती करीत होते, ते पाहून मन हेलावून जाते. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देशभरातील स्वयंसेवकांनी सुधीर फडके यांना त्यांच्या संगीत प्रवासात कशी वेळोवेळी साथ दिली, याचे चित्रीत केलेले किस्सेही तितकेच रंजक ठरले आहेत.
मुळात बाबूजींच्या या जीवनपटात त्यांच्याच आवाजातील गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळतील, याची पुरेपूर खबरदारी दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी घेतलेली दिसते. हा चित्रपट पाहताना जसे कथानक पुढे सरकत जाते, तसे बाबूजींच्या गाण्यांसाठीच ते ठरावीक प्रसंग लिहिले गेले आहेत, असे जाणवते. कारण, दरवेळी योग्य प्रसंगी अचूक गाणं कानी पडतं आणि संपूर्ण चित्रपट बाबूजींच्या सर्व गीतांची एक सुरेल गोफ आपल्याभोवती विणतो. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी लीलया सांभाळले आहे. बाबूजींच्या संगीताचा आधार घेत दिग्दर्शकाने प्रत्येक प्रसंगी जीवंत केला आहे आणि ते पाहताना प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच, प्रत्येक वयोवृद्ध व्यक्ती चित्रपट पाहताना बाबूजींची गाणी गुणगुणल्याशिवायदेखील राहू शकणार नाही.
योगेश देशपांडे यांचे एक विशेष कौतुक यासाठीही की, बाबूजींच्या जीवनातील ठळक घडामोडी सिनेमॅटिक पद्धतीने मांडताना त्यात कुठेही अतिशयोक्तीचा गंधही नाही. याशिवाय बाबूजींच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग अर्थात दादरा-नगर हवेली मुक्तिसंग्राम, वीर सावरकर चित्रपट आणि गीत रामायण हा सर्व प्रवास उत्तम सादर केला आहे.
गीत रामायण म्हणजे प्रभू श्रीरामालाच वाहिलेली सुरेल स्वरांजली. गदिमांच्या ओळी आणि बाबूजींच्या चालीतून रामभक्तांना रामायणाचे सार उलगडते. प्रभू श्रीरामाचे वर्णन, समर्पण, संयम, मित्रभाव अशा अनेक गुणवैशिष्ट्यांचे वर्णन गीत रामायणाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. शिवाय, त्याकाळी गीत रामायणाचे महाराष्ट्रभर कार्यक्रम कसे झाले? त्याला कोणकोणत्या दिग्गज मंडळी येऊन दाद देऊन गेल्या? याची दिग्दर्शकाने घेतलेली दखलही तितकीच वाखाणण्याजोगी. बाबूजींचे सावरकरांवर किती प्रेम होते? त्यांच्याबद्दल किती आदर होता, श्रद्धा होती, हे देखील चित्रपटातील अनेक प्रसंगांमधून प्रकर्षाने दिसून येते. याशिवाय, संगीत क्षेत्रातील दोन दिग्गज व्यक्ती बाबूजी आणि गदिमांचे मैत्रीबंधातील बारकावेदेखील या चित्रपटात अलगद उलगडले आहेत. तसेच संगीतविश्वातील अन्य दिग्गजांशी बाबूजींचे ऋणानुबंध होते. त्यापैकी काही प्रसंगांचा चित्रपटात कानोसा घेतला असता, तर कथानकाच्या रंजकतेत आणखीन भर पडली असती.
तसेच, महत्त्वाची बाब म्हणजे, दूरदर्शन वाहिनीवरील ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ या मुलाखतीच्या कार्यक्रमाची झलकही या चित्रपटात दिसते. चित्रपटात बाबूजींची तरुण वयातील भूमिका आदिश वैद्य याने अप्रतिम साकारली आहे आणि वयाची चाळीशी उलटल्यानंतरचे बाबूजी अभिनेते आणि गायक सुनील बर्वे यांनी उत्कृष्ट साकारले आहेत. बाबूजींसाठी संगीतप्रेम काय होतं, हे आपल्या अभिनयातून सुनील यांनी प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवले, असे म्हणता येईल. बाबूजींच्या पत्नी ललिताबाई फडके यांची भूमिका मृण्मयी देशपांडे हिनेदेखील छान निभावली आहे. गदिमांच्या भूमिकेतील सागर तळाशीलकर, आशा भोसले यांच्या भूमिकेतील अपूर्वा मोडक, माणिक वर्मा यांच्या भूमिकेतील सुखदा खांडकेकर यांनी त्यांच्या व्यक्तिरेखांना न्याय दिला आहे.
मुळात हा चरित्रपट अधिक मनाला स्पर्शून जातो, तो चित्रपटातील गीतांमुळे.. कारण, प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याच दिग्गज कलाकारांच्या आवाजातील गीते ऐकायला मिळतील. शिवाय, ती रेकॉर्ड कशी झाली असतील, याचं चित्रीकरणही अनुभवता येईल. बाबूजी म्हणजे गीत रामायण, बाबूजी म्हणजे भावगीत, बाबूजी म्हणजे वीर सावरकर चित्रपट, बाबूजी म्हणजे कुटुंबाप्रति वात्सल्य असलेले व्यक्तिमत्त्व, बाबूजी म्हणजे एक निस्सिम राष्ट्रभक्त ही बाबूजींची सर्व वलयं आणि स्वभाव वैशिष्ट्ये या चरित्रपटात उत्तमरित्या दाखवण्यात आली आहेत. भावगीत आणि गीत रामायणाचा हा अनोखा नजराणा संगीतश्रोत्यांना देऊ करणार्या बाबूजींना शतश: नमन!
रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.