‘वर्किंग वुमन’ कोमात, मोलकरीण जोमात!

Total Views | 105

Nach Ga Ghuma 
 
 
रसिका शिंदे-पॉल 
 
सध्या परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. विशेषत: स्त्री वर्ग पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटगृहाकडे वळला आहे. यापूर्वी केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने तो चमत्कार करुन दाखवला होता; ज्यात सर्व वयोगटांतील स्त्रिया एकत्रित चित्रपटगृहांत जाऊन स्वत:चं जीवन त्या चित्रपटाच्या माध्यमातून जगत होत्या. आता ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने ‘वर्किंग वुमन’ आणि तिचा तिसरा हात म्हणजे मोलकरीण बाई यांच्या नातेसंबंधांवर आणि त्यांच्या आव्हानांवर भाष्य करणारा ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाविषयी...
 
भालजी पेंढारकर यांची कन्या माधवी देसाई यांनी ‘नाच गं घुमा’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांचं जीवन आणि एकूणच विवाहित स्त्रीचे आयुष्य पुस्तकरुपाने मांडले. ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात दिग्दर्शक-लेखक परेश मोकाशी आणि लेखिका-निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी यांनी दोन ‘वर्किंग वुमन’ अर्थात एक जिचा सहा किंवा सात आकडी पगार आहे अशी स्त्री आणि दुसरी जी सहा-सात घरांमध्ये जाऊन मोलकरीण म्हणून काम करते, अशा दोन विविध कामं करणार्‍या स्त्रीवर्गाचे आयुष्य या चित्रपटाच्या माध्यमातून मांडले आहे. चित्रपटाचे कथानक राणी अर्थात मुक्ता बर्वे, जी बँकेत नोकरी करते, तिचा नवरा सारंग साठ्ये, तोही एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करतो आणि या दोघांची एक चिमुकली मुलगी म्हणजे सहा वर्षांची सायली अर्थात मायरा वायकुळ. दोघेही नवरा-बायको कमावते असल्यामुळे घरकामासाठी साहजिकच मोलकरीण. आशाताई अर्थात नम्रता संभेराव केवळ त्यांचं घरकाम करत नाही, तर 12 तास तिच्या मुलीलादेखील सांभाळते. पण, ‘वर्किंग वुमन’ असल्यामुळे मोलकरणीच्या रोज कामावर उशिरा येण्याच्या सवयीमुळे राणीला कसा त्रास होतो, त्याचा काय दुष्परिणाम होतो, अशी एक कथाओळ या चित्रपटाची आहे.
 
परेश मोकाशी यांची दिग्दर्शन आणि लिखाणाची एक स्वतंत्र शैली आहे, जी त्यांनी याआधी ‘एलिझाबेथ एकादशी’ असो किंवा मग ‘चि व चि.सौ.कां’ असो, या चित्रपटांतून दाखवून दिली. विषय जरी गंभीर किंवा सामान्य माणसांच्या घरातला असला तरीही तो सहजरित्या विनोदी अंगाने कसा सादर करता येईल, याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्यांनी ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या माध्यमातून यशस्वीरित्या केला आहे. एका स्त्रीचं जीवन हे समोरच्या व्यक्तीला जरी एका लहान गोष्टीभोवती फिरत आहे, असं वाटत असलं तरी तिच्यासाठी ते एकं मोठं युद्धचं असतं, जे तिला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचं असतं. या चित्रपटात ‘वर्किंग वुमन’साठी मोलकरीण हा फार जिव्हाळ्याचा आणि गंभीर विषय आहे, हे दाखवले असून, जर मदतीला मोलकरीण नसेल, तर महिलेने एकटीने घर कसं सांभाळायचं, जेवण, मुलांच्या आवडी-निवडी, घरातल्या इतरांचे हट्ट कसे पूर्ण करायचे, हा अतिशय मोठा प्रश्न तिच्यासमोर रोज सकाळी आ वासून उभा असतो. याची जाणीव हा चित्रपट प्रकर्षाने करुन देतो. विशेष म्हणजे, खरोखरीच ऑफिसला जाणारी आणि जिच्या घरी मोलकरीण आहे, अशी प्रत्येक स्त्री स्वत:ला राणी आणि आशाताईमध्ये बघेल, याची विशेष काळजी लिखाणातून आणि दिग्दर्शनातून मोकाशी यांनी घेतलेली दिसते. शिवाय, राणी बँकेत काम करत असल्यामुळे बँकेतील कर्मचारी काम कमी आणि इतर कामं काय आणि कशी करतात, याची हलकी अगदी नकळत झलकदेखील त्यांनी दाखवली आहे. म्हणजे नेमकं काय? यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.
 
आपल्या घरातील सर्व घरकामं करून, आपल्या मुलाला शेजार्‍यांच्या विश्वासावर ठेवून तिसर्‍यांच्याच घरचं काम करणं, त्यांच्या मुलांना सांभाळणं सोप्पं नसतं. पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून मोलकरणींचं काम कसं असतं? त्यांचं वैयक्तिक जीवन कसं असतं? हे या चित्रपटात दाखवल्यामुळे एक माणूस म्हणून मोलकरीण किंवा घरकाम करणार्‍या प्रत्येक माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. पण, या चित्रपटात मोलकरीण मिळत नसल्यामुळे ‘वर्किंग वुमन’ला होणारा त्रासच अधिक दाखवला असून, मोलकरणींचं जीवन अगदी थोडक्यात न दाखवता थोडं अधिक दाखवलं असतं, तर मनाला ते जास्त भिडलं असतं आणि कथा अधिक रंजक वाटली असती. ते म्हणतात ना, चांगली मोलकरीण मिळणं म्हणजे नशीब फार बलवत्तर असावं लागतं. पण, चांगली मोलकरीण मिळण्यासाठी आपणही त्यांची मालकीण म्हणून कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? याची शिकवणही हा चित्रपट नकळतपणे देऊन जातो. शिवाय, पुरुषवर्गाला एक स्त्री एकावेळेस किती ‘मल्टिटास्किंग’ करू शकते, याची जाणीवदेखील करून जाते. चित्रपटातील पार्श्वसंगीत टिपीकल गाण्यांच्या चालीला भेदणारे असून ‘ऑपरा’ संगीताचा थोडा समावेश करत थोडा ‘ड्रॅमॅटिक इफेक्ट’ देण्याचा प्रयत्न भावतो. चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, मुक्ता बर्वे हिने पुन्हा एकदा ती का एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे, हे दाखवून दिले आहे. शिवाय, नम्रता संभेराव हिने मोलकरणींचे प्रतिनिधित्व आपल्या अभिनयातून उत्तम साकारले आहे. याशिवाय मायरा वायकुळ, सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे.
 
’नाच गं घुमा’ हा चित्रपट कुठलंही काम करणार्‍या व्यक्तीला कधी गृहित धरू नका, त्यांच्या अडचणीदेखील समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि मुळात संयम ठेवायला शिका, हे नक्कीच शिकवून जातो. एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीचं दु:ख समजू शकते, ही म्हण खर्‍या अर्थाने परिपूर्ण करणारा असा ’नाच गं घुमा’ चित्रपट नक्कीच बघण्यासारखा आहे, असे म्हणावे लागेल.
 
चित्रपट : नाच गं घुमा
दिग्दर्शक : परेश मोकाशी
कलाकार : मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव,
मायरा वायकुळ, सारंग साठ्ये,
सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत
रेटिंग : ⭐⭐⭐
 
 
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई मेट्रो-३

मुंबई मेट्रो-३ 'बीकेसी ते आचार्य अत्रे' मार्गाचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे' मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, वरळी अशा टप्पा २ अच्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार, आज दि.९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो ३च्या या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानकापर्यंत मेट्रोने ..

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

मसूद अजहरचा भाऊ जैशचा दहशतवादी अब्दुल रौफ अझहर ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ठार!

पहलगाम हल्ल्या नंतर भारताने पाकिस्तानी दहशतवाद्यांना जबरदस्त उत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ पूर्ण केले. दि. ७ मे रोजी रात्री १ वाजून ४ मिनिटांनी ते दीड वाजताच्या दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाले. भारतीय दलांनी पाकिस्तानमध्ये बहावलपूर आणि मुरीदके येथे हल्ले केले आणि जैश आणि लष्करचे मुख्यालय उद्ध्वस्त केले. कित्येक वर्षांपासून या दोन्ही दहशतवादी संघटना सातत्याने भारताविरोधात कारवाया करत आहेत. हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद प्रमूख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर जो जैश-ए-मोहम्मदचा ऑपरेशनल प्रमुख आणि आयसी-८१४ अपहरणाचा मास्टरमाइ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121