काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, “इंडिया आघाडीच दि. ४ जून रोजी सत्तेवर येणार असून, त्यानंतर ४८ तासांच्या आत पंतप्रधान कोण होणार, याचा निर्णय घेतला जाईल. एवढेच नाही, तर आणखीन काही पक्ष दि. ४ जूननंतर ‘इंडी’ आघाडीमध्ये सामील होतील,” असे भाकीतही रमेश यांनी केले. आता यास रमेश यांचा विजयाबद्दल आत्मविश्वास म्हणायचे की पराभवाचे भय लपविण्यासाठी उगाच केलेला अतिशयोक्तीपूर्ण दावा, हाच खरा प्रश्न. एवढेच नाही, तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेही ‘इंडी’ आघाडीला २७५ पेक्षा अधिक जागा मिळणार, अशी घोषणा करून मोकळे झाले. तसेच ‘इंडी’ आघाडीतील प्रत्येक पक्ष आणि नेताही जणू आपला विजय अटळ आहे, याच धुंदीत वक्तव्य करताना दिसतो. विजयापूर्वीच इतका उन्माद असेल, तर अशा मंडळींच्या हातात बहुमताचा आकडा दुर्दैवाने आलाच, तर काय अराजक माजेल, याची कल्पना न केलेलीच बरी! तर अशा या अराजकवाद्यांनी ४८ तासांत पंतप्रधानपदाचा चेहरा ठरविण्याची भाषा केली. म्हणजे, या कडबोळ्याच्या सरकारचे आणि पर्यायाने देशाचे नेतृत्व कोणी करायचे, हे ठरविण्यासाठीसुद्धा यांना ४८ तासांचा अवधी हवा. ४८ तासांनंतरही खरेतर ही स्वार्थी आणि सत्तालोलुप मंडळी पंतप्रधान म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतील, याची शाश्वती नाहीच. पण, यापैकी काहीएक होणे नाही. कारण, प्रारंभीपासूनच खरोखरच विजयाचा इतका पक्का आत्मविश्वास असता, तर ४८ दिवसांपूर्वीच आपला नेता कोण, यावर ‘इंडी’ आघाडीने विचारमंथन केले असते. पण, मुळातच ही आघाडी केवळ एक राजकीय अपरिहार्यता. आणि ज्यांना स्वतःच्याच विजयाची ‘गॅरेंटी’ नाही, त्यांची देशाची ‘गॅरेंटी’ घेण्याची क्षमताच नाही. त्यातच काँग्रेसच्या नीती-धोरणांमुळेच ‘इंडी’ आघाडी जिंकेल आणि जो पक्ष जास्त जागा जिंकेल, तोच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील दावेदार असेल, असेही सांगायला जयराम रमेश विसरले नाहीत. आता साहजिकच ५४३ पैकी ३१८ जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आघाडीतील काँग्रेस हाच मोठा पक्ष. पण, तरीही आपल्याला बहुमताचा जादुई आकडा गाठता येणे अशक्य असल्याची पुरती जाणीव काँग्रेसला आहे. म्हणूनच वाटाघाटी आणि मंथनासाठीचा हा ४८ तासांचा पोरखेळ. पण, पंतप्रधान कोण होणार ही ठरविण्याची वेळच ‘इंडी’वर येणार नाही, हे निश्चित!
४८ तासांचे मनन
एकीकडे विरोधकांना विजयानंतर पंतप्रधानपदाचा चेहरा ठरविण्यासाठी ४८ तासांचा अवधी हवा आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद शिला स्मारकात गुरुवारपासून ४८ तास ध्यानस्थ होते. म्हणजे एकीकडे सत्तेचा सोपान कोण चढणार, म्हणून ४८ तास खल करण्याच्या तयारीत असणारे नेते आणि दुसरीकडे देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चिंतन-मनन करणारा मोदींसारखा राष्ट्रनेता... असे हे देशाच्या राजकारणातील दोन परस्पर विरोधी ध्रुव... आज लोकसभा निवडणुकीसाठी आठ राज्यांतील एकूण ५७ मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर लगेचच संध्याकाळी ‘एक्झिट पोल’च्या अंदाजांनी मुख्य माध्यमांसह सोशल मीडियावरही चर्चेचा धुरळा उडेल. तत्पूर्वी मोदींनी यंदा स्वामी विवेकानंदांनी जेथे ध्यान केले होते, त्या कन्याकुमारीची निवड केली. पण, भगव्या वस्त्रातील ध्यानस्थ मोदींची प्रतिमा बघूनच ‘इंडी’ आघाडीतील नेत्यांनी आचारसंहिता भंग झाल्याची राळ उठविली. असेही मोदी या ‘इंडी’ आघाडीतील नेत्यांना रूचत नाहीत, त्यात भगवेधारी मोदी बघून तर ममतांसारख्या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना रागही अनावर होतो. आपल्या वाट्याची हिंदूंची मतेही आता या ध्यानधारणेमुळे भाजपच्या पारड्यात पडतील, ही भीती या नेत्यांना सतविते. परंतु, त्यात अजिबात तथ्य नाही. कारण, मोदी अमूक एका स्थळी, अमूक एका मंदिरात गेल्यामुळे हिंदू बांधव त्यांना मतदान करतील, असे नाही. आणि मोदींना यातून मतदानाचे गणित साधण्याचीही आवश्यकता नाही. तसे असते, तर कन्याकुमारीऐवजी त्यांनी पंजाबमधील एखाद्या अध्यात्मिक स्थळाचा विचार केला असता. कारण, आजच्या शेवटच्या टप्प्यातील सर्वाधिक १३ जागा या एकट्या पंजाबमध्ये आहेत. पण, ज्या तामिळनाडूमध्ये पहिल्याच टप्प्यात मतदान पार पडले, त्या तामिळनाडूतील कन्याकुमारीची मोदींनी निवड केली. २०१९ साली लोकसभा निवडणुकीनंतर मोदी केदारनाथच्या गुहेत ध्यानस्थ झाले होते. यंदा त्यांनी दक्षिण भारताची निवड केली. आपल्या कृतीतून योग्य तो संदेश देण्याचा मोदींचा हातखंडा. आधी ‘काशी ते तमिळ संगम’ हा उत्तर-दक्षिण भारताला जोडणारा कार्यक्रम आणि आता केदारनाथपासून ते कन्याकुमारीत ध्यानसाधना. भारत तोडू पाहणार्या शक्तींनाच मोदींनी आपल्या ध्यानसाधनेतून एकही शब्द न बोलता दिलेले असे हे चोख प्रत्युत्तर!