शोध अहिल्याबाईंचा...

    30-May-2024
Total Views |
Ahilyabai Holkar Personality


अहिल्याबाई होळकर म्हणजे इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्त्व. भारताच्या मध्यकालीन इतिहासात थोरले राजे छत्रपती शिवराय आणि नंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर ही दोन राज्यकर्ती व्यक्तिमत्त्वे अतिशय वेगळी होती, महत्त्वपूर्ण होती. त्या काळात राजेशाही असली, तरी लोकशाहीतल्या भारतीय राज्यघटनेतील लोककल्याणकारी राज्याची (welfare state) संकल्पना, दोघांनीही आपल्या शासनातून आणि प्रशासनातून प्रत्यक्षात उतरविली होती. आधुनिक काळातल्या लोकतंत्राची त्यांना जाणीव होती आणि राज्यव्यवहारातील अनेक पातळ्यांवर तर्कशुद्ध आणि लोकाभिमुख कार्यपद्धती राबवून, अद्वितीय वैचारिक प्रतिभेने काळाच्याही पुढे विचार करण्याचे दूरदर्शित्व आपल्याकडे आहे, हे त्यांनी आपल्या कृतीने आणि कर्तृत्वाने सिद्ध केले. आज दि. 31 मे पासून सुरु होणार्‍या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्तच्या या विशेषांकात अहिल्याबाईंचा शोध घेणारा हा अभ्यासपूर्ण लेख...

 
त्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्याबाई यांच्यात एक महत्त्वाचे साम्य आहे. दोघेही योगी प्रवृत्तीचे होते. छत्रपती शिवाजी महाराज सकलजनप्रतिपालक श्रीमंत योगी होते. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ अशा ईश्वरी अधिष्ठानाच्या पायावर त्यांनी स्वराज्याची उभारणी केली. अहिल्याबाईंनीही ‘कर्मयोगिनी’ प्रवृत्तीने श्रीशंकराच्या नावाने 28 वर्षे राज्यकारभार सांभाळला. छत्रपती शिवरायांचा वारसा अहिल्याबाईंनी पुढे चालवला. त्यात मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अहिल्याबाईंचा काळ हा माधवराव पेशव्यांच्या समकालीन. उत्तरेत महाराष्ट्राच्या बाहेर माळव्यातल्या इंदूरच्या आपल्या संस्थानात, त्यांनी आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवला. मल्हाररावांनी स्थापन केलेल्या आपल्या छोट्या राज्याला, सुजलाम् सुफलाम् करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. अहिल्याबाईंच्या राजकीय कारकिर्दीचे मूल्यमापन करताना, ‘एक धार्मिक प्रवृत्तीची राज्यकर्ती स्त्री’ असा एक विचारप्रवाह सर्वसाधारणत: दिसून येतो. धार्मिकता हा अहिल्याबाईंच्या व्यक्तिगत जीवनाचा महत्त्वाचा भाग होता, यात संदेह नाही. परंतु, या बाबीचा विचार एका वेगळ्या पद्धतीने करणे आवश्यक आहे. धार्मिकता आणि सात्त्विकता हे दोन गुणविशेष वेगवेगळे आहेत. अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्त्व व्यापून उरणारी बाब म्हणजे, त्यांची अंतर्बाह्य सात्त्विकता. ही सात्त्विकता आध्यात्मिकतेशी अधिक जवळची आहे.

प्रत्येक धार्मिक व्यक्ती सात्त्विक असेलच असे नाही आणि आध्यात्मिकतेला आणि सात्त्विकतेला धार्मिक असण्याची गरज नाही. तसेच नैतिकता धार्मिकतेशी संबंधित असेलच असे ठामपणे म्हणता येणार नाही. कारण, काही कर्मठ, सनातनी आणि धार्मिकतेचे प्रतिनिधित्व करणारे तथाकथित अनेक धर्ममार्तंड, नैतिकतेच्याच नव्हे, तर माणुसकीच्या वाटेपासूनही सहस्र योजने दूर असतात, हे इतिहासात अनेकदा सिद्ध झाले आहे. या कर्मठपणाचा अनुभव ज्ञानदेवादी भावंडांना आला, तुकोबारायांना आला आणि हाच अनुभव शिवाजी महाराजांनाही आला. अहिल्याबाईंच्या धर्मपरायणतेला, दानधर्माला अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला. ग्रँट डफ, रियासतकार गो. स. सरदेसाई, जदुनाथ सरकार आदी त्यांच्या धर्मकृत्याबद्दलचे मत फारसे अनुकूल नाही. अहिल्याबाईंनी धार्मिक कामात पैसा खर्च करण्याऐवजी, सैन्य उभारून राज्यविस्तार आणि देशरक्षणावर अधिक द्रव्य खर्च करावयास हवे होते, असे त्यांना वाटते. मध्य प्रांताचा गव्हर्नर सर जॉन माल्कम याचेही आरंभी तसेच मत होते. याबाबतीत विचार करता असे निदर्शनाला येते की, अहिल्याबाईंनी दानधर्मात व सत्कृत्यात जो पैसा खर्च केला, त्याच्या दुप्पट पैसा जरी सैन्य वाढविण्यात व राज्यविस्तार करण्यात खर्च केला असता, तरी 28 वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत प्रजेस शांतता व सौख्य लाभले, ते मुळीच लाभले नसते. नंतरच्या काळात विविध लोकांशी विचारविनिमय केल्यावर माल्कमचेही मतपरिवर्तन झाले आणि ‘अहिल्याबाई पूजनीय वाटते, ती कल्याणकारी धर्मकृत्यामुळेच’ असे तात्पर्य त्याने काढले. अन्य इतिहासकार आणि अहिल्याबाईंचे चरित्रकारही, तिच्या या कल्याणकारी धार्मिक भूमिकेचे विविध अंगांनी समर्थन करतात.

त्यांची ही भूमिका आध्यात्मिकतेशी निगडित आहे. या आध्यात्मिकतेशी संबंधित आहे नैतिकतेचे दृढ अधिष्ठान, आंतरिक सात्त्विकता, माणुसकीचा ओलावा, शाश्वत मानवी मूल्यांची आंतरिक ओढ आणि सत्कार्याची अखंड जाणीव. अहिल्याबाईंच्या ठायी ही आध्यात्मिक वृत्ती होती, म्हणूनच लोकांचे सर्वतोपरी कल्याण, प्रजेचे सुख हा एकच निकष त्यांच्या 28 वर्षांच्या राज्यकारभाराला यथार्थपणे लागू पडतो. अहिल्याबाईंनी केलेल्या विविध ठिकाणच्या लोककल्याणकारी कामांना, आणखी एक पदर आहे. त्यांनी महाशिवरात्रीला कावडीने गंगेचे पाणी गुजरात, पंढरपूर, नाशिक, उदयपूर, उज्जैन, ओडिशा, नेपाळ, मद्रास, कारवार, रामेश्वर, निजाम स्टेट इत्यादी ठिकाणी नेण्याची पद्धत सुरू केली. ही सर्व स्थाने, हिंदूंची प्रमुख धार्मिक केंद्रे होती. यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी धर्माला आधार दिला. पण, अहिल्याबाईंनी गंगेच्या पाण्याद्वारे प्रांताप्रांतांत विखुरलेला भारत, एकत्र जोडण्याचे काम केले. या विचाराला भगिनी निवेदिता यांनी ‘The web of Indian Life‘ आणि श्री. मुखर्जी यांनी ‘Fundamental Unity of India‘ या आपल्या ग्रंथांमधून पुष्टी दिली आहे. भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या विभागला गेलेला भारत, अहिल्याबाईंनी कुठलीही सक्ती किंवा शस्त्रबळाचा वापर न करता, एकसंध करण्यात यश मिळविले. अहिल्याबाईंच्या धार्मिकतेवर टीका करणार्‍या इतिहासकारांना या ऐतिहासिक पैलूची जाणीव नसावी, ही खेदाची गोष्ट आहे.

खरंतर अहिल्याबाईंकडे राज्य होतं, संपत्ती होती, फौज होती. सर्व वैभव आणि सत्ता असूनही, आपल्या आत्मबळाच्या जोरावर त्यांनी उपभोगशून्य प्रवृत्तीने जीवन व्यतीत केलं. त्याकाळी अनेक राजे, सम्राट प्रजेला लुटून आलिशान राजमहालात चैनविलासात राहत होते. विलासी जीवन जगत होते. अहिल्याबाईंवर या आणि इतर आलेल्या प्रलोभनांचा काहीही परिणाम झाला नाही. आपल्यासमोर त्यांनी जो एक उत्तुंग आदर्श ठेवला होता, त्यापासून त्या किंचितही ढळल्या नाहीत. होळकरशाहीचे अभ्यासक वा. वा. ठाकूर म्हणतात, “ज्यावेळी इंग्रज, फ्रेंच हे परकीय लोक, मराठे, राजपूत, जाट, बुंदेले, रोहिले, पठाण हे आपसांतील लढ्यांमध्ये मग्न होऊन सर्व देशात कलह आणि मत्सर यांचे पीक पिकवित होते, त्यावेळी अहिल्याबाई अखिल देशात गोरगरिबांच्या चरितार्थाचे साधन व बंधुप्रेमाचे बीज पेरित होत्या.”

विनोबांनी अहिल्याबाईंविषयी लिहिताना म्हटलंय, “अहिल्याबाईंच्या बाबतीतली मोरोपंत, अनंतफंदी यांची कविवर्णनं अतिशयोक्त नाहीत. भारतीय इतिहासात अहिल्याबाईंचं राज्य हा एक अनोखा प्रयोग होता. राज्यकार्याची धुरा एका उपासना-परायण, धर्मनिष्ठ स्त्रीच्या हाती आली होती. अहिल्याबाई न्यायधर्मनिष्ठ होती. ज्या स्त्रिया निवृत्तीनिष्ठ असतात, त्या राज्यकारभार चालवू शकतील, ही बाब कल्पनातीत वाटत होती. पण, मराठ्यांच्या इतिहासात असा प्रयोग करण्यात आला, आणि राज्यकारभार एका स्त्रीकडे, अहिल्याबाईंकडे सोपविण्यात आला आणि हा प्रयोग हिंदुस्थानच्याच नाही, तर जगाच्या इतिहासात अद्वितीय ठरला. अहिल्याबाईंनी प्रेम, धर्मशक्ती आणि बुद्धीच्या जोरावर कल्याणकारी राज्याचा एक उत्तुंग आदर्श निर्माण केला. भारतात मी जिथे जिथे भ्रमण केले, तिथे तिथे इतर प्रांतांतल्या लोकांकडून मी अहिल्याबाईंची कीर्ती ऐकली. भारताच्या समग्र इतिहासात अहिल्याबाईंचे स्थान अद्वितीय आहे. असे मी मानतो.” सर जॉन माल्कमने तत्कालीन मध्य हिंदुस्थानचा इतिहास लिहिला आहे. त्यात अहिल्याबाईंच्या चरित्राचा भाग समाविष्ट झाला आहे. आपल्या ’ 'Memoirl of Central India including Malwa'’ या ग्रंथात माल्कम म्हणतो, ‘‘The facts that have been stated of Ahilya Baee rest on grounds that admits of no scepticism. Independently of the numerous and authentic sources from which these facts are drawn, my duty led to my making, in detail, settlements and arguments with the classes; and the minute evidence I have obtained regarding the acts and measures of the internal administration of Ahilya Baee places its real character beyond all doubt.’

माल्कमने अतिशय परिश्रमपूर्वक अहिल्याबाईंच्या चरित्रविषयक साधने जमवून, आपल्या ग्रंथात अहिल्याचरित्राचे पैलू ग्रथित केले आहेत. अहिल्याबाईंचे वर्णन करताना तो पुढे म्हणतो, ''Ahilyabai has become by general strategies the model of good government in Malwa. Her name is considered as such excellent authority that an objection is never made when her praise is needed as precedent.'' तत्कालीन ब्रिटिश व्हॉइसरॉय लॉर्ड अ‍ॅलनबरो यांनीही, “अहिल्याबाई सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी आणि सर्वश्रेष्ठ राज्यकर्ती आहे,” असे म्हटले आहे. माल्कमने अहिल्याबाईंचे धार्मिक अंगाचे वर्णन करताना समर्पक विवेचन केले आहे. माल्कम म्हणतो, “माझा पॉलिटिकल एजंट कॅप्टन डी. डी. स्ट्युअर्ट हा इ. स. 1818 साली केदारनाथला गेला होता. अहिल्याबाईंच्या नावाबद्दल त्या टोकाच्या प्रांतातही विलक्षण आदर होता, हे तो मला वारंवार सांगे, तेथे अजूनही चांगल्या स्थितीत दगडी धर्मशाळा व पाण्याचे कुंड आहे. तीन हजार फूट उंचावर असलेल्या, जिथं मनुष्यवस्तीचं किंचितही चिन्ह दिसत नाही, तिथं प्रवाशांसाठी व यात्रेकरूंसाठी ही कामे त्या राणीने आपल्या खर्चाने केली आहेत.” अखेर, लोकांना काय हवे असते? अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांचे योग्य निवारण, समता, शांतता, बंधुता, सामाजिक न्याय, विचार-उच्चारांचे स्वातंत्र्य आणि प्रत्येक लहानमोठ्या घटकाचा आत्मसन्मान जपला जाण्याची कायदेशीर हमी.

या मूल्यांची अंमलबजावणी ज्या राज्यात होते, ते राज्य आपोआपच ‘लोककल्याणकारी राज्य’ (welfare state) या बिरुदास पात्र ठरते. जनसामान्यांच्या सुखासाठी अहिल्याबाईंनी आयुष्यभर तन-मन-धन वापरलं. म्हणूनच, त्यांची प्रशासकीय कारकीर्द आगळीवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरली. अहिल्याबाईंच्या आयुष्याचा आणि कर्तृत्वाचा विचार करताना, या संकल्पना नीटपणे लक्षात घेणे अगदी आवश्यक आहे. अहिल्याबाईंना केवळ ‘धार्मिक’ म्हणणे म्हणजे त्यांच्या सत्त्वशील, कल्याणकारी, सर्वसमावेशक राज्यकर्त्या प्रतिभेचा अवमान करण्यासारखे आहे. ‘धार्मिकता’ ही व्यक्तीच्या आयुष्यातील पहिली पायरी आहे. धार्मिक असणे काही वाईट नाही. पण, तो उपासना पद्धतीचा एक भाग आहे. सत्त्वशील मानवी मूल्यांचा आवाका त्याच्यापलीकडे विशालपणे पसरलेला आहे. अहिल्याबाईंनी हातात शिवपिंडी धारण केली ते धार्मिक भावनांचे, भक्तिपरंपरेचे एक प्रतीक म्हणून; आणि जनसामान्यांना प्रतीकांची भाषा सहज समजते म्हणून! अहिल्याबाईंची धार्मिकता भाबडी नव्हती, ती लोकाभिमुख होती. ‘धर्मपरायणता म्हणजे लोककल्याण’ हे समीकरण त्यांनी प्रस्थापित केले. त्यांच्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांच्या धार्मिकतेवर उभी होती. त्यांच्या काळात ही संकल्पना नवी होती आणि आपल्या कुशल, नियोजनबद्ध प्रशासनातून त्यांनी ती यशस्वीपणे अमलात आणली होती.

शेती, पाणी, व्यापार, रस्ते या विविध क्षेत्रांत अतिशय योजनाबद्ध रीतीने आणि विचारपूर्वक त्यांनी आपले धोरण राबविले. शेती हा पायाभूत व्यवसाय मानून, त्यास अनेक प्रकारे प्रोत्साहन दिले. वेगवेगळे प्रयोग केले. पाण्याचे व्यवस्थित, शास्त्रशुद्ध नियोजन केले. त्यांच्या राज्यात कधीही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवले नाही. व्यापाराच्या विविध क्षेत्रांत त्यांनी उत्कर्षाची दालने उभी केली. विविध राज्यांशी सलोख्याचे, स्नेहपूर्ण संबंध ठेवून परिपूर्ण लोकहितपूर्ण परदेशी धोरणाचा (foreign policy) स्वीकार केला. आयुष्यभर अहिल्याबाईंनी मानवधर्म पाळला. त्यांची ही दयापूर्ण दृष्टी केवळ मानवापुरतीच मर्यादित नव्हती. गुरांना चारा आणि पक्ष्यांना दाणा मिळावा, म्हणून शेत आणि कुरणं त्यांनी राखून ठेवली होती. अहिल्याबाईंच्या राजाश्रयामुळेच महेश्वरी वस्त्रांची भरभराट झाली. शांतता आणि संरक्षण मिळाल्याने, राज्याच्या समृद्धीला व्यापारी व सावकार यांचे चांगले सहकार्य लाभले. परोपकार हे अहिल्याबाईंच्या जीवनाचे सूत्र होते. एका संस्कृत सुभाषितात म्हटल्याप्रमाणे, 

परोपकाराय फलन्ति वृक्ष:।
परोपकाराय वहन्ति नद्या:॥

परोपकारासाठी नद्या वाहतात. वृक्षही परोपकारासाठी फुलतात, फळतात. संतजन आपले अवघे आयुष्य परोपकारार्थ व्यतीत करतात. अहिल्याबाईंचे आयुष्यही लोककल्याणासाठीच वाहिलेले होते. दुसर्‍याच्या सुखासाठीच त्या जीवन जगल्या. म्हणून, लोकांनी त्यांना ‘देवी’ ही पदवी दिली.

ईशावास्यं इदं सर्व यत्किंच जगत्यां जगत।
तेन त्यक्तेन भुन्जीथा: मा गृध: कस्यस्वित् मा गृधः॥

 
“जगात जे जे आहे ते सर्व परमेश्वरव्याप्त आहे, अशी भावना ठेवून स्वार्थत्यागपूर्वक त्याचा उपभोग घ्यावा, कोणाच्याही धनाचा लोभ धरू नये,” हे ईशोपनिषदातील वचन, संपूर्णपणे पालन करण्याचा आदर्श त्यांनी आपल्या जीवनाच्या रूपाने समाजासमोर प्रत्यक्ष ठेवला. अहिल्याबाई एक शूर महाराणी होत्या. राघोबादादा पेशव्यांनी सैन्य घेऊन त्यांच्या राज्याकडे वाकड्या नजरेने पाहताच, त्यांनी लगोलग स्त्रियांचे सैन्य तयार केले आणि राघोबांना निरोप धाडला, “मी बाई माणूस. मी काय करणार हे मनात आणू नका. मी खांद्यावर बांसडा टाकून उभी राहिले, म्हणजे श्रीमंतांच्या दौलतीस अवघड पडेल. ही दौलत आमच्या वडिलांनी भांडभवई करून मिळविली नाही, तर तलवारीचे अनुमाने शरीर खर्ची घातले आहे. आम्ही शिलेदार. वडिलांच्या चाकरीप्रमाणे चाकरी घेतल्यास हजर आहोत. पण, तुमची-आमची धुणीपाणी संपली असल्यास पाहिजे ते करू. पण, ब्राह्मण म्हणतील, दौलतीचा अभिलाष धरू तर ते कालत्रयी घडणार नाही.” त्यांनी मुत्सद्देगिरीने आणखी निरोप धाडला - “आपण एका स्त्रीबरोबर युद्ध करू नका, नाहीतर आपल्या नावास जो कलंक लागेल, तो कालत्रयी कशानेही निघणार नाही. मी तर बोलूनचालून बाईमाणूस. माझा जर युद्धात पराभव झाला, तर मला कोणीही नावे ठेवणार नाहीत. पण, यदाकदाचित तुमचा पराभव झाला तर तुमचे सर्व जगात हसे होईल. म्हणून, लढाईच्या भरी न पडाल तर बरे. कारण, ते तुम्हासच हितावह आहे.”

युद्धनीतीतला हा चतुरपणा त्यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाचाच एक भाग आहे. राघोबादादा पेशव्यांनी एकूण रागरंग पाहून माघार घेतली. मग मात्र त्यांनी अतिथी म्हणून राघोबादादांची उत्तम सरबराई केली आणि आपल्या उदात्त धीरोदात्ततेचे दर्शन घडविले.अहिल्याबाईंच्या प्रशासनाच्या बाबतीत विद्वानांनी पाहिजे त्या प्रमाणात योग्य मूल्यमापन केले नाही, असे वाटते. त्यांच्या धार्मिकतेवर नकारात्मक टिप्पणी करणारे इतिहासकार, त्यांच्या धवल आणि चतुरस्र प्रशासनाच्या बाबतीत मात्र अनभिज्ञता दाखवितात. कुठल्याही राज्याची प्रगती शांततेच्या काळातच होते. अहिल्याबाईंच्या कारकिर्दीचा 28 वर्षांचा काळ, हा किरकोळ अपवाद वगळता शांततापूर्ण प्रशासनाचा होता. राज्यकर्ती जनतेला मातेसमान वाटावी, यातच प्रशासनाचा लोककल्याणकारी चेहरा स्पष्ट होतो. अहिल्याबाईंच्या आयुष्याचा ‘एक स्त्री ते देवी’ हा प्रवास विस्मयकारक आहे. कुटुंबातील 17-18 जवळच्या व्यक्तींच्या मृत्यूचे आघात पचवीत, सतत लोकांच्या कल्याणाचा विचार करणे ही संतपणाचीच लक्षणे आहेत. आपल्या परंपरेनेही राजा योगी असणे, हे चांगल्या प्रशासनाचे लक्षण मानले आहे. हे योगीपण छत्रपती शिवराय आणि अहिल्याबाई या दोनच राज्यकर्त्यांकडे होतं. म्हणूनच त्यांना ‘श्रीमंत योगी’ आणि ‘पुण्यश्लोक’ अशी नामाभिधाने प्राप्त झाली. छत्रपती शिवराय आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या व्यक्तिमत्त्व व कार्य याबाबतची साम्यस्थळे पुढीलप्रमाणे आहेत.
 
छत्रपती शिवराय
1. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आदर्श राज्य निर्माण केले. प्रजाहितदक्ष राज्यकारभार केला.
2. जिजाऊ माँसाहेब वगळता इतर गण-गोतांचा विरोध सहन करावा लागला.
3. शिवप्रभूंना प्रजा ‘जाणता राजा’ समजत होती. आपल्या राजासाठी प्राणांची बाजी लावून शत्रूबरोबर लढत होती.
4. निरपेक्ष, निर्भीड, न्यायासन हे शिवशाहीचे वैशिष्ट्य होते. प्रजेवर अन्याय करताच जवळच्या नात्यागोत्यांचा विचार न करता, जवळच्या गणगोतांनाही कठोर शिक्षा केली.
5. ‘हे राज्य श्रींचे आहे’ अशी शिवप्रभूंची धारणा होती. ते राजयोगी होते.
6. शिवरायांचे परराष्ट्र धोरण सतर्क, सावध होते. राज्य रयतेचं व्हावे आणि प्रजा सुखी व्हावी, हे त्यांचे धोरण होते.
7. ‘गनिमी कावा’ हे त्यांच्या युद्धनीतीचे प्रमुख अस्त्र होते. महाराष्ट्रातील डोंगराळ प्रदेशाला अनुसरून त्यांनी ही रणनीती अवलंबिली होती.
8. त्यांचे वैयक्तिक चारित्र्य म्हणजे ‘राजाचे चारित्र्य शुद्ध असावे’ या वचनाचा आदर्श वस्तुपाठ होता. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला त्यांनी सन्मानाने तिच्या घरी पोहोचवून दिले. स्त्रीत्वाचा आदर केला.
9. शेती, व्यापार, संरक्षण, भाषा, साहित्य, संस्कृती अशा सर्व बाबतीत शिवाजी महाराज सजग होते. ‘आज्ञापत्र’ लिहून त्यांनी आपल्या प्रगल्भ विचारांची व्याप्ती सिद्ध केली आहे.
10. राज्यात संत तुकाराम, समर्थ रामदास, अशा संतांच्या मदतीने लोकजागरणाचे काम केले. लोकांच्या मनात परकी शत्रूच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण केली. ‘मराठा तितुका मेळवावा’ हे ब्रीद स्वीकारून राष्ट्रबांधणीचे काम केले.
11. महाराष्ट्रात गड-किल्ले यांची निर्मिती केली. योग्य माणसाला योग्य काम हे त्यांचे धोरण होते. म्हणूनच, अष्टप्रधानात बुद्धिवादी वर्ग आणि लढाईच्या मैदानात मर्द मावळे असे त्यांचे नियोजन होते. राज्यकारभार लोकाभिमुख होता.
सरकारी अधिकार्‍यांकडून लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याबाबत त्या दक्ष असत.
एका पत्राद्वारे त्यांनी आबाजी विष्णू कमाविसदार यास चुकीची कारवाई केल्याबद्दल ताकीद दिली आहे. ते पत्र असे-
त्रिंबक बाबुराव कमाविसदार, सरकार बिजागड यांस स्नेहांकित अहिल्याबाई होळकर दंडवत विशेष. सरकार मजकुर येथील मामलत तुम्हांकडून दूर करून राजश्री पांडुरंग नारायण याजकडे पेस्तर सालच्या अव्वल सालपासून सांगितली आहे. त्याच्या सनदा अलाहिदा आहेत, तरी तुम्ही दखलगिरी न करता तेथील अंमल मशारनिल्हे करतील.
ठाणे मजकुरी जकीरा, दास्तान जो जिन्नस असेल तो व ठाणे मशारनिल्हेचे स्वाधीन करून कब्ज घेऊन महाली बाकी व खादतगाई वगैरे असेल ते जमीदार यांचे विद्यमाने रुजू करून देणे.
जाणिजे छ. 17 जमादिलावल. बहुत काय लिहिणे.
मोर्तबसुद.
सरकारी रेकॉर्ड

 
इंदूरच्या देवी अहिल्याबाई विद्यापीठाचे निवृत्त प्राध्यापक आणि अहिल्या चरित्राचे व्यासंगी अभ्यासक डॉ. बालकृष्ण पंजाबी म्हणतात, “अहिल्याबाईंनी जीवनाला आधारभूत मूल्ये आणि परंपरांना वैचारिकच नव्हे, तर कृतीने मूर्त स्वरूप दिले. त्यांचा साधेपणा, अतूट धर्मनिष्ठा, धैर्यशीलता यामुळे त्यांच्या व्यक्तित्त्वातील मानवतेचा परिचय मिळतो. त्या केवळ साध्वी वा तपस्वी असत्या, तर हे मूल्यांकन यथोचित व न्यायसंगत ठरले असते. परंतु, त्यांनी सुमारे 28 वर्षे यशस्वीपणे शासन केले. त्याअर्थी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही गुणवैशिष्ट्ये असली पाहिजे की, ज्यामुळे मुत्सद्दीपणात आणि सैनिकी मोर्चावर तेवढेच यश त्या मिळवू शकल्या. अठराव्या शतकातील राजनीती अराजकता, अव्यवस्था, अनैतिकता व विश्वासघात यांनी बरबटलेली होती. अशा राजकीय परिस्थितीत स्त्री असूनही अहिल्याबाई कर्तृत्वात उण्या पडल्या नाहीत, ही गोष्ट महत्त्वाची. जीवनातील दारुण दु:ख पदरी पडले तरी त्या डगमगल्या नाहीत. अहिल्याबाईंच्या ठायी उच्च कोटीची राजनैतिक आणि सैनिकी जाण नसती, तर त्यांच्या कारकिर्दीतील बहुमुखी सफलता सिद्ध झाली नसती. अहिल्याबाईंचे यथायोग्य मूल्यमापन होणे अजून बाकी आहे.”
 
अहिल्याबाईंच्या ‘धार्मिक’ असणार्‍या राजनीतीचे पैलू असे सर्वस्पर्शी आहेत. प्रशासनाचे उत्तम ज्ञान, औदार्य, चातुर्य, व्यवहारज्ञान, नि:पक्षपातीपणा, न्यायनिष्ठुरता व धर्मविषयक जागरूकता हे त्यांचे गुणविशेष होते. “मी आज जे काही सामर्थ्यांच्या व सत्तेच्या जोरावर करीत आहे, त्याचा मला अखेरी परमेश्वरापाशी जाब द्यावा लागेल” या त्यांच्या वाक्यातून सात्त्विकतेची परिपूर्ण जाणीव ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच भाग होती, हे लक्षात येईल. त्यांच्या धार्मिकतेचे पैलू आपल्याला विविध अंगांनी समजून घेणे आवश्यक आहे. लोकशाहीची व्याख्या करताना - ’A rule of the people, for the people and by the people'’ असं म्हटलं जातं. अहिल्याबाईंचं राज्य ’of the people’ नसेल, ’by the people’ नसेल, पण सर्वस्वाने ’for the people’ होतं. त्यांच्या धार्मिकतेच्या कल्पना लोकसुखाशी आणि जनकल्याणाशीच निगडित होत्या. त्यांचं राज्य खर्‍या अर्थानं लोकांकरिता होतं. कारण, अहिल्याबाईंनी संसारावर तुळशीपत्र ठेवलं होतं. श्रीशंकराच्या नावाने तपस्विनीच्या आणि योगिनीच्या मनोभावाने त्या राज्यकारभार चालवत होत्या. आपण राज्याचे विश्वस्त (trustee) आहोत, या भावनेने राज्यकर्त्यांनी काम करावं, ही अहिल्याबाईंची संकल्पनाच, गांधीजींनी विसाव्या शतकात सांगितली आहे. डॉ. बालकृष्ण पंजाबी यांनी म्हटल्याप्रमाणे, अहिल्याबाईंचे यथायोग्य, परिपूर्ण मूल्यमापन होणे खरोखरच बाकी आहे. त्या अनुषंगाने केलेला हा एक प्रयत्न...

 
 
- डॉ. देवीदास पोटे
(लेखकाचे होळकरशाही आणि अहिल्याबाई होळकर या विषयावर महाराष्ट्र शासनद्वारा प्रकाशित 10 खंड आणि ‘महेश्वरच्या घाटावरुन’, ‘अ...अहिल्याबाईंचा’, ‘वेध अहिल्याबाईंचा’ आदी ग्रंथ प्रकाशित झाले असून,याच विषयात त्यांनी ‘डॉक्टरेट’ मिळाली आहे.)