रोहित वेमुलाचे जातप्रमाणपत्र होते बनावट

क्लोजर रिपोर्टचा अहवाल मिळालेल्या पदव्या रद्द होण्याचा होता धोका; डाव्या संघटनांचा होता राग

    03-May-2024
Total Views |
 fdd 
 
 नवी दिल्ली : दलित विद्यार्थी रोहित वेमुलाच्या हत्येस मोदी सरकार जबाबदार आहे, असा प्रचार करून आपली पोळी भाजणार्‍या पुरोगामी कंपूचा बुरखा अखेर फाटला आहे. रोहित वेमुला याचे जातप्रमाणपत्र बनावट होते, असे तेलंगणा पोलिसांनी तेलंगणा उच्च न्यायालयात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. बनावट प्रमाणपत्रामुळे मिळालेल्या पदव्या रद्द होऊ शकतात, याची त्याला भीती होती तसेच डाव्या विद्यार्थी संघटनांचाही त्याला राग होता. यामुळेच रोहितने आत्महत्या केली, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तेलंगणा पोलिसांनी तेलंगणा उच्च न्यायालयात रोहित वेमुला प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. या अहवालात रोहित वेमुला हा दलित नव्हताच, असे नमूद करण्यात आले आहे. अहवालात म्हटले आहे की, मृत व्यक्ती हा अनुसूचित जातीचा नव्हता; मात्र त्याच्या आईने त्यास अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवून दिले होते. या प्रकाराची जाणीव मृत व्यक्तीस होती. या कारणामुळे आपण गेल्या अनेक वर्षांमुळे प्राप्त केलेल्या शैक्षणिक पदव्या गमव्याव्या लागतील आणि आपल्याविरोधात खटलाही चालवला जावू शकतो, अशी सततची भितीदेखील त्याच्या मनात होती.
 
ही भितीदेखील त्याच्या मृत्यूचे कारण असू शकते, असे अहवालात म्हटले आहे. मृत व्यक्तीला अनेक समस्या होत्या, ज्यामुळे तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होऊ शकत होता. त्याचप्रमाणे सर्वतोपरी प्रयत्न करूनही मृत व्यक्तीला आत्महत्या करण्यास आरोपींनी प्रवृत्त केले, असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सापडला नाही. परिणामी संबंधित तपास बंद करत असल्याचेही क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला याने 2016 साली आत्महत्या केली होती. त्यानंतर डाव्या विद्यार्थी संघटनांसह पुरोगामी - समाजवादी कंपूने देशभरात मोदी सरकारमुळे दलित विद्यार्थी रोहित वेमुला यास आत्महत्या करावी लागली, असा अपप्रचार चालवला होता. मात्र, तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये पुरोगामी कंपूच्या अपप्रचाराचा बुरखा फाटला आहे.
 
दरम्यान, उच्च न्यायालयाने आता वेमुला कुटुंबाला विरोध याचिकेसाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे करण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींना क्लीन चिट क्लोजर रिपोर्टमध्ये सर्व आरोपींना क्लीन चिट देण्यात आली आहे. आरोपींमध्ये सिकंदराबादचे तत्कालीन खासदार बंडारू दत्तात्रेय, आमदार एन. रामचंद्र राव आणि हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू अप्पा राव यांच्याशिवाय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री (विद्यमान केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री) स्मृती इराणी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेत्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. आत्महत्येचा वापर हिंदूविरोधासाठी रोहित वेमुला याच्या आत्महत्येचा वापर एएसए, एसएफआय या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटना, डावे पक्ष, डावे कथित विचारवंत, काँग्रेस नेते राहुल गांधी आदींना आपला अजेंडा पुढे रेटण्यासाठी केला. वेमुला याच्या आत्महत्येला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार त्याचप्रमाणे रा. स्व. संघ आणि हिंदुत्ववादी जबाबदार असल्याचाही दावा या इकोसिस्टीमकडून अजुनही करण्यात येतो. अहवालात मात्र वेमुला हा आपल्यास संघटनेवर नाराज होता, नमूद केले आहे. त्यामुळे या इकोसिस्टीमला तडाखा बसला आहे.