मुंबई : महायूतीचा पालघरचा उमेदवार जाहीर झाला असून ही जागा भाजपकडे गेली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे. हेमंत सावरा हे माजी मंत्री दिवंगत विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत. दरम्यान, याठिकाणी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पालघरच्या जागेबाबत भाष्य केलं होतं. "पालघरच्या जागेबाबत भाजप निर्णय घेणार आहे. शिंदेंसोबत १३ खासदार आले होते पण ते आता १६ जागा लढत आहेत. राष्ट्रवादी ६ जागा लढत आहे. त्यामुळे काही जागा कमीजास्त झालेल्या आहेत. दरम्यान, पालघरसुद्धा एकमताने आमच्याकडे येणार आहे," असे ते म्हणाले होते.
त्यानंतर आता पालघरमधून हेमंत सावरा यांना तिकीट देण्यात आले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये ही जागा उबाठा गटाकडे गेली असून त्यांनी भारती कामडी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पालघरमध्ये भाजप विरुद्ध उबाठा अशी थेट लढत रंगणार आहे.