ऐतिहासिक ‘उद्भव’ प्रकल्प

    28-May-2024   
Total Views |
Project Udbhav
 
भारताच्या इतिहासात अनेक शौर्यगाथा, युद्धनीती आणि अनेक कथा आहेत, ज्यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आता भारतीय सैन्यदेखील, देशाच्या इतिहासातून आणि वेद-पुराणांमधून युद्धासाठी आवश्यक ते धडे घेणार आहेत. लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी, नुकत्याच एका कार्यक्रमात यासंदर्भात माहिती दिली. भारतीय सैन्य केवळ महाभारतातूनच नाही, तर इतिहासातील आपल्या योद्ध्यांच्या रणनीतींमधूनही शिकेल. मौर्य, गुप्त आणि मराठा काळातही भारताने अनेक युद्धे जिंकली. भारताचा लष्करी वारसा घडविण्यात या सर्वांचे योगदान आहे, त्यामुळे त्यांच्याकडून शिकणे महत्त्वाचे आहे. ‘उद्भव’ प्रकल्पाची रचना, धोरणात्मक शब्दसंग्रह आणि वैचारिक चौकट विणण्यासाठी करण्यात आली आहे, जी भारताच्या तात्विक आणि सांस्कृतिक वारशात खोलवर रूजलेली असून २०२३ पासूनच यावर काम सुरू झाल्याचे पांडे म्हणाले. चाणक्यांनी लिहिलेलेले ग्रंथ, प्राचीन वेद, पुराण, उपनिषदे आणि अर्थशास्त्र आणि त्यात समाविष्ट असलेल्या संबंधित विषयांचा सखोल अभ्यास सैन्य करणार आहे. केवळ वेद आणि पुराणच नाही, तर ’कामंदकीय नीतीसार’ आणि तमिळ संत तिरुवल्लुवर यांच्या ’तिरुक्कुरल’ यांचाही अभ्यास केला जाणार आहे. महाभारताच्या काळात झालेल्या अनेक युद्धांचाही, सखोल अभ्यास केला जाईल. ‘उद्भव’ प्रकल्पाच्या माध्यमातून, भारताच्या इतिहासातील धोरणात्मक यशांना आधुनिक लष्करी क्षमतेची जोड दिली जाणार आहे, जेणेकरून भारतीय सैन्यशक्ती आणखी मजबूत होईल. भारतीय आणि पाश्चात्य देशांतील विद्वानांचा विचार, दृष्टिकोन आणि विचारांमधील साम्य समजून घेण्यासही मदत होईल. पेनसिल्व्हेनिया येथील ‘युनायटेड स्टेट्स आर्मी वॉर कॉलेज’मध्ये, चाणक्यांची रणनीती शिकविली जाते. अमेरिकेला हुसकावून लावण्यासाठी व्हिएतनामने महाराणा प्रताप यांच्याकडून प्रेरणा घेतली. मराठ्यांनी नौदलाच्या माध्यमातून कित्येक विजय मिळविले. महाभारत काळात चक्रव्यूह निर्मितीपासून श्रीकृष्णाच्या अनेक रणनीती होत्या. या सगळ्यांचा फायदा भारतीय लष्कराला नक्कीच होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वदेशीचा नारा देत आत्मनिर्भर भारत बनविण्यासाठी मागील दहा वर्षांत कार्यरत आहेत. संरक्षणक्षेत्रातही आता आत्मनिर्भर होण्यासाठी भारतीय वेद-पुराणांचा आधार घेतला जाणार आहे, हे कौतुकास्पदच म्हणावे लागेल.


...करू मंथन पराभवाचे

दि. १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या अर्थात अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. निवडणूक अखेरच्या टप्प्यावर आली असतानाही, ‘इंडी’ आघाडीतील नाराजीनाट्य मात्र अजूनही कायम आहे. इकडे रेमल वादळ घोंगावत असताना, तिकडे ‘इंडी’ आघाडीतसुद्धा मान-अपमानाचे नाटक सुरू आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या सातही टप्प्यातील विविध विषयांवर मंथन करण्यासाठी, दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व घटक पक्षांची बैठक बोलाविली आहे. दि. १ जून रोजी ही बैठक होणार असून, ‘इंडी’ आघाडीच्या ’रुसलेल्या सहयोगी’ ममता बॅनर्जी यांनी मात्र बैठकीला येण्यास आधीच नकार दिला आहे. बंगालमध्ये लोकसभेच्या दहा जागांवर निवडणूक असून, रेमल चक्रीवादळाचेही संकट आहे. त्यामुळे बैठकीला येणार नसल्याचे ममतांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, त्यांना बंगालवासीयांची काळजी असल्याचे ममतांनी म्हटले आहे. त्यांचे हे वक्तव्य काळजीपोटी असले, तरी बंगालच्या परिस्थितीविषयी फार काही सांगायला नको. निवडणुका सुरू असताना दगडफेक, खून, हाणामारीच्या घटनांनी बंगालमध्ये उच्छाद आणला आहे. त्यामुळे ममतांचे हे काळजीपोटीचे बोल फोल आहेत, हेच यावरून स्पष्ट आहे. ममतांची नीतीसुद्धा चकित करणारी, आणि तितकीच गोंधळात टाकणारी आहे. “इंडी’ आघाडीसोबत मी राष्ट्रीय स्तरावर आहे, मात्र राज्य स्तरावर मी ‘इंडी’ आघाडीसोबत नाही,” असे ममतांनी याआधीच सांगितले आहे. त्याचप्रमाणे, “केंद्रामध्ये ‘इंडी’ आघाडीचे सरकार आल्यानंतर, आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ, जेणेकरून बंगालवासीयांना कसलीही अडचण येऊ नये,” असेही त्या म्हणतात. अधीररंजन चौधरी यांच्यासह अनेक नेत्यांनी ममतांना नेहमीच झिडकारले आहे. त्यामुळे त्याचा राग म्हणून ममता या बैठकीला दांडी मारत आहेत का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मुळात विजयाची शक्यता तसूभरही नाही, त्यामुळेच लोकसभेचे निकाल जाहीर होण्याआधीच ‘इंडी’ आघाडी मंथन करण्यासाठी बैठक घेत आहे. मंथन तर कधी विजयावर होत नाही, त्यामुळे हे लोकसभा निवडणुकीतील ‘इंडी’ आघाडीच्या दारूण पराभवाचेच मंथन असून, यासाठीच ममता या ना त्या कारणाने बैठकीला गैरहजर राहणार असल्याचे सांगत आहेत.


पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.