हादरलेली डोंबिवली,भांबावलेले प्रशासन...

    28-May-2024   
Total Views |
Dombivali Blast

डोंबिवलीतील ‘अंबर’ नामक केमिकल कंपनीमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या स्फोटाने, संपूर्ण मुंबापुरी हादरून गेली. ज्याच्यासाठी औद्योगिक विकास करतो आहे, त्या मानवी आयुष्याच्या शाश्वततेसाठी उपाययोजना काय, याची चर्चा या निमित्ताने जोराने सुरु झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा या लेखात घेतलेला हा आढावा...

डोंबिवलीतील अंबर केमिकल्स फॅक्टरीमध्ये ज्वालाग्राही व स्फोटक असणार्‍या अशा, अल्युमिनिअम रासायनिक पदार्थांचे उत्पादन होत आहे. या रासायनांसंदर्भातील प्रक्रिया करत असताना, तसेच कच्चा माल आणि अंतिम उत्पादनाच्या साठवणुकीबाबत योग्य खबरदारी न घेतल्याने, हे मोठे तीन स्फोट झाल्याचे पोलिसांना तपासाअंती आढळून आले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अंबर केमिकल्समध्ये प्रक्रिया करत असताना, कंपनीची हलगर्जी भोवली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मालक प्रदीप मेहता यांना अटक केली असून, संचालक मंडळावरही गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवली एमआयडीसी फेस २ मध्ये असलेली अंबर कंपनी, गेल्या काही वर्षांपासून बंद होती. दीड महिन्यापूर्वी ती पुन्हा सुरू झाली. या कंपनीमध्ये रिअ‍ॅक्टरद्वारे रसायनांचे मिश्रण तयार करण्यात येत होते. परंतु, मिश्रणाची प्रक्रिया होत असताना तीन मोठे स्फोट घडले व त्यामुळे १६ पेक्षा अधिक माणसे मृत्यूमुखी पडली, तर ६० पेक्षा अधिक माणसे जखमी झाली आहेत. एवढेच नाही, तर एमआयडीसी क्षेत्रातील परिसरामधील दोन ते तीन किमी अंतरावरील मालमत्तांचे, घरांचे व वाहनांचे मोठे नुकसानसुद्धा झाले आहे. या नुकसानात आसपासच्या सप्तवर्ण, डेक्कन कलर, ओमेगा आणि इतर कंपन्यांचेसुद्धा भारी नुकसान झाले आहे. या कंपन्यांना जबर फटका बसल्याने या कंपन्यादेखील बेचिराख झाल्या आहेत.
 
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे, यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांचे मृतदेह, छिन्नविछीन्न होते असे तक्रारीमध्ये नमूद केले आहे. जखमी झालेल्यांमध्ये पादचार्‍यापासून ते रिक्षाचालक, इतर कंपन्यांचे कर्मचारी इत्यादींचा समावेश आहे. या रासायनिक प्रक्रियांसंदर्भात योग्य सुरक्षेची खबरदारी घेतली नव्हती, असे तक्रारीमध्ये नोंदविण्यात आले आहे. तसेच कच्चा माल, उत्पादनाच्या साठवणुकीमध्येही योग्य ती खबरदारी घेतली नाही, हे तपासात उघडकीस आले आहे. स्फोट झाल्यानंतर आग लागली तीसुद्धा मोठी होती व त्याकरिता अंबरनाथ, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी येथून अग्निशमन दलांना पाचारण केले होते. जखमींना बाहेर काढण्यात आले असून, जवळच्या एम्स, नेपच्यून, ममता या रुग्णालयांसह सरकारी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे.
 
बॉयलर नव्हे रिअ‍ॅक्टर प्रक्रियेत स्फोट

या कंपनीमधील प्रक्रियेमध्ये बॉयलरमध्ये स्फोट घडला नसून, हे स्फोट रिअ‍ॅक्टर प्रक्रियेमध्ये घडले आहेत, असे स्पष्टीकरण बॉयलर उत्पादन तज्ज्ञांनी दिले आहे. ‘इंडियन बॉयलर उत्पादन अ‍ॅक्ट’अंतर्गत, अनेक सुरक्षा तपासण्यांनंतर बॉयलरचा वापर करायला मिळतो. त्यामुळे बॉयलर उत्पादन करण्यासाठी लागणारे साहित्य मजबूत असल्याने, बॉयलरमध्ये स्फोटांची संख्या अत्यंत तुरळक होत असते. गेल्या दहा वर्षांत घडलेले स्फोट हे प्रामुख्याने रिअ‍ॅक्टरमध्येच घडले आहेत. बॉयलरच्या निर्मितीपासून ते दुरुस्ती व वापर बंद करण्याबाबत, सर्व गोष्टींची नोंद संबंधित शासकीय विभागाकडे करणे प्रत्येक कंपनीला बंधनकारक असते. रिअ‍ॅक्टरमध्ये रासायनिक प्रक्रिया होत असून ,त्यांच्यावर या संदर्भातील कोणत्याही प्रकारची बंधने अजूनपर्यंत आलेली नाहीत. शिवाय, अनेक रिअ‍ॅक्टर ही स्टेनलेस स्टीलची असल्याने त्यांची सुरक्षा कमकुवत असते.

स्फोटानंतर दुसर्‍या दिवशी दहा जणांची बेपत्ता असण्याची घटना व रुग्णलयात पाच बॅगांमध्ये मानवी अवयव डीएनए टेस्टसाठी भरलेले आढळले. विशाल पौडवाल (३९) हे घरी रात्री ९.३० वाजेपर्यत न परतल्याने त्यांची बायको प्रतीक्षा (३२) या चिंतेत पडल्या. विशाल प्रतीक्षांचा फोन घेत नव्हते, म्हणून प्रतीक्षांनी त्यांच्या मित्राकडे चौकशी करताच, त्यांना स्फोटात ते बेपत्ता झाले आहेत हे समजले. प्रतीक्षाबरोबर त्यांचा आठ वर्षांचा मुलगासुद्धा आहे. विशाल गेले सहा महिने कॉसमॉस कंपनीमध्ये ग्राफिक डिझायनर म्हणून काम करीत होते. अशाचप्रकारे दहा कुटुंबांकडून मानपाडा पोलीस स्थानकामध्ये बेपत्ता कर्मचार्‍यांची चौकशी सुरू झाली आहे. विजय कडबा या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी स्पष्ट केले की, ते गुरुवार संध्याकाळपासून तपास करीत आहेत, पण त्यात त्यांना अजून यश मिळाले नाही. मृत झालेल्या कर्मचार्‍यांची शरीरे छिन्नविछिन्न झाली आहेत, म्हणून ते आता त्यांच्या कुटुंबाकडून डीएनए टेस्टकरिता मॅच होण्यासाठी सॅम्पल मिळवित आहेत. बेपत्ता मृतांच्या शरीराचे तुकडे (दात, केस वा मोठी हाडे) पाच गाठोड्यात भरून, त्या बॅगा रुक्मिणीबाई रुग्णालयात डीएनए टेस्टकरिता आणून ठेवल्या आहेत.

सत्यनारायण राजभर (३८) हे अंबर कंपनीमध्ये हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून काम करीत होते. त्यांच्या घरी बायको रेखा, चार मुली व एक मुलगा असे कुटुंबीय डोंबिवलीच्या सोनारपाडाला राहत होते. हे सत्यनारायण कंपनीत गेले दहा-बारा वर्षे काम करीत होते. आधी ते अयोध्येला राहात होते. भारत गोरखनाथ जयस्वार (४२) हे अंबर केमिकल्स कंपनीमध्ये मेंटेनन्स सुपरवायझर म्हणून काम करीत होते. भारत यांनी ही कंपनी १५ दिवसांपूर्वी जॉईन केली होती. मनोज चव्हाण (३६) हे मूळचे गोरखपूरचे व हे अंबर कंपनीमध्ये लॅब वर्कर म्हणून काम करीत होते. ते डोंबिवलीच्या सोनपाडाला कुटुंबासह राहत होते.  बाकी कर्मचार्‍यांपैकी राकेश राजपूत (४१), सिराझुद्दीन अहमद (२४), धवन वाघाने (३८), महेश दास (२२), रवी कुमार (४०) आणि रवी रायभार (३०) हे होते. डॉ. सुहासिनी बडेकर या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये चीफ मेडीकल ऑफिसर म्हणून काम करीत आहेत. एकूण बेपत्ता सात कर्मचार्‍यांचे डीएनए सॅम्पल मॅच करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून मिळाली आहेत. यासंबंधी लवकरच त्याविषयी अहवाल मिळतील.
 
मृतांची संख्या १६च्या वर झाली आहे 

अंबर कंपनीतील रिअ‍ॅक्टरच्या स्फोटांमुळे झालेल्या मृतांची संख्या, आता १६ च्या वर गेली आहे. कारण बचाव पथकाला आणखी काही मृतदेह मिळाले आहेत. काही कर्मचारी अजूनही बेपत्ता आहेत व त्यांचा शोध सुरू आहे. तपासणी पथकांना अजून मृत किती व जखमी किती यांचा समन्वय साधायचा आहे. घटनास्थळी मृतदेह व मानवी अवशेष सापडत आहेत. घटनास्थळी रसायनाचे टँकर, सिलेंडर, कॅन मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात राडारोडा आहे. हे सर्व हटवून मृत व जखमींचा शोध घ्यावयास हवा.

डोंबिवलीतील स्फोटामागची बफर समस्या

डोंबिवलीतील औद्योगिक व निवासी क्षेत्रात अंतर ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेला, पाच किमीचा संरक्षित पट्टा (बफर झोन) तत्कालीन राजकीय पुढार्‍यांनी भूमाफियांशी हातमिळवणी करून गायब केल्याचा गंभीर आरोप डोंबिवलीतील काही जाणकारांनी केला आहे. अंबर कंपनीमधे स्फोट झाल्यावर बफर झोन समस्या कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संरक्षित पट्ट्यात उभारलेली निवासी संकुले, रासायनिक कंपन्याना अगदी खेटून आहेत. त्याचा मोठा फटका त्या जवळच्या सदनिकाधारकांना बसलाच आहे.

घातक उद्योग शहराबाहेर वसविणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

रासायनिक उद्योगांच्या स्फोटानंतर येथील उद्योगांचे सर्वेक्षण करून, ए, बी, सी, डी असे वर्गीकरण करण्यात येणार आहे. अतिघातक लाल श्रेणीत मोडणार्‍या उद्योगांचे युनिट तत्काळ बंद केले जातील. त्यांना शहराबाहेरच्या जागेत स्थलांतरित केले जाईल.
 
एमआयडीसीने काय केले?

एमआयडीसीने इंडस्ट्रीना भूखंड, रस्ते, पाणी व वीज दिली व मोठ्या प्रमाणात भाडे वसूल केले. परंतु, सुरक्षिततेकरिता काहीच तजवीज केली नसावी. रिअ‍ॅक्टर प्रक्रियेकरिता काही नियमावली करायला हवी. कारण, गेल्या कित्येक वर्षांत डोंबिवलीतील केमिकल कंपनीच्या रिअ‍ॅक्टरमध्ये अनेक स्फोट घडले आहेत. ही स्फोटांची मालिका आता थांबवायला हवी. तसेच, निवासी व औद्योगिक क्षेत्र यातील अंतर राखणे देखील जरुरी आहे.
 
अच्युत राईलकर
 

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.