मेट्रो३ला पहिल्या टप्प्यासाठी शुभेच्छा !

जपानच्या मुंबईतील महावाणिज्यदूतांची स्थानकाला भेट

    28-May-2024
Total Views |

japan metro3


मुंबई, दि.२८: 
मुंबईकर लवकरच 'आरे ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स'पर्यंत शहराच्या पहिल्या भूमिगत मेट्रो प्रणालीमध्ये प्रवास करू शकतील. कारण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या योजनेनुसार या मार्गावरील पहिल्या टप्प्यातील व्यावसायिक ऑपरेशन्स जुलैपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी-सान यांच्या शिष्टमंडळाने सोमवार, दि.२७ रोजी हुतात्मा चौक मेट्रो स्थानकाला भेट दिली. यावेळी त्यांनी एमएमआरसीद्वारे करण्यात आलेल्या कामाचे कौतुक केले आणि पहिला टप्पा सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती एमएमआरसीने आपल्या एक्स अकाऊंटवरून दिली आहे.
एमएमआरसीएलने नुकत्याच पहिल्या टप्प्यातील मार्गांवर चाचण्या पूर्ण केल्या आहे. आता एमएमआरसीएल नवीन मेट्रो लाईन सुरू करण्याआधी काही अंतिम मूल्यांकन आणि संस्थांच्या मान्यतांची वाट पाहत आहे. १९ गाड्यांच्या ताफ्यासह एमएमआरसीएल या मार्गावर २६० हून अधिक सेवा चालविण्यास सज्ज आहे. संशोधन, डिझाइन आणि मानक संघटना (RDSO), आता मेट्रो ३ प्रणालीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ऑपरेशनसाठी आवश्यक मंजुरी प्रदान करण्यासाठी येतील. RDSO च्या मूल्यांकनामध्ये ब्रेकिंग सिस्टम, प्रवेग आणि कमी होण्याचे दर आणि आणीबाणीच्या प्रतिसाद यंत्रणेच्या तपासणीसह सिस्टमच्या सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचे सर्वसमावेशक मूल्यमापन समाविष्ट असेल. टीम ट्रॅकची गुणवत्ता आणि स्थिरता तसेच पायाभूत सुविधांचे संरेखन, वेल्डिंग आणि स्ट्रक्चरल अखंडतेची देखील तपासणी करेल.
तत्पूर्वी, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी-सान, जपानच्या कौन्सुलेट जनरल कार्यालयाचे व्हॉइस कौन्सिल, ओहोरी केईना सॅन यांनी सोमवार, दि.२७ रोजी हुतात्माचौक मेट्रो स्थानकाला भेट दिली. यावेळी एमएमआरसी च्या टीमने त्यांना प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी जपानच्या या अधिकाऱ्यांनी एमएमआरसीएलच्या कामाचे कौतुक केले. याचबरोबर, पहिला टप्पा सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.