१२ हजार फूट खोलवर जाण्यास सज्ज, टायटनप्रमाणे त्यातही अब्जाधीश असणार!
28-May-2024
Total Views | 54
नवी दिल्ली : टायटननंतर आता ट्रायटन ही पाणबुडी १२ हजार फूट खोलवर जाण्यास सज्ज झाली आहे. दरम्यान, पुन्हा एकदा टायटॅनिक या महाकाय जहाजाचे भग्नावशेष पाहण्यासाठी जाणार आहे. यात टायटनप्रमाणेच अब्जाधीज व्यक्ती असतील तर या पाणबुडीची किंमत १६६ कोटी रुपये इतकी आहे.
दरम्यान, टायटॅनिक जहाजाचा भग्नावशेष दाखवण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडीचा समुद्रात स्फोट झाला होता. त्यानंतर आता ११ महिन्यांनंतर आणखी एक अमेरिकन अब्जाधीश अशीच कामगिरी करणार आहे. अमेरिकन रिअल इस्टेट अब्जाधीश लॅरी कॉनर ट्रायटन सबमरिनर्सचे सह-संस्थापक पॅट्रिक लाहे यांच्यासोबत या पाणबु़डीतून टायटॅनिक अवशेष पाहणार आहेत.
विशेष म्हणजे कॉनरने ट्रायटन 4000/2 एक्सप्लोरर नावाचे सबमर्सिबल जहाज तयार केले आहे. त्याची किंमत १६६ कोटी रुपये असून ते समुद्रात ४ हजार मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते, म्हणून त्याला '4000' असे नाव देण्यात आले आहे. परंतु, अद्याप ट्रायटन पाणबुडी कधी प्रवासाला निघेल याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत अब्जाधीश लॅरी म्हणाले, "त्यांना जगाला दाखवायचे आहे की महासागर किती शक्तिशाली आहे तसेच तो किती सुंदर आहे. जर तुम्ही योग्य पावले उचलली तर एक सहल तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकते", असे मत त्यांनी मुलाखतीतून मांडले आहे.
टायटनमधील स्फोटानंतर नवीन पाणबुडी तयार करण्याचा निर्णय
ट्रायटन पाणबुडीचे सह-संस्थापक पॅट्रिक यांनी डब्ल्यूएसजेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "गेल्या वर्षी जेव्हा टायटन पाणबुडीचा स्फोट झाला तेव्हा कॉनरने मला फोन केला आणि सांगितले की आम्हाला नवीन पाणबुडी तयार करायची आहे. ती प्रवाशांना टायटॅनिकच्या ढिगाऱ्यापर्यंत सुरक्षितपणे घेऊन जाऊ शकेल. तसेच, आम्हाला हे सिद्ध करावे लागेल की टायटन पाणबुडी सदोष होती, परंतु प्रत्यक्षात हा प्रवास तितका धोकादायक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.