पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्या अडचणी वाढणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले असून, या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम 204 नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले होते. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती. अखेर पोलिसांनी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
राहुल गांधींचे वक्तव्य बेताल
विशेष म्हणजे स्वा. वि. दा. सावरकर यांनी त्यांच्या कोणत्याच पुस्तकात असे काहीही लिहिलेले नसल्याची माहिती अॅड. आशिष सोनवणे यांनी दै. मुंबई तरूण भारत शी बोलतांना दिली. केवळ आणि केवळ सावरकरांच्या प्रति असणार्या द्वेषातून असे खोटे आणि बेताल वक्तव्य राहुल गांधी यांनी या कार्यक्रमात केले होते आणि यूट्यूब च्या माध्यमातून या धादांत खोट्या आणि बदनामीकारक वक्तव्याची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केल्याचे ते म्हणाले.
काय आहे नेमके प्रकरण
स्वा. सावकारांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या प्रस्तुतच्या खोट्या, बेताल आणि बदनामीकारक वक्तव्याच्या विरोधात एक फौजदारी खटला पुण्यातील न्यायालयात दाखल केला आहे. या खटल्यात मा.न्यायालयाने 19 जाने 2024 रोजी विश्रांतवाडी पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 202 प्रमाणे आरोपातील सत्यता पडताळून अहवाल दाखल करण्याचा आदेश दिला होता. अनेक महिने या अहवालाची प्रतीक्षा करून, अखेर स्वा. सावरकर जयंतीच्या पूर्व संध्येस पोलिसांनी त्यांचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे. या अहवालात पोलिसांनी सखोल चौकशी करून, सात्यकी सावकार यांनी केलेले आरोप बरोबर असून, स्वा. सावरकरांच्या कोणत्याच पुस्तकात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे काहीही लिहीलेले नसताना, त्यांनी असे भाषण करून स्वतः च्या (राहुल गांधी यांच्या व्यक्तिगत) यूट्यूब अकाउंट वरून प्रसारित करून स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरक र यांची बदनामी केली असल्याचे दिसुन येत आहे, या आशयाचा अहवाल सादर केला आहे.
आता न्यायालयात 30 मे रोजी सुनावणी
पोलिसांचा स्पष्ट आणि नि:संधिग्ध अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राहुल गांधी यांच्या विरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार इश्यू प्रोसेस चा आदेश पारित करण्यासाठी दि. 30 मे 2024 ची तारीख निश्चित केली आहे. प्रस्तुत प्रकरणात सात्यकी सावरकर यांचे वतीने न्यायालयात आज अॅड. संग्राम कोल्हटकर, अॅड. माधुरी पाटोळे, अॅड. आशिष सोनवणे, अॅड. शिवराज जोशी, व अॅड. शब्बीर निलगर युक्तिवादासाठी उपस्थित होते.
भादंवि कलम 204 नुसार कारवाई करणार
राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. आता पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालय ‘सीआरपीसी’च्या कलम 204 नुसार कार्यवाही सुरू करणार आहे, असे सात्यकी सावरकर यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले.
सकारात्मक घडामोड
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात आपण दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी पोलिसांकडून अहवाल सादर होणे ही सकारात्मक घडामोड आहे. न्यायालयाकडून योग्य निर्णय अपेक्षित आहे. -सात्यकी सावरकर