टेटवली गावच्या नमिता भुरकुड, गीतांजली भुरकुड, अंजली फडवले, निकिता भुरकुड, अलका मेढा आणि जागृती फडवले या सहा महिला नुकत्याच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांचे अभिनंदन. त्याचबरोबर पाड्यातील वंचित आणि समाजप्रवाहापासून दूर असलेल्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याचे सोने करणार्या केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पाच्या परिसस्पर्शाचेही मनोमन अभिनंदन. दहावी उत्तीर्ण होणार्या या भगिनींच्या यशाच्या पार्श्वभूमीचा या लेखात मागोवा घेतला आहे.
'आपल्या सहा भगिनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या, आमच्यासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. या सहा भगिनींच्या कष्टाला जिद्दीला नमन आहे.” केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पाचे मार्गदर्शक विमल केडिया म्हणाले, “जणू या सहा भगिनींनी आकाशझेप घेतली असावी, एवढा आनंद, एवढे समाधान त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. आजकाल प्रत्येक क्षेत्रात मुली शैक्षणिक प्रगती करत असताना विमल यांना या सहा भगिनींच्या दहावी उत्तीर्ण होण्याचे एवढे कौतुक, एवढा अभिमान का असावा? दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणे, हा काही शैक्षणिक प्रगतीचा किंवा यशाचा आलेख असू शकतो का? हो असू शकतो. कारण, सातवी-जास्तीत जास्त आठवी शिकल्यानंतर त्यांचे लग्न झाले होते. शिकून काय करायचे? पतीसोबत शेती करायची, शेतमजूरी करायची आणि बाकीच्या महिन्यांमध्ये वीटभट्टीमध्ये किंवा शहरात बांधकाम मजूर म्हणून काम करायचे. कुटुंबाला जगविण्यासाठी कष्टाचा डोंगर उपसायचा. दोनवेळचे अन्न पोटात गेले की बस. त्याभोवतीच त्यांचे जगणे सुरू होते. यापलीकडे जगण्याचे संदर्भच नव्हते. भाकरीचे स्वप्न पाहताना माणूस म्हणवून जगण्याचे त्यांचे वास्तव हे स्वप्नच राहिले होते.
माणूस म्हणवून जगण्याच्या आयामातून बाहेर असणार्या या भगिनींसाठी, विकास, प्रगती म्हणजे काय, हा विचारही काही वर्षांपूर्वी ज्यांच्या जीवनात तर सोडाच मनातही नव्हता, अशा परिस्थितीतील नमिता भुरकुड, गीतांजली भुरकुड, अंजली फडवले, निकिता भुरकुड, अलका मेढा आणि जागृती फडवले या सहा भगिनी यंदा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांच्या यशाचा परामर्श घेताना भूतकाळाचा संदर्भ घ्यावाच लागेल. ज्या टेटवली गावाच्या सहा वनवासी भगिनी वयाच्या 35-40 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या, त्याच टेटवली गावामध्ये 2019 साली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ओस पडली होती. शाळा आहे, शिक्षक आहेत, पण विद्यार्थी कोठे आहेत? या बालकांचे आईबाबा कामानिमित्त गावाबाहेर गेलेले. सोबत लेकरांना घेऊन गेलेले. कोठे वीटभट्टी तर कोठे बांधकाममजूर म्हणून मजूरी करण्यात या मायबापांचे आयुष्य सरत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांचेही आयुष्य असेच अंधाराच्या दावणीला लागलेले. आईबाबांबरोबर गाव सोडून गेल्याने या बालकांच्या नशिबी शाळा नसायची. अल्पशिक्षितपणा, त्यातून बेरोजगारी, त्यातून गरिबी हे चक्र पिढ्यान्पिढ्या या बांधवांच्या नशिबी होते. हे चक्र भेदले, ते ‘केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पा’ने. या प्रकल्पाचे प्रमुख विमल केडीया यांना समाजाचा अभ्यास करताना जाणवले की, ग्रामीण भागातील वनवासी बांधवांच्या जीवनात खरा प्रगतीचा सूर्योदय व्हायचा असेल, तर त्यांच्या आयुष्यात स्वयंरोजगाराची पहाट व्हायला हवी. स्वकष्टाने, सन्मानाने त्यांना अर्थार्जन प्राप्त झाले, तर बांधवांच्या आयुष्यातही विकासाची गंगा नक्कीच उगम पावेल, असे विमल यांना ठामपणे वाटले. त्यामुळेच त्यांनी गौरव श्रीवास्तव यांना सांगितले की, “ग्रामविकास करताना स्वयंरोजगार हे उद्दिष्ट प्राथमिकतेने पूर्ण व्हायला हवे.”
‘चलो जलाये दीप वहाँ जहाँ अभी भी अंधेरा हैं,’ या मंत्राला शब्दशः जागत गौरव श्रीवास्तव यांनी टेटवली गावातून स्वयंरोजगार जागृतीसाठी सुरुवात केली. ग्रामस्थांची बैठक घेतली. पण अर्थातच सुरुवातीला प्रतिकूलताच वाट्याला आली. कारण स्वंयरोजगारासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक. काही महिने प्रशिक्षण घ्यायचे, तर मजुरी बुडवून ते प्रशिक्षण घ्यावे लागेल. मजुरी बुडवायची कशी? कामधंद्याची खोटी करायची कशी? या सगळ्या प्रश्नांनी बैठकीमध्ये प्रश्नचिन्ह उमटत असत. मात्र, अत्यंत सयंमितपणे सातत्य राखत ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत गौरव यांनी टेटवली ग्रामस्थांना स्वयंरोजगाराचे महत्त्व 2019 साली पटवून दिले होते. स्वयंरोजगारासाठी परिसरात मुबलक असलेल्या बांबूचा उपयोग करायचा असे. ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत गौरव यांनी ठरविले. अर्थात त्याला पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन विमल केडीया आणि केशवसृष्टीचे होतेच. त्यामुळेच टेटवली गावाच्या 25 महिला रोजगार प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्या. बांबूपासून उत्पादने निर्माण करण्याचे त्यांनी प्रशिक्षण घेतले. या महिलांनी बांबूपासून विविध उत्पादने बनविली. केशवसृष्टी आणि संबधित संघटनांच्यामार्फत या उत्पादनांचे मार्केटिंग आणि त्यान्वये पुढे विक्रीही झाली. सहा महिन्यांत या महिलांना लाख रुपयांचा फायदा झाला. त्याच काळात राज्य सरकारतर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेत या महिलांनी बांबूद्वारे उत्पादित केलेल्या वस्तूंना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
महिलांना राज्य सरकारचे हजारो रुपयांचे पारितोषिक मिळाले. पुढे सेवा इंटरनॅशनलच्या माध्यमातून याच महिलांनी बांबूपासून ऑटो रिक्षाचा नमुना बनविण्याचे लाख रुपयांचे कंत्राटही मिळाले. कोरोना काळात सगळे ठप्प झाले असताना, या महिलांनी बांबूपासून राख्या बनविण्याचा उद्योग सुरू केला. यातही त्यांना भरपूर नफा झाला. ग्रामविकासाचा हा प्रयोग यशस्वी होत होता. त्यामुळे आणखीन काही गावांमध्येही प्रशिक्षण योजना आणि त्याद्वारे स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे ग्रामविकास प्रकल्पाच्या अंतर्गत ठरविले गेले. आत पालघर परिसरातील 25 गावांमध्ये 750च्या वर लोकांनी स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांपैकी 350च्या वर लोक स्वावलंबी झालेले आहेत. संघटन, सेवा आणि विकासाचा आलेख वाढत गेला आणि 2023 साली विक्रमगड बांबू उद्योग प्रोड्युसर कंपनी लिमिटेड स्थापन झाली. ही कंपनी उभी राहण्यासाठी ‘केशवसृष्टी’चे सर्वच स्तरांचे पाठबळ आणि भूमिका निस्वार्थी पालकाची आहे. तसेच, या कंपनीचे विश्वस्त ते कर्मचारी सगळेच वनवासी समाजाचे बंधुभगिनी आहेत. या कंपनीच्या विश्वस्तांपैकी एक असलेल्या नमिता भूरकुड यासुद्धा यंदा दहावी उत्तीर्ण झालेल्या आहेत.
लहाणपणीच आई वारलेल्या आणि घरी 18 विश्व दारिद्य्र असलेल्या नमिता या नववी शिकलेल्या. पुढे दहावीपर्यंत शिकण्याची संधी मिळालीच नाही. कारण, विवाह झाला. त्यांचे पती मिस्त्री काम करतात. ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत बांबूपासून उत्पादन करण्याचे प्रशिक्षण घेतल्याानंतर त्या सलग पाच वर्षे काम करत आहेत. विवाह आणि मुलगा झाल्यावर इतक्या वर्षांच्या अडथळ्यांनतर पुन्हा दहावीची परीक्षा देणे, हे त्यांच्यासाठी एक आवाहनच होते. पण त्यांनी आणि इतर पाचजणींनी दहावीची परीक्षा देण्याचे ठरविले. त्याच काय, त्यांच्यासोबत दहावी उत्तीर्ण झालेल्या बाकीच्या पाचहीजणी पहाटे 4 वाजता उठत. घरचे-दारचे आवरून त्या अभ्यासाला बसत. तेथून कामाला जात. मधल्या वेळेत घरी येऊन स्वयंपाक करत. कपडे, भांडी घासणे इत्यादी कामे आवरत. ती कामे आवरून पुन्हा कामाला जात. रात्री पुन्हा घरातील कामे होतीच. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. याबाबत नमिता म्हणतात, “आम्ही अल्पशिक्षित असताना केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पाने बांबू उद्योगातून आमच्या आयुष्यात इतके चांगले परिवर्तन आणले. आम्ही जर शिकलेले असतो तर? आमची आमच्या कुटुंबाची, गावाची आणि समाजाचीही किती प्रगती झाली असती, असा विचार आमच्या मनात यायचा. त्यातच विमल सर आणि गौरवसरही आम्हाला नेहमी प्रोत्साहित करायचे. शिकलात तर प्रगती होईल, म्हणायचे. विमल सरांनी तर सांगितलेले आहेच, प्रामाणिक कष्टाशिवाय पर्याय नाही आणि शिक्षणाशिवाय मार्ग नाही. या सगळ्यामुळे आम्हाला वाटले की, आता पोटापाण्यासाठी भटकायचे दिवस संपले आहेत. आता शिक्षणाची संधी मिळत असेल तर शिकायचेच. याच जिद्दीने आम्ही सहाजणींनी दहावीची परीक्षा दिली. आता आम्ही बारावीची परीक्षा देणार आहोत.
पुढे त्यानुसार उच्चशिक्षण घेऊन आमच्या समाजामध्ये स्वयंरोजगार आणि शिक्षणाचा टक्का वाढावा, यासाठी काम करणार आहोत. आम्ही दहावी उत्तीर्ण झालो, हे पाहून समाजातील अनेकजणी आता सुटलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुढे येत आहेत.” हे सगळे पाहिले की वाटते, खरेच दहावीची परीक्षा ही या भगिनींच्या आयुष्यातील परिवर्तनाची नांदी आहे. हे सगळे पाहून वाटते की, हे यश फक्त त्या भगिनींचेच नाही, तर प्रतिकूलतेच्या अंधारात चाचपडत असताना एक संधी मिळाल्यावर त्याचे सोने करणार्या सर्वांचे आहे. असो. देशभर वनवासी भागांत प्रवास करताना पाहिले आहे की, कम्युनिस्ट किंवा तत्सम लोकांनी विकासाच्या नावावर वनवासी बांधवाना हक्कासाठी तीव्र आंदोलन वगैरे करायला शिकविले. न्यायालयात खटले टाकून त्या खटल्यांसाठी पिढ्यान्पिढ्या कामधंदे सोडून रडारड करायला शिकविले आणि या सगळ्याला ‘लढणे’ असे म्हणायलाही शिकविले. अर्थात हे काय सर्वार्थाने अर्थहीन नाही. मात्र, नुसते आंदोलन करणे आणि न्यायालयीन कचेर्या करणे यातून वनवासी बांधवांचा विकास काय झाला, हे एक संशोधनच आहे. आपल्या संस्कृतीशी, आपल्या मातीशी, आपल्या देशाशी त्यांची जोडलेली नाळ कायम राखत या समाजाने स्वावलंबी व्हावे, यासाठी हे कोणीही प्रयत्न करताना दिसले नाहीत. जलजंगल जमीनीच्या नावाने या लोकांनी वनवासी बांधवाना देशाच्या मुख्य धारेपासून दूर ठेवण्याचाच प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर ‘केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पा’अंतर्गत चालणारे काम खर्या अर्थाने देश आणि समाजाच्या हिताचे आणि वनवासी बांधवांच्या कल्याणाचेच आहे. ‘चलो जलाये दीप वहाँ जहाँ अभी अंधेरा हैं,’ या मंत्राने सुरू झालेला ‘केशवसृष्टी ग्रामविकास प्रकल्पा’चा प्रवास आता मार्गक्रमण करत आहे, या विश्वासाने की,
परिवर्तन की पावन आँधी लाकर ही हम लेंगे दम।
संघ शक्ति के रुप में देखो अब हो रहा सवेरा हैं।