रोम : ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावर समलैंगिक पुरुषांबद्दल असभ्य टिप्पणी केल्याचा आरोप होत आहे. इटालियन वृत्तपत्रांनी हा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवड्यात दि. २० मे रोजी पोप फ्रान्सिस यांनी बंद दाराआड बैठक घेतली होती. येथे त्यांनी समलैंगिक लोकांसाठी इटालियन भाषेत अतिशय आक्षेपार्ह शब्द वापरला.
पोप फ्रान्सिस यांनी समलिंगी पुरुषांचे वर्णन करण्यासाठी 'फॅगॉट' हा शब्द वापरला, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. पोप फ्रान्सिस यांनी इटालियन बिशपांना समलिंगी पुरुषांना पुरोहितपदासाठी प्रशिक्षण देऊ नये, असे आवाहन केले आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, इतर इटालियन वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने पोपच्या या विधानाला दुजोरा दिला आहे.
पोप फ्रान्सिस यांच्या आक्षेपार्ह विधानावर व्हॅटिकन चर्चने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. फॅगॉट हा शब्द सामान्यतः समलैंगिक पुरुषांच्या अश्लील वर्तनाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. यावर एलजीबीटी समुदायाने टीका केली आहे. पोप फ्रान्सिस याआधी एलजीबीटी समूहातील लोकांविषयी उदार विचार व्यक्त करत आलेले आहेत. त्यांनी समलैंगिक लोकांचे चर्चमध्ये स्वागत असल्याचे विधान देखील याआधी केलेले आहे.
पोप फ्रान्सिस यांनी याआधी समलिंगी विवाहाचे समर्थन केले होते. पुरोहितांनी काही विशिष्ट परिस्थितीत समलिंगी जोडप्यांना आशीर्वाद दिला पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. समलिंगी विवाहाचे समर्थन करणाऱ्या पोपच्या वक्तव्यानंतर व्हॅटिकन सिटीने प्रत्येकाला देवाचे आशीर्वाद आणि त्याचे प्रेम मिळण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. पोपच्या पुरोगामी विधानांनंतर, असे मानले जात होते की भविष्यात तो समलिंगी पुरुषांना पाद्री बनण्यासाठी प्रशिक्षण देऊ शकेल. पण, पोपच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.