येसूवहिनी, माई आणि ताई या तिघींची धाटणी, विचारपद्धती, स्वभाववैशिष्ट्ये अतिशय वेगळी; पण एकमेकींना सावरत, सांभाळत एकाच मार्गावर त्या निष्ठेने चालत राहिल्या. या स्त्रीत्वाच्या परमोच्च संकल्पनेने मी भारावून गेले आणि या तिघींवर एकपात्री नाटक करायचे, असे ठरवले. एकाच स्त्रीने तीन वैविध्यपूर्ण, वयाने भिन्न, पण एकच विचारधारा निभावून नेणारी पात्रे साकारायची. त्यात एकपात्री नाटकामुळे अभिनेत्री म्हणून माझा पण कस लागणार होता. त्यामुळे हे आव्हान मी आनंदाने स्वीकारले.
'त्या तिघी - स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ हे आमचे नाटक. सावरकर घराण्यातील स्त्रियांचा विषय घेऊन नाटक करावे, असे काहीच मनात नव्हते. शिक्षणाने औषधनिर्माण शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन काही काळ कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्यावर अगदी योगायोगाने, ध्यानीमनी नसताना कला क्षेत्राकडे वळले आणि व्यावसायिक अभिनेत्री, कलाकार म्हणून काम सुरू केले. शाळा-महाविद्यालयामध्ये असताना अभिनयाकडे ओढा होताच, पण शैक्षणिक स्नेहसंमेलनाव्यतिरिक्त कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. घरातसुद्धा दूर दूरपर्यंत कोणीच या क्षेत्राशी निगडित नव्हते. तेव्हा एकदम अनोळखी, अनभिज्ञ क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या हेतूने, काहीतरी छान, नावीन्यपूर्ण, याआधी कधीच सादर न झालेले काहीतरी, एखाद्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणावे, असे सारखे डोक्यात होते, जणू ध्यासच घेतला होता. या विचारात असतानाच, वाचनाच्या आवडीतून माझ्यासमोर, सावरकर घराण्यातील स्त्रियांवर आधारित डॉ. शुभा साठे लिखित ‘त्या तिघी’ ही कादंबरी आली. मराठी माध्यमात शिक्षण झाल्याने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, त्यांचे क्रांतिकार्य, देशकार्य या सगळ्याबद्दल पुरेपूर कल्पना होतीच. त्याविषयी मनात नितांत आदरही होता.
सावरकर बंधूंबद्दलदेखील (गणेश उपाख्य बाबाराव आणि डॉ. नारायणराव) माहिती होती. पण, जेव्हा मी ‘त्या तिघी’ ही कादंबरी वाचायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आले की, या तिन्ही बंधूंच्या पत्नींनीदेखील अनंत यातना, प्रचंड हालअपेष्टा, अपत्यविरह, पतीविरह सोसत, सामाजिक अवहेलना झेलत, प्रसंगी धारिष्ट्य दाखवित आपल्या पतींच्या राष्ट्रकार्याची धुरा अत्यंत निष्ठेने सांभाळली. यशोदा गणेश सावरकर (येसूवहिनी), यमुना विनायक सावरकर (माई) आणि शांता नारायण सावरकर (ताई) या तिघींनी सावरकर बंधूंना फक्त वैयक्तिक नाही, तर त्यांच्या राष्ट्रकार्यातही अतिशय विपरित परिस्थितीत खंबीर साथ दिली आहे. पण, काळाच्या ओघात या तिघींची ही साथ, त्यांचं आयुष्य, त्यांचे कार्य, त्यांचे बलिदान हे अज्ञात राहिले. या तिन्ही समिधा स्वातंत्र्याच्या होमकुंडात जळत राहिल्या. पण, त्यांची दखल घेतली गेली नाही आणि हे लोकांसमोर, समाजासमोर यावे, हा अज्ञात इतिहास प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचावा, असे जाणवले आणि ज्या विषयाच्या मी शोधात होते, तो विषय हाच आहे, असे मनोमन वाटले.
महापुरुषांच्या पत्नींचा त्याग, त्यांचे कार्य, सर्वसामान्य माणसांच्या चाकोरीत न बसणार्या पतींमुळे झालेली सांसारिक ससेहोलपट, त्यांच्या पतींच्या कार्याच्या तेजाने कायम दुर्लक्षित, कालातीत राहिली आहे. ‘त्या तिघी’ कादंबरी वाचताना हे फारच प्रकर्षाने जाणवत राहिले. कारण, सावरकर बंधूंच्या बाबतीत बोलायचे झाले, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सहधर्मचारिणी म्हणून यमुनाबाईंचा उल्लेख निदान ओघाने होत राहतो. पण, येसूवहिनी आणि शांताबाईंबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल फारसा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे या तिघींच्याही संघर्षाला एकत्रितपणे लोकांसमोर आणण्यासाठी या ‘तिघीं’च्याही आयुष्यावर आधारित नाटक करायचे, हा विचार खोलवर रुजला गेला. या तिघींबद्दल वाचताना अजून एक गोष्ट लक्षात आली की, या तिघीजणी एकमेकींच्या जावा असून, वेगळ्या घरातून, संस्कारांमधून येत सावरकर घराण्यात रुजल्या, रुळल्या आणि परिस्थितीला सामोर्या जात एकमेकींचा आधार झाल्या. रूढ अर्थाने जिथे आपण नेहमी म्हणतो की, ‘दोन बायकांचे पटणे अवघड,’ तिथे तीन जावा एकमेकींसाठी समर्थपणे उभ्या राहिल्या, एकमेकींची सावली झाल्या. तिघींची धाटणी, विचारपद्धती, स्वभाववैशिष्ट्ये अतिशय वेगळी, पण एकमेकींना सावरत, सांभाळत एकाच मार्गावर निष्ठेने चालत राहिल्या. या स्त्रीत्वाच्या परमोच्च संकल्पनेने मी भारावून गेले आणि या तिघींवर एकपात्री नाटक करायचे, असे ठरवले. एकाच स्त्रीने तीन वैविध्यपूर्ण, वयाने भिन्न, पण एकच विचारधारा निभावून नेणारी पात्रे साकारायची. त्यात एकपात्री नाटकामुळे अभिनेत्री म्हणून माझा पण कस लागणार होता. त्यामुळे हे आव्हान मी आनंदाने स्वीकारले.
सगळ्यात मोठ्या येसूवहिनी. अतिशय धीरोदात्त, करारी पण सोशिक. बाबारावांना योगी होण्याचे वेध लागलेले असताना, प्लेगला सामोरे जात, प्रसंगी आपले स्त्रीधन विकत धाकट्या दीरांना अपत्यवत मानून त्यांच्या शिक्षणाला हातभार लावला. परिस्थिती नसतानाही आपल्या दोन्ही धाकट्या जावांचे अनेक महत्त्वाच्या प्रसंगी कोडकौतुक केले. मधल्या माई. गडगंज श्रीमंतीत वाढलेल्या. पण, सावरकरांच्या खाऊन-पिऊन सुखी असलेल्या कुटुंबात आनंदाने रुळल्या. दोन्ही अपत्य देवाघरी गेल्याने दुखावलेल्या येसूवहिनींसाठी माईंनी त्यांचा प्रभाकर येसूवहिनींना जवळ केला आणि शेवटच्या ताई म्हणजे शांताबाई. १९१५ साली, त्यांनी वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी, समाजाने जहाल क्रांतिकारक म्हणून वाळीत टाकलेल्या सावरकरांच्या घरात स्वेच्छेने डॉ. नारायणरावांशी विवाह केला आणि देशसेवेचे आणि संपूर्ण सावरकर कुटुंबाच्या सेवेचे व्रत घेतले. या तिघींचे एकंदरीत आयुष्य बघता रूढ अर्थाने, त्यांना समाजाची, प्रेक्षकांची सहानुभूती मिळण्याची शक्यता जास्त होती. पण, या नाटकाची संकल्पना सुचल्यापासून, हे नाटक येसूवहिनी, माई, आणि ताई या तीन वीरांगनांची शौर्यगाथा म्हणूनच प्रेक्षकांसमोर आणायचे, हे मी (पान ७ वरून) ठामपणे ठरवले होते.
समाजाने वाळीत टाकलेले असताना, घरावर जप्ती आलेली असताना, पतीविरह, अपत्यविरह सहन करत, अतिशय प्रतिकूल परिस्थितीला सामोर्या जात, ज्या काळात स्त्रिया घराचा उंबराही ओलांडत नव्हत्या. तत्कालीन परिस्थितीत स्त्री संघटन करत ‘आत्मनिष्ठ युवती संघा’मार्फत आपल्या पतींच्या अपरोक्ष स्वातंत्र्यलढा सुरू ठेवला. अशा स्त्रिया या केवळ वीरांगनाच असू शकतात आणि एक स्त्री कलाकार म्हणून ‘त्या तिघी’ याच धाटणीने समाजासमोर मांडणे मला सार्थ वाटले. या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे साधण्याचा प्रयत्न करत नाटकाचे संहितालेखन सुरू केले. वस्तुनिष्ठ प्रसंग निवडत, संहितेची बांधणी केली आणि व्यक्तिरेखांचा अभ्यास करत आठ महिन्यांच्या कालावधीत नाटकाची संहिता पूर्ण केली. संहितेचे लिखाण स्वतः केल्याने, नाटक अक्षरशः डोळ्यांसमोर तरळू लागले. नाटक हे मुख्यत्वे मनोरंजनाचे माध्यम आहे. या वस्तुस्थितीचे भान ठेवून, विषयाच्या भावनिक प्रेमात न पडता, ते बसवायचे होते. तत्कालीन स्त्रियांचे भावविश्व हे त्यांच्या घरात, विशेषत्वाने माजघरात, देवघरात जास्त रमलेले असे. शिवाय, रंगभूषा आणि वेशभूषेतूनसुद्धा स्वातंत्र्यपूर्व काळ उभा करायचा होता. त्यामुळे संहितालेखनाबरोबरच नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा, दिग्दर्शन, निर्मिती आणि सादरीकरण या सगळ्या बाबी सांभाळत नाटकाला सुरुवात केली. पहिल्या प्रयोगाचा अनुभव फारच विलक्षण होता. १ तास, ४० मिनिटे सलग, एकटीने न थांबता, नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजनेचा ताळमेळ साधत प्रयोग करणे म्हणजे एक कलाकार म्हणून प्रचंड कस लावणारे होते.
प्रयोग उत्तम झाला. प्रेक्षकांना हा आगळावेगळा प्रयोग खूप आवडला आणि त्याने जो परिणाम साधायचा होता, तो आम्हा सगळ्यांचा प्रयत्न सार्थ ठरला. कलाक्षेत्राकडून याची पोचपावती म्हणून या नाटकासाठी २०२१चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि प्रकाशयोजनेसाठी मानाचा ‘मटा सन्मान’देखील मिळाला. आमचा सगळा संघ पुण्याचा असल्याने सुरुवातीचे काही प्रयोग पुण्यात केले आणि मग प्रयोगांनी जोर घेत आम्ही ठाणे, बेळगाव, वाशी, पनवेल, नाशिक, यवतमाळ, रत्नागिरी, सांगली, जळगाव, मुंबई असे अनेक प्रयोग केले. या प्रवासात आम्हाला खूप चांगले आयोजक भेटत गेले. काही या नाटकाच्या प्रेमाखातर, तर काही विषयाच्या प्रेमाखातर प्रयोग आयोजित करत गेले. विशेष म्हणजे, बर्याच आयोजकांनी प्रेक्षकांत बसून प्रयोग बघून आम्हाला हे नाटक आमच्या येथे करायचे आहे, असे स्वतःहून सांगत प्रयोग, दौरे आयोजित केले. असे नाटकाचे दौरे सुरूच होते. पण, तेवढ्यात परिस्थितीने त्याला खीळ घातली आणि कोरोनाच्या महामारीने आपण सगळेच जायबंदी झालो. तेव्हा आम्हा कलाकारांसाठी फार कठीण काळ होता. मानसिकदृष्ट्या स्थिर राहण्यासाठी मी माझी वाचनाची आवड जवळ केली आणि घरातली सगळी पुस्तके, त्या तिघींच्या व्यक्तिमत्त्वांसाठी केलेले संशोधन पुन्हा एकदा चाळायला सुरुवात केली.
या तिघींमुळे मी आधीच भारावले होते, येसूवहिनींमुळे जास्तच आणि त्यात नव्याने सगळे संशोधन बघताना मला येसूवहिनींशी संलग्न सर्व माहिती अतिशय विस्कळीत आढळली. त्यात मधल्या काळात, येसूवहिनींनी स्वातंत्र्यवीरांच्या लहानपणीच्या आठवणी सांगणारी एक ३६ पानी दैनंदिनी लिहिली होती, असे कळले. त्यामुळे ही सगळी माहिती, त्यांच्या आईवडिलांची नावे आणि माहेरची वास्तू, जी एका स्त्रीसाठी आपल्या सासरच्या मानाएवढीच महत्त्वाची असते, शोधून काढत, एकसंध, एका संशोधनपर पुस्तकात द्यावी, या हेतूने येसूवहिनींवर आधारित ‘तू धैर्याची अससी मूर्ती’ हे संशोधनपर पुस्तक लिहिले. येसूवहिनींवरील पुस्तक लिहिताना मला अजून एक गोष्ट जाणविली. हे सगळे संशोधन करत असताना शांताबाईंच्या आठवणींवर आधारित कमलताई काळे लिखित ‘हरिदिनी’ या खूप जुन्या पुस्तकाची माझ्याकडे छायांकित प्रत होती. हे पुस्तकच मुळात १९८५ साली निवडक प्रतींनिशी प्रकाशित झाले होते. त्यामुळे बाजारात उपलब्ध नव्हते. तेव्हा हे पुस्तक नव्याने सगळ्यांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पुनर्प्रकाशित करायचे ठरवले. देशसेवेचा वसा जपणार्या शांताबाईंच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी उजागर व्हाव्यात, या हेतूने शांताबाईंच्या स्नुषा, स्वामिनीताईंबरोबरचे सासू म्हणून आणि आपल्या नातींबरोबरचे आजी म्हणून असलेले गोड नाते सांगणार्या मुलाखती शब्दांकित करून ‘हरिदिनी’ या पुस्तकात संपादित केल्या. ही दोन्ही पुस्तके सात्यकी सावरकर यांच्या ‘मृत्युंजय प्रकाशना’मार्फत प्रकाशित केली आणि सांगायला अतिशय आनंद होतो की, या दोन्ही पुस्तकांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या विषयाच्या, नाटकाच्या आणि पुस्तकांच्या निमित्ताने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, जेव्हा हे नाटक सुरू केले होते, तेव्हा मी कलाक्षेत्रात धडपडू पाहणारी एक मुलगी होते. पण, या नाटकाने मला माझ्यातल्या स्त्रीत्वाचा शोध घ्यायला लावला. माझ्या ठायी असलेल्या स्त्रीत्वाचे भान उजळविले. सुदैवाने हा वसा माझ्या पदरी आला आणि येथून पुढे तो असाच चालू ठेवण्याचा, इतरांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न मी माझ्यापरीने करीत राहीन. आजघडीलाही या नाटकाचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर अविरतपणे सुरू आहेत आणि त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. पण, अजून खूप पल्ला गाठायचा आहे, या ध्यासाने कायम हे नाटक सादर करीत राहीन आणि ‘त्या तिघीं’चा हा अज्ञात इतिहास, ही शौर्यगाथा प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत राहीन.
सावरकर कुटुंब : डावीकडून बसलेले : डॉ. नारायणराव (बाळ), गणेश तथा बाबाराव सोबत तात्यारावांची कन्या प्रभात, स्वातंत्र्यवीर वि. दा. तथा तात्याराव सावरकर. मागे डावीकडून उभे असलेले : शांताबाई नारायण सोबत पुत्र अशोक नारायण सावरकर, बहीण मैना किंवा माई काळे, यमुनाबाई (माई) विनायक सोबत पुत्र विश्वास विनायक सावरकर. (छायाचित्र सौजन्य : www.savarkar.org)
अपर्णा चोथे