घुसखोरी केली, बनावट ओळखपत्र बनवले! बांगलादेशी घुसखोरांना कोर्टाने सुनावली ८ महिन्यांची शिक्षा

    27-May-2024
Total Views |
 Bangladeshi
 
 
मुंबई : भारतात बेकायदेशिररित्या घुसखोरी करणाऱ्या २० बांगलादेशींना मुंबईतील न्यायालयाने आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी चार हजार रुपयांचा दंडही वसूल करण्याचा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास त्यांना १६ महिन्यांची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करणे आणि बनावट ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे बनवल्याबद्दल न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. शुक्रवार, दि. २४ मे २०२४ शिक्षेची घोषणा करण्यात आली.
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईच्या बोरिवली पोलिसांना बेकायदेशीरपणे उपस्थित असलेल्या बांगलादेशींची माहिती मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून ३ बांगलादेशींना अटक केली. त्यांच्या चौकशीच्या आधारे नालासोपारा, विरार आणि पुणे येथून आणखी १७ घुसखोरांना अटक करण्यात आली. पोलिसांनी तपास करून या सर्वांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
 
 
तपासादरम्यान पोलिसांचे पथक महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच्या अनेक भागात गेले. अटक केलेल्या घुसखोरांकडून बेकायदेशीरपणे बनवलेले भारतीय ओळखपत्र आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या बांगलादेशींना भारतात स्थायिक करून सुविधा पुरवणाऱ्या काही दलालांनाही पुण्यातून अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत घुसखोरीला मदत करणाऱ्या काही पोलिस अधिकाऱ्यांची नावे समोर आली.
  
घुसखोरांची बेकायदेशीर कागदपत्रे तयार करण्यात त्यांनी दलालांना सहकार्य केले होते. पुणे पोलिस आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तैनात असलेल्या काही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली. या सर्वांविरुद्ध मुंबईच्या फोर्ट कोर्टात सुनावणी झाली. बचाव पक्ष आणि फिर्यादी या दोघांनीही न्यायालयात आपली बाजू मांडली.
 
  
शुक्रवारी न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेले पुरावे दोषी ठरविण्यासाठी पुरेसे मानले. सर्व २० बांगलादेशी घुसखोरांना प्रत्येकी आठ महिने कारावास आणि प्रत्येकी चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सर्व घुसखोरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना बांगलादेशकडे सोपवण्यात येणार आहे. अहवालानुसार, त्यापैकी अनेकांना भारतीय ओळख वापरून बनवलेले पासपोर्टही मिळाले होते. या पासपोर्टच्या आधारे तो परदेशात जाण्याचा विचार करत होते.