ईशनिंदेचे बळी...

    26-May-2024   
Total Views |
mob-attacks-christians-in-pakistan


सध्या पाकिस्तानमध्ये सुरक्षित जीवन नावाची गोष्टच अस्तित्वात राहिलेली नाही. पाकिस्तानी नागरिक आधीच महागाईने होरपळलेले. त्यात कडबोळे शरीफ सरकार आल्यापासून, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेलाही उतरती कळा लागली. पाकिस्तानमध्ये अन्य धर्मीय नागरिकदेखील सुरक्षित राहिलेले नाही. फाळणीनंतर तब्बल २३ टक्के असलेले हिंदू आता पाकिस्तानात फक्त १.८ टक्के. त्याउलट भारतात मात्र मुस्लिमांची संख्या न घटता नेहमी वाढत गेली. भारतात मुस्लीम सुरक्षित असतानाही, पाकिस्तानमध्ये हिंदू धर्मीयांवरील हल्ले थांबलेले नाहीत. हिंदूंबरोबरच पाकिस्तानात ख्रिश्चन धर्मीय नागरिकदेखील सुरक्षित राहिलेले नाहीत.

नुकताच पाकच्या पंजाब प्रांतात दोन ख्रिश्चन कुटुंबांवर मुस्लीम जमावाने हल्ला केला आहे. ईशनिंदेच्या आरोपावरून हा हल्ला करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीमुळे दोन्ही कुटुंबांचा जीव वाचला. या हल्ल्यानंतर परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले. या हल्ल्यात एक पीडित जखमी असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या हल्ल्यात एका चर्चलाही लक्ष्य करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत २५ हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. पाकच्या सरगोधा जिल्ह्यातील मुजाहिद कॉलनीत राहणार्‍या या दोन ख्रिस्ती कुटुंबांच्या घरात जोरदार घोषणाबाजी करत घुसण्याचा जमावाचा बेत होता. हल्लेखोरांनी पीडितेच्या कुटुंबीयांवरही दगडफेक केली.
 
ख्रिश्चन कुटुंबातील सदस्यांनी, इस्लामविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप हल्लेखोर जमावाने केला आहे. नजीर मसीह असे पीडित कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव आहे. त्यांचा बुटांचा व्यवसाय आहे. नजीरच्या बुटांच्या कारखान्याला जमावाने आग लावली. दुकानही लुटून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली. विशेष म्हणजे, पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने या घटनेवर चक्क चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये मानवाधिकार आयोग अस्तित्वात आहे, हेच मुळात एक आश्चर्य. इतकी सरकारे आली आणि गेली, हिंदूंची संख्या झपाट्याने कमी होत गेली, मात्र, मानवाधिकार आयोगाला कधीही चिंता वाटली नाही. त्यामुळे आता ख्रिस्ती कुटुंबावर हल्ला झाल्यानंतर चिंता व्यक्त करून हाती काहीही लागणार नाही, हेही तितकेच सत्य आहे.

पाकिस्तानमध्ये कडबोळ्याचे सरकार सध्या कार्यरत आहे. माजी पंतप्रधान इमरान खान यांना पाकिस्तानच्या राजकारणातून हद्दपार कसे करता येईल, यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्यात आले. आताही पुन्हा एकदा शाहबाज शरीफ पाकिस्तानचा कारभार सांभाळत आहेत. मुळात सरकार कोणतेही असो, पाकिस्तानची स्थिती आहे तशीच आहे. भारत चंद्रावर जाऊन पोहोचला, याचेही पाकिस्तानी नागरिकांना दुःखच झाले. दुसर्‍यांना सुखी आणि विकसित झालेले पाकिस्तानला कधी बघवले नाही. त्यासाठी मग अशांतता पसरविण्यासाठी पाकिस्तानने अनेक हातखंडे वापरले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, नुकतीच पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच चिनी नागरिकांचा मृत्यू झाला होता. आता या मृतांच्या नागरिकांना पाकिस्तान ७२ कोटी रुपये नुकसानभरपाई म्हणून देणार आहे. दहा महिन्यांपूर्वी पाकच्या सिंध प्रांतातील, काशमोर येथे हिंदू मंदिरावर रॉकेट लॉन्चरने हल्ला करण्यात आला. २०२१ साली पूर्व पंजाब प्रांतात भोंग येथील हिंदू मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. हिंदूंसह ख्रिश्चन आणि शीख समुदायावरही पाकिस्तानमध्ये अत्याचार होत आले आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये १८ लाख, ७३ हजार ख्रिश्चन आहेत, तर हिंदूंची संख्या जवळपास २२ लाख इतकी आहे.

सातत्याने या संख्येत घट होत आहे. आधी हिंदूंवर हल्ले नित्याचेच होते, मात्र आता अन्य धर्मीयदेखील पाकिस्तानात सुरक्षित राहिले नाही. भारतात ‘सीएए’-‘एनआरसी’ला विरोध करणारे मात्र पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांवर होणार्‍या हल्ल्यांबाबत हे सगळे विरोधक मूग गिळून गप्प बसले आहेत. पाकिस्तान रसातळाला जातोय, तो त्याच्या कर्माने मात्र त्यात भरडले जाताहेत निष्पाप हिंदू आणि आता ख्रिश्चनही!

७०५८५८९७६७

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.