दि. २८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. त्यानिमित्ताने लेखिका अश्विनी जांभेकर-पितळे लिखित ’क्रांती ऋचा : सावरकरांच्या काव्याचे रसग्रहण’ हे पुस्तक विवेक प्रकाशनतर्फे २ जूनला प्रकाशित होत आहे. कवी म्हटला की, कवी वास्तवात जगणारा नसतो, तो स्वप्नरंजन करण्यात मग्न असतो. परंतु, सावरकर वास्तवात जगणारे कवी होते. ते द्रष्टे होते. सावरकरांची कविता सामान्य रसिकापासून सुजाण समीक्षकापर्यंत सर्वांनाच रुचणारी आहे. या पुस्तकात तीन खंडकाव्ये आणि १२ स्फुट काव्याचे रसग्रहण वाचकांना करता येणार आहे. खास वाचकांसाठी पुस्तकातील एका कवितेचे रसग्रहण येथे देत आहोत.
विरहोच्छ्वास
कालिदासाच्या ‘मेघदूत’नंतर इतकं उत्कट, विदग्ध विरहकाव्य जर झालं असेल, तर ते केवळ सावरकरांनी लिहिलेलं ‘विरहोच्छ्वास’. ‘विरहोच्छ्वास’ या खंडकाव्याची रचना सावरकरांनी १९१५ साली केली. ‘कमला’ काव्यामध्ये मुकुंद आणि कमला यांच्या अनुषंगाने वाचकाला मुकुल आणि प्रेमला यांची ओळख होते. मुकुल हा मुकुंदाचा जीवश्चकंठश्च मित्र आणि प्रेमला ही कमलेची जुळी बहीण आहे; हीच दोघं या काव्यात नायक आणि नायिका म्हणून आहेत.मुकुल आणि प्रेमला हिंदुपदपादशाहीसाठी लढताना, प्रेमलाच्या तुकडीची आणि त्याची ताटातूट होते आणि तो मुसलमानांच्या हाती लागतो. त्याला अंधारकोठडीत टाकण्यात येतं. त्या कोठडीत तो मृत्यूची वाट बघत प्रियेच्या आठवणीत झुरतो आहे. त्याच्या मनात उठणार्या आशा-निराशेच्या झुल्यावर त्याचं मन हिंदोळे खात आहे. शत्रू त्याला शरण आणण्यासाठी कधी त्याला मृत्यूचं भय दाखवतो, तर कधी प्रियेची भेट घालून देण्याचं आमिष दाखवतो. आतून व्याकूळ, हळवा झालेला मुकुल, सहकार्यांचा धीर सुटू नये म्हणून वरपांगी कठोर असल्याचं दाखवतो. वीर पुरुष कितीही धीराचा असला तरी आहे तो मनुष्यच ना! विरह विकल मन आणि कर्तव्य यातलं द्वंद्व सतत त्याच्या मनात सुरू असतं आणि तेच या काव्याला एका उंचीवर नेऊन ठेवतं.आठवणी या मधाच्या पोळ्याप्रमाणे असतात. मध चाखायचा असेल तर मधमाशांचा दंश सहन करावा लागतो. प्रियेच्या मधुर सहवासाची आठवण जितकी मधुर तितकाच तिचा विरह दंश करणारा. मुकुल तिच्या सहवासात घालवलेल्या क्षणांमध्ये रमून गेला आहे. प्रियेच्या सहवासात काळाचं भान राहत नाही. मात्र, त्याच घटिका आता एका एका युगाप्रमाणे त्याला भासत आहेत.
ना लागेना गोड आता मज काही!
मज कुठेही करमत नाही!
ये विजनां त्रासूनि जनी मी आणी
त्रासूनि जना मी विजनी!
मी केश पुन्हा विंचरी, पुन्हा विखुरी!
अशी त्याची परिस्थिती होते. प्रसंगी तो अतिसंवेदनशील होतो. तो विचारतो की, मूर्तिभंजकाने माझी जिवाभावाची मूर्ती कुठे नेऊन ठेवली? देऊळच सुने झाल्यावर मी माझी भावसुमने कोणाला वाहणार? अशा वेळी त्याला स्मरतात ती विरहाची अजरामर असलेली उदाहरणं. त्याला स्मरते श्रीकृष्णाची बासरी, कालिदासाचे ‘मेघदूत’, शहाजहानचे ताजमहाल आणि रतिक्रीडेत क्रौंच पक्ष्याची जोडी दंग असताना व्याधाने मारलेला बाण. यांची आणि माझी विरहवेदना वेगळी नाही याची जाणीव त्याला अस्वस्थ करते. त्याला आठवतं प्रेमलाचं घेतलेलं चुंबन. ज्याप्रमाणे द्राक्षाची, आंब्याची, मधाची गोडी वेगवेगळी असते, तशी ओठांची गोडी काही न्यारीच! सावरकरांनी या ठिकाणी विरोधाभासाचा (ळीेपू) फार कल्पकतेने वापर केला आहे. ते म्हणतात, “चुंबन हे फार सुरेल आणि बोलकं असतं. ज्याने त्याला मुका असं नाव दिलं, तो खराच दुर्दैवी म्हणावा लागेल.”
वर्ड्सवर्थने काव्याची व्याख्या, Spontaneous overflow of powerful feelings - उत्स्फूर्त भावनांचा उद्रेक अशी केली होती. त्याला पुढे त्याने ’emotions recollected in tranquility' - एकांतात, शांततेत आठवलेल्या भावना अशी नंतर जोड दिली. ‘विरहोच्छ्वास’ किंवा ‘कमला’ ही दोन्ही काव्ये या व्याख्येमध्ये चपखल बसणारी आहेत. हा विरहवेदनेचा उद्रेक आहे, जो काळकोठडीच्या एकांतवासात आठवून, आळवून शब्दरूप घेतो आहे. मला नेहमीच प्रश्न पडतो, ज्या कोठडीच्या भिंतीवर काव्य रचलं गेलं, त्यापेक्षा त्या कोठडीच्या पोकळीत किती काव्य भरून असेल! अजिंठा, वेरूळच्या लेण्यांमधल्या शिल्पांमध्ये इतकं लावण्य नसेल, जितकं त्या अंदमानच्या भिंतीवर कोरलेल्या अक्षरांत आहे. ते अमर भावशिल्प आहे!‘स्वप्नरंजन’ हा प्रेमाचा एक अपरिहार्य भाग आहे. क्वचित संभवनीय आशा, रम्य अशा स्वप्नांमध्ये प्रेमी हरवून जातो. काव्यप्रयोजन विचारात स्वप्नरंजन येतं. कवी ज्याप्रमाणे कटू वास्तवाचा विसर पडावा म्हणून लिहीत असतो, त्याचप्रमाणे वाचकालासुद्धा हा विसर हवा असतो. अशाच स्वप्नरंजनात मुकुल हरवून जातो. स्वप्नरंजनाची अनेक उदाहरणं काव्यात विखुरलेली आहेत. उदा :
चालता पदपथी भाजे।
चिमुकल्या तया पर्ण कुटिशि तो दिससी
तू उभी कुमारी मजसी!
मज पालविसी जेथ बकुलीच्या खाली
फुलसडा सेज मऊ घाली
ओतिशी कडेची कळशी
पी भरुनि भरुनि अंजलिशी (मी)
अणि पुढे निघेल्या सरशी
अधिकाची बळे, उ : तृषा जळे, त्या तुझ्या जले!
परतलो पुन्हा! - तेथ चेटकी तू ना!
छळी विरहवेदना प्राणा!
ही प्रेमतृष्णा आहे! कधीही न शमणारी तहान आहे. याच्याच पुढच्या कडव्यातसुद्धा असंच स्वप्नरंजन आहे.
जै जाग मधुनि ये शयनी
मम कंठि करा गुंफोनी
तुज बघुनि निजेले, फिरुनी
कधि पिइन या, हिमकराचिया, नव उदित तया,
तव मुखावरी मधुर खेळल्या किराणा!
विरहअग्नीत मुकुल जळत असला तरी कर्तव्याचा यत्किंचितही विसर त्याला पडलेला नाही. तो केवळ प्रेमलेच्या मीलनाची स्वप्नं रंगवत नाही, तर ‘हिंदुपदपादशाही’ साकार झाल्याची स्वप्नंसुद्धा बघतो.‘कमला’ काव्याप्रमाणे या काव्यातही कर्तव्य आणि प्रीती यांतील द्वंद्व हा काव्याचा विशेष आहे. डॉ. प्र. ल. गावडे म्हणतात त्याप्रमाणे, कर्तव्यविचार ही सावरकरांच्या जीवनातील फार मोठी प्रेरक शक्ती होती. मुकुल याच्या मुखाने सावरकरच या काव्यात बोलतात.
हा, प्रीति! न का हाच ठाऊका साचा
रागीट हा धनी माझा!
दे बुद्धी उपजता मजसी
याच्याचि विकूनी दास्यी
या वदति धर्म विप्राशी
उपजताचि की। अणी मला विकी
हे हृदय तुझ्या, प्रीति! चुंब्य या चरणा।
शेवटच्या कडव्यात कर्तव्याला ते ‘तपोमूर्ती’ म्हणतात. तराजूच्या एका पारड्यात प्रेम आणि दुसर्या पारड्यात कर्तव्य असताना, कर्तव्याचे वजन अधिक भरते. या कवितेला आशयानुकूल ‘अकृर’ वृत्तामध्ये सावरकरांनी बांधलं आहे. प्रत्येक कडव्याच्या शेवटी आलेल्या, ‘छळी विरहवेदना वेदना प्राणा’ या ओळीच्या पुनरावृत्तीने विरहाची दाहकता प्रत्येक वेळी अधिक तीव्र होत जाते. करुण रसपूर्ण असं हे काव्य आहे. अनेक ठिकाणी उत्प्रेक्षा काव्याला शोभा आणते. उदा-
जी स्वये उपाशी हरिणी
निर्दुग्ध तिच्याची थानी
हुंदके देऊ देऊनी
शावके जशी, बिलागती तिशी, या हृदयाशी,
त्वतस्मृती ताशा तोडतोडती पाना!
छळी विरहवेदना प्राणा!
किंवा
या अश्रुघानावीण इंद्रधनु ते ना!
अर्थाच्या दृष्टीने श्लेषाचा उपयोगसुद्धा अनेक ठिकाणी दिसतो. उदा-
मी समयांच्या सारसारुनी वाती
पाहिली वाट त्या राती! (घटिका पळ मोजीत)
किंवा
करि पेला हा आसवात भरभरला
बिंदू न पाहिजे गळला (अश्रूंचा पेला)
सावरकरांच्या इतर काव्यांप्रमाणे या काव्यातसुद्धा क्लिष्ट शब्दयोजनेमुळे रसास्वादात अडथळा येतो. उदा-
मधु तरुण फुलांतूनि झरे कैशोरी!
च्या ऋमध्ये तू हृद्दोली
नवव्या कडव्यात मृदू शब्दयोजना आहे, तर त्यापाठोपाठ येणार्या दहाव्या कडव्यात ओजस्वी शब्द आले आहेत. उदा: मधु, लावण्य, माधुरी आणि तेजात, सिंहांच्या, भूमीकंप इत्यादी. कल्पनेची झेप थक्क करणारी आहे. प्रतिकूल परिस्थितीमधला आशावाद स्फूर्ती देणारा आहे. सावरकर लिहितात, या भवसागरात देवांनी जो हिमालयरूपी दीपस्तंभ उभारला आहे, त्यावर पुन्हा ध्रुव तार्याप्रमाणे मार्ग दाखवणारा धर्मादीप उजळेल. प्रज्ञा आणि प्रतिभा यांनी जणू सावरकरांचं दास्यत्व स्वीकारलं आहे.या काव्याचे गद्य अनुवादक भा. ल. रानडे प्रस्तावनेत लिहितात, “येथे प्रेमाचे स्वरूप ‘प्लेटोनिक (वासनारहित) नाही, की सर्वस्वी भोगलोलुप नाही. ते कामातुर नसून, कातर, तरल, विवेकी आहे. शाश्वत मीलनातच (विवाहात) परिणती व्हावी असा संकेत असणारे ते पवित्र, नैष्ठिक नि धर्मसंमत प्रेम आहे. ती आत्म्याची अनामिक, अनिवार्य ओढ आहे! सावरकर राष्ट्रप्रेमास व्यक्तिप्रेमापेक्षा श्रेष्ठ मानतात. सावरकर प्रेमात कर्तव्याला विसरत नाहीत. ते स्वप्नातसुद्धा मातृभूमीची पूजा करतात. त्यांच्या देशभक्तीवर आक्षेप घेणार्यांनी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करायला हवा.
अश्विनी जांभेकर-पितळे
(पुस्तकाची किंमत केवळ १५०/- रुपये असून ९५९४९६१८५८ या क्रमांकावर नोंदणी करू शकता किंवा
www.vivekprakashan. या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता.)