साहित्य संशोधनाची ‘अनंत’ ध्येयासक्ती

    24-May-2024   
Total Views |
dr anant prabhakar deshmukh


शाळेत शिक्षकांकडून प्रेरणा घेत तब्बल ४५ संशोधनात्मक, चरित्रात्मक, समीक्षात्मक, ललित पुस्तकांची ग्रंथसंपदा वाचनप्रेमींसाठी उपलब्ध करणार्‍या डॉ.अनंत देशमुख यांचा हा प्रेरणादायी प्रवास...

डॉ. अनंत प्रभाकर देशमुख यांचा जन्म दि. १ जुलै १९४८ रोजी रायगड (पूर्वीचा कुलाबा) जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील डे या निसर्गरम्य गावी झाला. बालपणापासूनच त्यांना वाङ्मयीन वातावरण लाभले. त्यांच्या आजोबांना वाचनाची आवड होती. माडीवर त्यांची संचित पुस्तके त्यांच्या हाती लागली. तेव्हापासून त्यांनी वडिलांकडे पुस्तकांसाठी हट्ट धरला आणि मग वाचनाची गोडी लागली. चातुर्मासात घरी आई ‘रामविजय’, ‘हरिविजय’ हे पाठ वाचन करीत असे. शेजारी-पाजारी ऐकण्यास येत असत. लहानपणी ‘गीत रामायणा’चे सूर कानावर पडल्याने ज्ञानात भरच पडली. शालेय जीवनात आजूबाजूच्या साहित्यिक वातावरणाचा त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता. त्यांचे शिक्षण अनेक शाळांमध्ये झाले. प्राथमिक शिक्षण अलिबागला बागदांडे, पुढे सारळला आणि मग कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणाचे धडे जैतापूरला न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये गिरवले.

१९६२-६३ साली कराडच्या टिळक हायस्कूलमध्ये शिकत असताना चीनच्या युद्धामुळे वातावरण ढवळून निघाले होते. नेहरूंनी यशवंतराव चव्हाण यांना देशाचे संरक्षणमंत्री म्हणून पाचारण केले. स्वातंत्र्यानंतरचा तो काळ म्हणजे समर गीतांनी भारावलेला होता. अशा वातावरणात अनंत देशमुख कराडला, यशवंतरावांच्या जन्मगावी होते. अशा प्रकारे त्यांच्यात देशभक्ती आणि साहित्य यांचे संस्कार होत गेले. १९६९ साली पुणे विद्यापीठातून बी.ए, तर १९७२ साली मुंबई विद्यापीठातून एम.ए. केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मधु पाटील आणि मा. ना. आचार्य या प्राध्यापकांनी त्यांना घडविण्यात मोलाचा वाटा उचलला. आचार्य हे समीक्षक वा. ल. कुलकर्णी यांचे शिष्य होते. त्यामुळे देशमुख यांनीही कुलकर्णी यांच्या समीक्षेचा अभ्यास केला. त्यामुळेच ते समीक्षेकडे वळल्याचे ते नमूद करतात.

१९७२-१९७४ अलिबागच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर १९७४-१९८७ या काळात माझगाव डॉक येथील जहाजदुरुस्तीच्या कारखान्यात काम केले. तेथील प्रचंड कोलाहल व कानठळ्या बसविणार्‍या आवाजामुळे एकाग्रता भंग पावू लागल्यामुळे ते काहीसे निराश झाले. परंतु, मूळ पिंड साहित्याचा असल्याने ते पुन्हा विद्यादानाकडे वळले. मराठी साहित्य हा आवडीचा विषय असल्याने ‘कुसुमावती देशपांडे यांचे साहित्य’ या विषयावर प्रबंध सादर करून १९७८ मध्ये त्यांनी पीएचडी प्राप्त केली. देशमुख यांनी ‘अनन्वय‘ या त्यांच्या आत्मचरित्रात, ते पीएचडीचा अभ्यास करीत असताना कवी, साहित्यिकांशी झालेल्या भेटी आणि चर्चा यांचा उल्लेख नमूद आहे.

१९८८ नंतर देशमुख ठाण्यात आले. १९८८-८९ या काळात डोंबिवलीच्या महिला महाविद्यालयात ते शिकवित होते. देशमुख यांची ग्रंथसंपदाही मोठी आहे. त्यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक पुस्तकात अधिकतर उपेक्षित, दुर्लक्षितांचे संशोधन दिसते. देशमुख यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे त्यांनी र. धों. कर्वे यांच्याबद्दल केलेले संशोधन! त्यांनी कर्वे यांचे चरित्र नव्याने लिहून त्यांचे खरे व्यक्तिमत्त्व उजेडात आणले. र. धों. यांच्या संबधित संशोधनामुळे देशमुख यांचा नाट्यजगताशी प्रत्यक्ष संबंध आला. त्यांच्या संशोधनात्मक लेखनात ‘समाजस्वास्थ्यकार : र. धों. कर्वे यांचे चरित्र‘ ‘महाराष्ट्राचे शिल्पकार प्रो. र. धों. कर्वे‘, ‘नाट्यविचार’, ‘आधुनिक नाट्यविचार’ हे साहित्य प्रकाशित आहे.
 
त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांच्या मूळ प्रतींचा अभ्यास करून ‘विशाखा भोवती‘ हे पुस्तक लिहिले आहे. ‘गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य’, ‘भैरप्पांचे कादंबरीविश्व’, ‘रंगयात्रा’, ‘मराठी साहित्य संशोधन’ अशा पुस्तकांमध्ये त्यांचे समीक्षात्मक लेखन समाविष्ट आहे. प्राध्यापक म्हणून आणि मराठी विषयाचे विभागप्रमुख म्हणून प्रदीर्घ सेवा बजावून ते दि. ३१ डिसेंबर २००७ रोजी एसएनडीटी विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागातून निवृत्त झाले.

देशमुख यांच्या परिवारातील बंधुभगिनींसह सर्वच उच्चशिक्षित आहेत. शांत, अभ्यासू वृत्तीच्या देशमुख यांना, आपणदेखील समाजाचे काहीतरी देणे लागतो, याची जाणीव असल्याने इतरांना जमेल तशी मदत करण्याकरिता ते नेहमीच तत्पर असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी एम. फिल तसेच पीएचडी झाले आहेत. अहोरात्र लेखणीशी नाते जोडलेले देशमुख लेखनप्रपंच सांभाळून समाजसेवा आणि संस्थात्मक कार्यातही कार्यरत आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय’ तसेच, ठाणे वाचनालयात ते मार्गदर्शक म्हणून अविरत सेवा देत आहेत.

देशमुख यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भविष्यातदेखील लेखन करीत राहण्याचा निर्धार व्यक्त करताना, ते चिंतन करायचे राहून गेल्याची खंत मोकळेपणाने व्यक्त करतात. देशमुख यांना लेखनाचा व्यासंग असून, टेबल टेनिस खेळण्याचा छंदही आहे. नवीन पिढीला संदेश देताना, नेहमी सकारात्मक विचार करा, यशकीर्ती तुमच्या पायाशी लोळण घेईल, असा उपदेश ते करतात. आयुष्याचा सर्वाधिक काळ विद्यादान व साहित्य संशोधन यातच व्यतीत करणार्‍या या संशोधक साहित्यिकाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क : ८४५४९२१६५६)

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.