जेरेमी हंट यांचे आईकडून खापर पणजोबा होते, सर स्ट्रीनशॅम मास्टर. काही आठवतेय का, हे नाव वाचून? सर स्ट्रीनशॅम मास्टर हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला एक अधिकारी होता. सन १६७० साली त्याचा खुद्द शिवरायांशी सुरतेत सामना झाला. शिवरायांकडे १५ हजार फौज होती आणि स्ट्रीनशॅम मास्टरकडे फक्त ५० माणसे होती.
जेरेमी हंट यांच्याबद्दल तुम्ही काही ऐकले-वाचले आहे का? सध्या ते ब्रिटनचे अर्थमंत्री आहेत. ५८ वर्षे वयाचे जेरेमी हंट हे ब्रिटनच्या हुजूर पक्षाचे सदस्य आहेत. २००५ साली खासदार बनलेल्या हंट यांनी आतापर्यंत क्रीडामंत्री, सांस्कृतिकमंत्री, परराष्ट्रमंत्री इत्यादी अनेक महत्त्वाची केंद्रीय मंत्रालये सांभाळलेली आहेत. २०१२ साली झालेल्या हुजूर पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीत हंट पक्षनेतेपदापर्यंत पोहोचू शकले नाहीत, अन्यथा आता ऋषी सुनक यांच्याऐवजी जेरेमी हंट हेच ब्रिटनचे पंतप्रधान बनले असते. पण, अर्थमंत्री किंवा ब्रिटिश परिभाषेत ’चॅन्सलर ऑफ द एक्सचेकर’ हे पद ब्रिटिश मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे म्हणजे पंतप्रधानांखालोखाल असतेच.
त्यामुळे जेरेमी हंट हे पंतप्रधानांच्या ’१०, डाऊनिंग स्ट्रीट’ या प्रसिद्ध निवासस्थानाच्या बाबूच्याच ‘११, डाऊनिंग स्ट्रीट’ सरकारी निवासात राहतात. अनेक राजकारणी आणि पत्रकारांच्या मते, ऋषी सुनक हे वरकरणी पंतप्रधान असून जेरेमी हंट हेच खरे पंतप्रधान आहेत. याचाच अर्थ जेरेमी हंट आगामी काळात खरोखरचे पंतप्रधान होऊदेखील शकतात. यात एक बारीकसा ’पण’ आहे. तो म्हणजे हंट यांची बायको चिनी आहे. भविष्यात काय दडले आहे, ते यथावकाश पुढे येईलच. मुद्दा हा की, जेरेमी हंट हा वर्तमानकाळातला एक कर्तबगार राजकारणी मुत्सद्दी आहे.
या जेरेमी हंट यांचे आईकडून खापर पणजोबा होते, सर स्ट्रीनशॅम मास्टर. काही आठवतेय का, हे नाव वाचून? ’सर स्ट्रीनशॅम मास्टर हा ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला एक अधिकारी होता. सन १६७० साली त्याचा खुद्द शिवरायांशी सुरतेत सामना झाला. शिवरायांकडे १५ हजार फौज होती आणि स्ट्रीनशॅम मास्टरकडे फक्त ५० माणसे होती. मुघल साम्राज्याचे पश्चिम किनारपट्टीवरचे मुख्य व्यापारी बंदर होते. सुरत सन १६०८ साली जहांगीर बादशहाकडून व्यापाराची सनद म्हणजे परवाना मिळवून इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीने सुरतेत आपली फॅक्टरी किंवा वखार चालू केली होती.
फॅक्टरी म्हणजे जिथे फक्त कच्च्या-पक्क्या मालाची ने-आण चालते, उत्पादन होत नाही, असे ठिकाण. म्हणजे कंपनी या वखारीतून फक्त ’ट्रेडिंग’ करत होती, ’मॅन्युफॅक्चरिंग’ नव्हे. आता अशा वखारीच्या इमारतीला तटबंदी कशाला हवी? पण, इंग्रजांनी सुरतेच्या मुघल सुभेदाराला लाच देऊन तटबंदी करून घेतली. प्रत्यक्ष सुरत शहर तापी नदीच्या तीरावर होते. शहराच्या पुढे नदी जिथे खंभातच्या आखातात समुद्राला मिळते, तिथे एक छोटे खेडे होते. त्याचे नाव सुवाली. इंग्रज त्याला म्हणायचे स्वाली. इंग्रजांची जहाजे या सुवाली बंदरात धक्क्याला लागत, मग मालाची चढ-उतार चालायची. या कारणाने बरीचशी माणसे स्वाली ते शहरातली वखार यांच्या दरम्यान ये-जा करायची.
जानेवारी ६ ते १०, सन १६६४ या काळात शिवरायांनी सुरत पहिल्यांदा लुटली. मुघल सुभेदार शाहिस्तेखान याने सन १६६० ते १६६३ अशी तीन वर्षे हिंदवी स्वराज्याची जी लूट केली, तिची अल्पशी भरपाई करून घेणे, हा शिवरायांच्या या मोहिमेचा उद्देश होता. म्हणजे सुरत जिंकून घेणे नव्हे, तर ती लुटणे हाच शिवरायांचा उद्देश होता.
या पहिल्या स्वारीनंतर वारंवार सुरतेत हूल उठायची - ’शिवाजी आला’... लोकांची धावपळ उडायची. इंग्रज तर फारच दीनवाणे व्हायचे. कारण, पश्चिम किनार्यावर सुरत वगळता यांना दुसरा आसराच नव्हता. महाराजांच्या या पहिल्या सुरत स्वारीच्या वेळी इंग्रजी वखारीचा प्रेसिडेंट होता जॉर्ज ऑक्झेंडन. पुढे महाराजांच्या राज्याभिषेकाला १६७४ साली रायगडावर हजर असलेला हेन्री ऑक्सेंडन हा या जॉर्जचा पुतण्या.
आता ३ ऑक्टोबर १६७० या दिवशी शिवराय खरोखरच पुन्हा सुरतेवर चालून आले. आग्रा प्रकरणात स्वतः महाराजांची आणि स्वराज्याची झालेली भयंकर मानहानी आणि महाराजांना आग्राभेटीच्या वाटखर्चासाठी दिलेले १ लाख रुपये संभाजी राजांच्या वर्हाडच्या जहागिरीतून कापून घेण्याचा औरंगजेबाचा मूर्ख निर्णय या सगळ्याचेच उट्टे महाराजांना काढायचे होते. या वेळी सुरतेचा प्रेसिडेंट जेरॉल्ड अँजियर हा सुरतेला नसून मुंबईला गेलेला होता. झाले होते असे की, सन १६६८ साली मुंबई बेट इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने ईस्ट इंडिया कंपनीला वार्षिक दहा पौंड भाड्याने वापरायला दिले होते. मुंबईला व्यापारी आणि लष्करी ठाणे उभे करण्याचे काम कंपनीने सुरतेच्या प्रेसिडेंटच्याच अंगावर टाकले होते. थोडक्यात, जेरॉल्ड अँजियर सुरत वखारीचा प्रमुख होताच, शिवाय मुंबईचा अतिरिक्त भार त्याच्यावर टाकण्यात आला होता.
दि. २ ऑक्टोबर १६७० या दिवशी शिवराय सुरतेच्या अलीकडच्या मुक्कामावर येऊन ठेपले. सुरतेत पक्की खबर आली, ’यावेळी अफवा नाही. शिवाजी नक्की आला.’ सर्वत्र एकच धावपळ उडाली. इंग्रजांसमोर प्रश्न आला. काय करावे? जेरॉल्ड अँजियर मुंबईला गेलेला आहे. शहरातल्या वखारीत फक्त २० माणसे आहेत. सुवाली बंदरात ३० माणसे आहेत. अँजियरचा दुय्यम अधिकारी स्ट्रीनशॅम मास्टर याने निर्णय घेतला. ती ३० माणसे घेऊन तो शहरात ३ ऑक्टोबर १६७०च्या सकाळी आला. अगदी त्याचवेळी स्वतः शिवराय त्यांच्या १५ हजार स्वारांसह शहरात घुसले होते. मुघल सुभेदाराची ३०० लोकांची फौज मराठ्यांना घाबरून सुरतेच्या भुईकोट किल्ल्यात लपून बसली.
महाराजांच्या माणसांनी आल्याआल्या लुटीला सुरुवातच केली. इंग्रजांशिवाय सुरतेत फ्रेंच आणि डच या परकीयांच्याही वखारी होत्या. फ्रेंचांना मुघल म्हणत ‘फ्रान्सिसी.’ यामुळे त्याचा अस्सल मराठी अपभ्रंश झाला ‘फरांशीस’ आणि डचांना त्यांच्या हॉलंड देशावरून म्हणायचे ‘हॉलंडीज’ किंवा ‘वलंदेज.’ मराठीत तोच शब्द कायम झाला. तर या ‘फरांशीस’ आणि वलंदेजांनी महाराजांना नजराणे देऊन त्यांच्याशी सलूख म्हणजे सलोखा केला, पण स्ट्रीनशॅम मास्टरने साफ नकार दिला आणि बंदुकीचा घोडा उडवला. लगोलग मराठी बर्कंदाजांचे पथक इंग्रजी वरखारीवर चाल करून गेले.
इंग्रजांची वखार काबीज करणे किंवा कोणतेही लष्करी ठाणे जिंकणे, हा मुळी महाराजांचा उद्देशच नव्हता. त्यामुळे त्यांच्या १५ हजार फौजेपैकी बहुसंख्य सैनिक शहरभर फिरून लुटालूट करत होते नि ती संपत्ती गोण्यांमध्ये भरून महाराजांसमोर आणून ओतत होते. कारकून मंडळी वर्गवारी, मोजदाद, लिखापढी, नोंदी करत होती. सैनिकांच्या काही तुकड्याच फक्त इंग्रजी वखार आणि नवी सराई या ठिकाणी उतरलेल्या श्रीमंत इराणी नि तुर्की पाहुण्यांशी लढत होत्या. इंग्रज, इराणी आणि तुर्की लोक तटबंदीच्या आश्रयाने मराठ्यांवर गोळ्या झाडत होते. कल्पना करा की, इंग्रजांची फक्त माणसे जीव खाऊन मराठ्यांशी लढत होती. कशासाठी ? ’इंग्लिश राष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी. ’३, ४ आणि ५ ऑक्टोबर. तीन दिवस झाले. अखंड बंदुकांचा कडकडाट चालू होता, इंग्रजसुद्धा टेकलाच आले होते. पण, हटायला नयार नव्हते, बाहेर मैदानात उघड्यावर असलेली मराठ्यांची फार माणसे ठार झाली होती.
शेवटी, ५ ऑक्टोबरला मराठी बर्कंदाजांच्या हवालदाराने एक माणूस इंग्रजांकडे पाठवून हा माणूस सैनिक नव्हे, तर राजापूरचा एक व्यापारी होता. त्याने स्ट्रिनशॅम मास्टरला सांगितले की, ’तुम्ही मराठ्यांची फार माणसे मारली. यामुळे शिवाजी चिडून गेला आहे. तरी, तुम्ही काहीतरी नजराणा घेऊन कुणाला तरी शिवाजीकडे पाठवा.’ या निरोपातला मथितार्थ हा होता की, असे न केल्यास मग तुमची धडगत नाही. स्ट्रीनशॅम मास्टर हे उमगला आणि त्याने उत्तम कापड, भारी तलवारी आणि सुर्या असे जिन्नस नजराणा म्हणून महाराजांकडे पाठवले. महाराजांनीही ताणून न धरता नजराण्याचा स्वीकार केला.
पुढे सन १६७८ मध्ये छत्रपती शिवराय कर्नाटक स्वारीवर निघाले, त्यावेळी ज्याला ढोबळपणे कर्नाटक म्हटले जात होते. त्यात आजच्या कर्नाटक, आंध्र, तेलंगण आणि तामिळनाडू राज्यांमधील अनेक गावेे येतात. हैदराबादमध्ये कुतुबशहाला भेटून महाराज दक्षिणेकडे तिरुपतीच्या रोखाने निघाले. नेमका यावेळी स्ट्रीनशॅम ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रासच्या फोर्ट जॉर्जमध्ये प्रमुख होता. त्याच्या पदाला ’एजंट’ असे म्हटले जात असे. आता मराठे मद्रासवर येणार, हे ओळखून याने मद्रास ठाणे लढवण्याची जोरदार तयारी केली. पण, मद्रास हे आत्ता मराठ्यांचे लक्ष्य नव्हते. मद्रास (आता चेन्नै) च्या उत्तरेची सद्रास आणि पुलिकत ही डचांची ठाणी जिंकणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. नंतर काय निर्णय झाला, कोण जाणे, पण मद्रासला न येता त्याच्या दक्षिणेकडच्या कडलोर, चिदंबरम् इत्यादी क्षेत्रांकडे महाराज स्वतः रवाना झाले. कडलोरजवळच्या वृद्धाचलम् आणि चिदंबरम्च्या नटराज स्थानाला महाराजांनी अनंत श्रद्धेने भेट दिली. पाँडिचेरी किंवा मराठ्यांच्या बोलीमधल्या फुलचरीजवळचा जिंजीचा किल्ला महाराजांनी आधीच जिंकला होता. पुढे जून १६७८ मध्ये महाराज रामगडावर परतले आणि एप्रिल १६८० मध्ये मरण पावले.
मुघलांना तर आनंद झालाच, पण इंग्रजांना तर फारच आनंद झाला. भारतात राज्य स्थापन करण्याच्या त्यांच्या महान स्वप्नातला एकमेव अडसर देवानेच दूर केला होता. पुढे सन १६९२ पर्यंत स्ट्रीनशॅम मास्टर मद्रास वखारीचा प्रमुख होता. त्याने या अवधीत केलेली कार्ये म्हणजे मद्रास हे इंग्रजी व्यापारीदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्या अधिकाधिक मजबूत केले. मद्रास शहरात तोपर्यंत प्रोटेस्टंट अँग्लिकन चर्च नव्हते. ते त्याने उभे केले. परिसरातले सगळे खटले-कब्जे तोवर जुन्या हिंदू पद्धतीनुसार गोत पंचायतीसमोर चावडीवर सुटत असत. ती पद्धत रद्द करून त्याने इंग्रजी न्यायालये सुरू केली. सन १८२८ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिक याने संपूर्ण भारतातून सतीची प्रथा बंद केली, असे आपण शालेय इतिहासात वाचतो. सन १८२८ पर्यंत इंग्रजांनी जवळपास सगळा भारत जिंकला होता. त्यामुळे बेंटिकला सतीबंदीचे श्रेय देण्यात येते, हे ठीकच आहे. पण, स्ट्रीनशॅम मास्टरने आपल्या अखत्यारीतल्या मद्रास इलाख्यात १६९० साली सती प्रथा कायद्याने बंद केली होती.
सन १६९२ साली स्ट्रीनशॅम मास्टर निवृत्त होऊन इंग्लंडला परतला. राष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली आणि कंपनीच्या मालाचे रक्षण केले म्हणून त्याला राजा जेम्स याने ‘नाईटहूड’ म्हणजे ’सर’ की बहाल केली. सर स्ट्रीनशॅम मास्टर सन १७२४ सालच्या २८ एप्रिलला वयाच्या ८४व्या वर्षी लंकेशायर परगण्यात मरण पावला. परवाच्या २८ एप्रिल २०२४ ला त्याच्या मृत्यूला ३०० वर्षे पूर्ण झाली. कल्पना करा, एका खासगी व्यापारी कंपनीचा एक प्रशासकीय अधिकारी, एक कडवा सैनिक आपल्या मायदेशापासून दूरदूर, उष्ण कटिबंधातल्या एका अनोळख्या भूमीवर येतो. तिथल्या बळिवंत राजाच्या पराक्रमी सेनेशी स्वतःच्या चिमूटभर सैन्यासह बेधडक पंगा घेतो. कशासाठी? तर म्हणे, इंग्लिश राष्ट्राच्या प्रतिष्ठेसाठी! सर स्ट्रीनशॅम नक्कीच आमचा शत्रू होता. पण, चांगले गुण शत्रूकडूनसुद्धा अवश्य घ्यावेत. इंग्रजांची शिस्त, कडवी राष्ट्रनिष्ठा उचलण्याऐवजी आम्ही त्याचे काय उचलले? तर अफाट दारू ढोसणे आणि स्त्रियांबाबत सैल असणे.
असो. तर आता सर स्ट्रीनशॅमचा खापरपणतू ब्रिटनचा विद्यमान अर्थमंत्री जेरेमी हंट याची राजकीय कारकीर्द पुढे कशी आकार घेते, हे निरीक्षणायोग्य असेल.