रोहिंग्यांचे रक्षक गप्प का?

    22-May-2024
Total Views |
Myanmar Ethnic Violence

काही वर्षांपूर्वी म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांवर अन्याय-अत्याचार झाले, म्हणून मुंबईच्या रस्त्यावर रझा अकादमीने नंगानाच केला. पुढे याच रोहिंग्या घुसखोरांनी बांगलादेशसह भारतात घुसखोरी केली. भारतात काही राजकीय पक्षांनी मतपेढीच्या स्वार्थासाठी रोहिंग्यांना अभयही दिले. पण, आता म्यानमारमध्ये उरल्यासुरल्या रोहिंग्यांनी हिंदू आणि बौद्धांची पाच हजार घरे पेटवली. यावर भारतातील रोहिंग्यांच्या रक्षकांचे आणि पुरोगाम्यांचे मौन त्यांच्या दांभिकतेचे दर्शन घडविणारेच!

म्यानमारमध्ये लष्कराच्या नेतृत्वाखालील ‘जुंटा आर्मी’ तसेच रखिने प्रांतातील अनेक भागांमध्ये वांशिक बंडखोर गटांमध्ये उफाळलेल्या संघर्षामुळे तेथील परिस्थिती अतिशय गंभीर बनली. बांगलादेश सीमेपासून अवघ्या २५ किमी अंतरावर असलेल्या बुथिडांगमध्ये बौद्ध आणि हिंदूंची जवळपास पाच हजार घरे उद्ध्वस्त झाल्याच्या वृत्तानंतर, आता या तणावाला धार्मिक वळण मिळाले आहे. ही पाच हजार घरे बौद्ध आणि हिंदूंची असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले. सुदैवाने यातील बहुतेक रहिवासी सुरक्षित भागात पळून गेले असल्याने, त्यातील बरीच घरे रिकामी होती. जे मागे राहिले होते, त्यांना बाहेर काढण्यात आले खरे. पण, त्यांच्या डोळ्यांसमोरच त्यांची घरे लुटून जाळण्यात आली आणि हे दुष्कृत्य करणारे साहजिकच तेथील धर्मांध रोहिंग्या. दि. ११ ते २१ एप्रिलदरम्यान बौद्ध आणि हिंदूंची घरे जाळून खाक करण्यात आली. बुथिदांगचे नियंत्रण आता अरकान आर्मीच्या हाती आहे. २०१८च्या जनगणनेमध्ये तेथे तीन हजार घरे होती. अनेक भागांतील रहिवाशांनी येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही संख्या तिपटीने वाढून दहा हजार इतकी झाली होती. यात बौद्ध तसेच हिंदूंची संख्या लक्षणीय आहे.

रोहिंग्यांना भरती केले जात असून, धर्म आणि वंशाच्या आधारावर म्यानमारमध्ये लोकांना लक्ष्य केले जात आहे, असेही वृत्त आहे. बुथिदांगच्या नागरी लोकसंख्येला सुरक्षित करण्यासाठी आता येथे १६ मैल लांबीचा रस्ता ताब्यात घेतल्याचे अरकान आर्मीने म्हटले आहे. तसेच सायंकाळी ७ ते सकाळी ६ या वेळेत येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, म्यानमारच्या पश्चिमेकडील थंडवे शहरातील एका जलविद्युत प्रकल्पाभोवती तीव्र लढाई झाली.एकट्या बांगलादेशमध्ये म्यानमारमधून पलायन केलेले सुमारे दहा लाख रोहिंग्या मुसलमान आश्रयास असून, त्यातील काहींना येथे लष्करी प्रशिक्षणासाठी आणले गेले आहे. म्यानमारमधील गृहयुद्धात बंडखोरांचा मुकाबला करण्यासाठी बांगलादेशातील रोहिंग्यांना आणले जात असल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील गंभीर बाब ही आहे की, २०१७ मध्ये तेथे रोहिंग्या दहशतवाद्यांनी हिंदूंचे जसे हत्याकांड केले होते, तसाच काहीसा प्रकार आता पुन्हा होण्याची भीती व्यक्त होत आहे. बुथिदांगमध्ये हिंदू तसेच बौद्ध यांना ओलीस म्हणून ठेवण्यात आले असून, त्यांची संख्या हजारांमध्ये आहे.
 
म्यानमारमधील रखिने प्रांतातील वाढत्या हिंसाचाराच्या घटना तसेच आंतरजातीय तणावाबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. सुरक्षा दलांवर अरकान आर्मीने हल्ला केल्यापासून या चकमकी सुरू आहेत. २०२१च्या लष्करी बंडानंतरचा युद्धविराम त्यामुळे संपुष्टात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकारप्रमुखांनी अशाच पद्धतीचा इशारा दिला असून, नागरिकांसाठी गंभीर धोके असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वाढलेला हिंसाचार आणि आंतरजातीय तणाव अत्याचाराची शक्यता वाढवतो, असेही ते म्हणतात. मानवतावादी मदतीसाठी प्रवेश देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे. अरकान आर्मी तेथील सीमावर्ती भागातील सशस्त्र जातीय गटांपैकी एक असून, त्याने आतापर्यंत वेळोवेळी लष्कराशी लढा दिला आहे. २०२१ पासून, बंडखोरांनी उठाव केल्यानंतर, मिझोरामचा भारताशी सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांसह अनेक भागांवर ताबा मिळवला. तेथील उठावामुळे एक लाखांहून अधिकांनी देशातून पळ काढत, मणिपूर आणि मिझोराम सीमेवरून भारतात प्रवेश केला. म्हणूनच, ८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी १,६४३ किमी लांबीच्या म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. लष्करी बंडानंतर म्यानमारमधील रोहिंग्यांनी ईशान्येकडील विविध राज्यांमध्ये विशेषतः मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. सीमेवर कुंपण घालण्याच्या निर्णयाचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनीही स्वागत केले आहे.
 
मिझोराम सरकारने मात्र याला विरोध केला होता. केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करणारा ठराव, मिझोराम विधानसभेने संमत केला होता. आज देशात विरोधी पक्षांच्या इशार्‍यावरून, ‘दलित-मुस्लीम भाई-भाई, हिंदू कौम कहाँ से आई’ असे नारे देत तुष्टीकरणाचे डाव खेळले जात आहेत. हा सर्वस्वी या देशाच्या एकात्मता आणि अखंडतेला धोका आहे. देशाची फाळणी होण्यापूर्वीही अशाच घोषणा दिल्या गेल्या. त्यानंतर काय घडले, हे संपूर्ण जगाने पाहिले. फाळणी करणार्‍यांनी आज पुन्हा एकदा जिनांचा मार्ग अवलंबला आहे. फाळणी झाल्यानंतर, पश्चिम बंगालसह इतर अनेक राज्यांतील दलितांसह दलित नेते पाकिस्तानात गेले. मात्र, धार्मिक छळामुळे त्यांना पुन्हा भारतात परतावे लागले. यानंतर ते निर्वासित झाले, हा इतिहास आहे.पण, आता गाझासमर्थक पुरोगाम्यांची हीच सेक्युलर म्हणविणारी जमात म्यानमारमधील या धार्मिक हिंसाचाराचा निषेध नोंदवणार का, हाच खरा प्रश्न. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीला भेट देतात, मुस्लीम उमेदवारांना निवडणुकीत त्यांचे प्राधान्य.

मग म्यानमारमध्ये जी दलित आणि हिंदूंची घरे रोहिंग्यांकडून जाळली गेली, याविषयी प्रकाश आंबेडकरांसारखे नेते ठोस भूमिका कधी तरी घेतील का? देशातील काँग्रेससह २८ विरोधी पक्ष, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे दांभिक या घटनेचा निषेध नोंदवणार का? रोहिंग्यांना भारतात सामावून घेण्याची मागणी करणारे, त्यांना आसरा द्या, असे म्हणणारे आता मौन बाळगून आहेत. ‘सीएए’, ‘एनआरसी’ला केवळ मतपेढीच्या राजकारणापोटी विरोध करणारे राजकीय पक्ष यापुढेही रोहिंग्यांना समर्थन देतील, हे वेगळे सांगणे नकोच. जगात इतरत्र मुस्लिमांवर अन्याय झाल्यावर, अत्याचाराची एखादी घटना घडल्यानंतर देशभरात त्याबद्दल पडसाद त्वरेने उमटतात. म्यानमारमधील घटनेनंतर तसे निषेधाचे सूर जगभरात उमटतील का, याचे उत्तर काही दिवसांत मिळेल. एकूणच काय तर सेमेटिक धर्म कधीही अन्य धर्मांसोबत गुण्यागोविंदाने नांदू शकत नाहीत, हेच या घटनेतूनही सिद्ध होते.