महाराष्ट्रातील कळसूबाई या सर्वोच्च शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या जहागीरदारवाडी या खेड्याचे रहिवासी बाळू घोडे यांच्या ‘मिलेट्स’ अर्थात भरडधान्य संवर्धन प्रयोगाची ही यशोगाथा...
दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आता मोठी
आला पिकाले बहर
झाली शेतामंदी दाटी
बहिणाबाईंच्या या ओळी मनामध्ये धान्याने भरलेल्या शेताचे समृद्ध चित्र उभे करतात. पण, अलीकडे आहारात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त आणि रसायनयुक्त अन्नधान्याचा समावेश झालेला दिसतो. यालाच छेद देत नगर जिल्ह्यातील शेवटचे गाव कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या जहागीरदारवाडी या गावामधील एका शेतकर्याची ही गोष्ट.बाळू किसन घोडे. गेल्या दोन दशकांपेक्षा अधिक काळ शेती आणि शेतीसंबंधी विविध प्रयोगांमध्ये रमलेला एक शेतकरी, उद्योजक आणि जबाबदार पर्यावरण संरक्षकसुद्धा. बाळू यांचा जन्म याच जहागीरदारवाडीतील. साधारणतः हजार-पाचशे लोकसंख्या असलेल्या गावामध्ये पूर्वी शिक्षणाची सोय नव्हती. चौथीपर्यंतची प्राथमिक शाळाच ज्या गावात उपलब्ध झाली, तिथे त्यांच्या सुदैवाने बाळू यांची चौथी पूर्ण होता होता पुढचे सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. कधी नापास होत, कधी परत त्याच वर्गात प्रवेश घेत, असे नववीपर्यंतचे शिक्षण त्यांनी कसेबसे पूर्ण केले. पण, दहावीला अनुत्तीर्ण झाल्यानंतर मात्र शिक्षणापासून त्यांनी फारकत घेण्याचाच निर्णय घेतला. तसे शिक्षकांना कळवून त्यांनी शाळेतून आपला दाखला काढून घेतला आणि पुन्हा काही शिक्षणाच्या वाटेकडे ते फिरकले नाहीत.
लहानपणापासूनच शेतीची कामे, गायी-गुरांना चरायला घेऊन जाणे, आईला घरकामात स्वयंपाकात मदत करणे, याची बाळू यांना आवड. त्यामुळे हेच काम ते पुढे मन लावून करू लागले. दाखला काढल्यानंतर कमी वयातच त्यांचे लग्नही झाले. त्यामुळे घरच्या जबाबदार्या सांभाळत त्यांनी मजुरी केली आणि पुढे शेतीवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले. हे सर्व करताना समाजामध्ये अनेकजण एखादा विशिष्ट विषय घेऊन काम करतात, हे त्यांना वाचनातून, अनुभवातून लक्षात येऊ लागले आणि त्यातूनच त्यांनी भरडधान्य अर्थात मिलेट्सवर काम करण्याचा निश्चय केला. नाचणी आणि वरई या पिकांनी 2008 मध्ये सुरुवात करत, हळूहळू त्यांनी वेगवेगळ्या पिकांच्या प्रजाती शोधायला सुरुवात केली. स्वतःची ‘बियाणे बँक’ तयार करायची आणि परिसरातील स्थानिक धान्यांच्या नामशेष झालेल्या प्रजाती पुनरुज्जीवित करायच्या, या ध्येयाने त्यांनी कामाला सुरुवात केली. काही धान्य दळून लगेच खाता येतात, पण काहींवर प्रक्रिया करावी लागते. यादृष्टीने वनविभागाची मदत घेत, त्यांनी हा प्रकल्प पुढे नेला. ते वास्तव्यास असलेल्या प्रदेशातील जैवविविधता टिकून राहावी, यादृष्टीने प्रयत्न करत, ‘बीज बँके’मध्ये आजवर त्यांच्याकडे नाचणीच्या 20 प्रजाती, वरईच्या दहा प्रजाती, महाराष्ट्रामधून गोळा केलेल्या तांदळाच्या 50 पेक्षा अधिक प्रजातींचा समावेश झाला आहे. मिलेट्स अर्थात भरडधान्याच्या त्यांच्या या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, त्यांच्या या कामासाठी त्यांना काही पुरस्कारांनीसुद्धा गौरविण्यात आले. तसेच, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ते अनेक शाळा-महाविद्यालयांमध्येही सत्रे घेतात.
मिलेट्सच्या ‘बीज बँके’वरच न थांबता कळसूबाई, भंडारदरा या भागामध्ये वाढते पर्यटन ओळखून त्यांनी ‘होम स्टे’, तसेच इतर सुविधा सुरू केल्या. यामध्येही ते आहाराबाबत जनजागृतीचे सत्र घेऊन पर्यटकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करतात. तसेच, ‘होम स्टे’मध्येही त्यांनी पत्नीच्या बरोबरीने जेवणात मिलेट्सचे लाडू, पापड, भाकरी, इडली, खीर अशा पदार्थांचा समावेश केला आहे. हे पदार्थ बनवायला हे दाम्पत्य गावातील महिला बचत गटांनाही प्रशिक्षण देते. “मी जे पिकवतो, ते विकण्यासाठी मला बाजार शोधण्याची गरज नाही, तर ग्राहक मला शोधत माझ्यापर्यंत पोहोचतात,” असे अभिमानाने सांगणार्या बाळू यांनी खरोखरच कमी शिक्षणाच्या जोरावरही शेती आणि व्यवसायाचे पक्के गणित बसवले. भारतात असणार्या भरडधान्यांच्या नऊ प्रजातींपैकी शक्य तितक्या प्रकारांची छोट्या क्षेत्रात का होईना, प्रायोगिक लागवड करत त्या बियाणांचे गावातील महिलांनासुद्धा वाटप ते करतात. 2022 मध्ये गावात सुरू झालेल्या ‘बाएफ’ या संस्थेच्या प्रकल्पामुळे त्यांच्या घरातील छोट्याशा ‘बीज बँके’ला माठे स्वरुप प्राप्त झाले.
महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाकडून त्यांना 2022 मध्ये पुरस्कार देण्यात आला होता. तसेच, 2023 मध्ये जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी तसेच ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारा’नेही त्यांना सन्मानित करण्यात आले. शेतीपासून दूर चाललेली ही पिढी पाहून सद्गतीत होणारे बाळू तरुणांना या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण द्यायला आणि प्रेरित करायला धडपडत आहेत. “तरुणांनी शेतीकडे पुन्हा वळून स्वतःसाठी अर्थार्जनाचे मार्ग शोधायला हवे,” असे मत ते स्पष्टपणे व्यक्त करतात. या सगळ्याबरोबरच त्यांनी जंगलातील वनस्पतींचासुद्धा अभ्यास केला. जैवविविधता नोंदवहीविषयी समजल्यानंतर त्यांनी त्या परिसरातील नोंदी करायलाही सुरुवात केली. नुकतेच त्यांनी कळसूबाई परिसरातील गवताच्या वेगवेगळ्या प्रजातींचा फोटो आणि थोडक्यात माहिती, अशा नोंदी केल्या आहेत. यावर आधारित छोटीशी पुस्तिका तयार करण्याचाही त्यांचा विचार आहे. सेंद्रिय शेतीच्या आधारावर मिलेट्सचा अशाप्रकारे अनोखा उपक्रम यशस्वी केलेल्या या उद्योजकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या कृषिमय शुभेच्छा!