काहीही म्हणा, यावेळी शरद पवार किंवा सोनिया गांधी यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत. कशा बाबतीत म्हणताय? रडारड करण्याच्या बाबतीत. 4 जूनपर्यंतची प्रतिक्षाही न करता, त्यांनी मतदानाच्या दिवसापासूनच रडारड, चिडचिड, दोषारोप सुरू केलेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, त्यातही उद्धव यांच्यामध्ये सुधारणा आहे. इतर वेळेसारखे त्यांनी फुल टाईम टोमणे दिले नाहीत, तर दोषारोप केलेत. त्यांचा टोमण्यांकडून रडण्याचा प्रवास सुरू आहे. लोकांचे काय? त्यांच्या म्हणण्यावर काय जायचे म्हणा.या अनुषंगाने उद्धव ठाकरे म्हणाले की, ”निवडणूक आयोग पक्षपाती आहे. मतदान केंद्रातील अधिकारी विशेष समुदायातील लोकांना सारखं सारखं ओळखपत्र विचारत होते. जिथे आम्हाला मतदान जास्त होणार होते, तिथेच मतदान खूप सावकाश आणि कमी कसे झाले?” त्यांच्या या म्हणण्यावरही काही लोक म्हणत आहेत की, उद्धव ठाकरे यांना काय म्हणायचे आहे? त्यांचा जो कोणता विशेष समुदाय आहे, त्यांना मतदान केंद्रावरील कर्मचार्यांनी ओळखपत्र विचारायला नको होते का? विशेष समुदाय म्हणजे कोण? बरं, तो कोणताही समुदाय असू दे, पण त्या समुदायाच्या व्यक्तीला मतदानासाठी योग्य ओळखपत्र आणणे नियमुनसार आवश्यकच होते. उद्धव यांच्या मनातला तो विशेष समुदाय आहे, म्हणून त्याला ओळखपत्र वगैरे न विचारताच मतदान करून द्यायला हवे होते का? काही लोकांचे म्हणणे आहे की, ते तसे म्हणणाारच. कारण, त्यांची भिस्त आता त्या त्यांच्या मते जो कुणी विशेष समुदाय आहे त्यांच्यावरच आहे. या पार्श्वभूमीवर वाटते की, उद्धव यांनी विशेष समुदायाबद्दल दाखवलेली ही खंत, ही काळजी त्यांच्या विशेष समुदायाने लक्षात घेतली का? नव्हे, ते विशेष समुदायावर इतकं प्रेम करतात आणि तिकडे म्हणे, कालपरवा निवडणुकीच्या आदल्या दिवशी मुंबई जोगेश्वरीत बैठका झाल्या की, ”उद्धव हे कालपर्यंत हिंदू हिंदू करायचे आता फक्त मतांसाठी ते आपल्याकडे आलेत. त्यांना मतदान न करता नोटाचे बटन दाबावे.” अरेरे, काय म्हणावे? हेच फळ काय त्यांच्या प्रेमाचे? या लोकांना उद्धवसाहेबांचे प्रेम कळलेच नाही. आता यावर पुन्हा काही लोक म्हणत आहेत की, त्यामुळेच तर साहेबांचा टोमणेयुक्त चिडचिड ते टोमणेयुक्त रडरड प्रवास सुरू झाला आहे.
आता दिल्ली दूर नाही!
अरविंद केजरीवाल म्हणतात की, “दिल्लीचे लोक पाकिस्तानी आहेत का? त्यांनी आम्हाला निवडून दिले.” ते असे का म्हणत आहेत, तर नुकतीच अमित शाह यांनी दिल्लीत सभा घेतली. ते म्हणाले की ”अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी अशी लोक आहेत की, त्यांचे समर्थक पाकिस्तानात आहेत.” ‘इंडी’ आघाडीचे नेते म्हणतात की, पीओकेबद्दल बोलू नका, पाकिस्तानचा सन्मान करा. कारण, त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहे. ते जे काही म्हणालेत, त्या सगळ्या वक्तव्यांचे संदर्भ-पुरावे आहेत. या सगळ्यांवरून भारतीय जनता राहुल गांधी किंवा केजरीवाल यांच्यावर संतप्तही झाली होती.तर अमित शाह यांनी केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्या पाकिस्तानी समर्थकांवर प्रश्न उपस्थित केल्यावर केजरीवाल यांना काय उत्तर द्यावे, हे सूचले नाही. त्यामुळेच वडाची साल पिंपळाला लावत ते भलतेच खोटे बोलत आहेत. ‘भ्रष्टाचार हटाव, भ्रष्टाचार हटाव’ म्हणत सत्तेत आल्यावर ज्यांचं मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या गर्तेत गेले, ते अरविंद हाडाचे धूर्त राजकारणी आहेत, हेच खरे. लोकांच्या मानसिकतेशी खेळायचे, त्यांना कोणते विधान केल्यावर राग येईल, याचा अंदाज घेत बोलायचे, हा त्यांचा पूर्वीपासूनचा धंदाच. त्यातूनच मग ‘हे मोफत, ते मोफत’ अशा अत्यंत अव्यवहारिक अर्थपद्धतीचे आश्वासन त्यांनी दिल्लीकरांना दिले होते. आपण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असून, आपण जनतेच्या भल्यासाठीच सर्व करतो, असा आव एकीकडे आणायचा आणि दुसरीकडे स्वत:ची तुंबडी भरायची, हे काम त्यांनी इमानेइतबारे केले. दारू घोटाळा हे त्याचे उत्तम उदाहरण. अरविंद केजरीवाल यांचा भ्रष्टाचाराचा भीषण चेहरा दिल्लीकरांसमोर आला. आता जनतेच्या मनात पुन्हा स्नेह कसा जागवणार? विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात जनतेत क्लेष कसा निर्माण करणार? तर त्यांनी सवयीप्रमाणे खोट्याचा आधार घेतला. अमित शाह दिल्लीकरांविरोधात काहीही बोलले नसतानाही अरविंद यांनी अमित शाहंना विचारले आहे की, दिल्लीकर काय पाकिस्तानी आहेत का? यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, केजरीवाल काहीही म्हणाले तरी त्यांनाही माहिती आहे की, भाजपसाठी आता दिल्ली दूर नाही!
एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.