योगाने निर्वैरता

    20-May-2024
Total Views |
yoga
योगशास्त्रात अहिंसा पालन करण्यास सांगितले आहे. शारीरिक, मानसिक, वाचिक त्याचा ऊहापोह आपण आधीच्या लेखात केलेला आहेच. आपला असा मत्सर होत असल्यास आपली, आपल्या कुटुंबाची प्रगती थांबते, आरोग्य बिघडते वगैरे आणि म्हणून, काही अपवाद वगळता अहिंसापालन करावे.
 
अहिंसा या दुसर्‍या यमाने साध्य होणारा सद्गुण म्हणजे निर्वैरता. निर्वैरता म्हणजे आपले वैर न होणे, मत्सर न होणे. जे सर्व अदृष्य आहे, ज्याचा फक्त परिणाम दिसतो, त्याला ‘लिटमस टेस्ट’ किंवा ताप मोजायला जसं थर्मामीटर असतं तसं ते मोजायला काही यंत्र नसतं. पण, अनेक विज्ञाननिष्ठ लोकसुद्धा हाताला, पायाला, गळ्याला गंडेदोरे, धागे, बांधलेले आपल्याला आढळतात. राजकारणी तर जास्त प्रमाणात आढळतात. आयुर्वेद चिकित्सेच्या प्रकरणात पण त्यांचं वर्णन आढळते. (संदर्भ : टिळक विद्यापीठ प्रणीत आयुर्वेद पदविका-१ पाठ्यपुस्तिका). त्यावर दृष्ट काढणे हा उपाय सुचवतात. त्याला परत काही वैज्ञानिक आधार नाही. पण, आई आपल्या बाळाची किंवा आजी आपल्या नातवाची दृष्ट काढताना आपण लहानपणापासून पाहिलं आहे. ती काढली की, ते बाळ बरं होतं हा आपला अनुभवही आहे. याबाबत वीर हनुमानाचे, गंधमादन पर्वतावर पहुडलेल्या स्थितीत असताना जेव्हा भीमाचा पाय एका मुळीत अडकतो, ती मुळी म्हणजे वीर हनुमानाची शेपटी असते.
 
 
भीमाला आपला पाय सर्व साता हत्तींचा जोर लावूनही निघत नाही, तेव्हा त्याला वीर हनुमान सांगतो की, “तुझी दृष्टी आहे तेवढीच सृष्टी नाही.” भीमाचे गर्वहरण होते. हे वाक्य तथाकथित विज्ञाननिष्ठांनी लक्षात घेणं गरजेचे आहे. कारण, हे प्रकरण काहीसे त्यातीलच आहे. अघोरी विद्येचे साधक तर त्यावर बर्‍याच उपाययोजना सांगतात. नाथपंथीयांमध्ये त्याला बरीच मान्यता आहे. दृष्ट लागण्यावर, मत्सर होण्यावर ते बरेच उपाय सांगतात. यावर त्यांचा ‘डाबर संहिता’ नावाचा स्वतंत्र ग्रंथच आहे. काही धर्मीयांमध्ये झाडा काढणे, हा उपाय करतात. भारतीय ज्ञानगंगेत असे बरेचसे ज्ञान आहे, जे आमच्यापर्यंत पाश्चात्त्य शिक्षणप्रणाली अवलंबिल्यामुळे आलेच नाही. ते ज्ञान आम्ही ‘अंधश्रद्धा’ या गोंडस नावाखाली झाकून टाकले. तरीही भारत सरकारने नव्वदच्या दशकात ‘आल्टर्नेटिव्ह सिस्टीम्स ऑफ मेडिसिन्स’ या सदराखाली इतर शास्रांना मान्यता दिली आहे. त्यात निसर्गोपचार, योग, आयुर्वेद, चुंबक चिकित्सा इत्यादी भारतीय विद्या येतात.
 
योगशास्त्रात अशी वैरता, मत्सर होऊ नये म्हणून दुसरा यम म्हणजे अहिंसा पालन करा असे सांगितले आहे. का होतं असं वैर किंवा मत्सर? तर त्याला विषमता ही कारणीभूत आहे. ज्ञानाची, बळाची, साधनसंपत्तीची विषमता. हे प्रत्येकाकडे आपापल्या कुवतीप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे असतं. पण, माझ्याकडे नाही अन् ती समोरच्याकडे आहे, हे बघून त्याच्याविषयी माझ्या मनात जळजळ, द्वेष निर्माण होतं आणि त्यातून मत्सर होतो. अशा विषमतेची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. त्यातूनच शारीरिक, मानसिक व वाचिक हिंसा घडत असतात व इतिहास घडतो. उदाहरणार्थ, लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापण्याची शारीरिक हिंसा केली नसती, तर कदाचित रामायण वेगळं घडलं असतं. प्रभू रामचंद्रांच्या वनवासकाळातून अधिक ज्ञान आपल्याला मिळालं असतं. मय महालात पाणी की जमीन हे ओळखून आल्याने पाण्यात पडलेल्या दुर्योधनाला अंधाचा पुत्र अंध असे द्रौपदीने हिणवून दुर्योधनाची मानसिक हिंसा केली नसती, तर तिचं वस्त्रहरण कदाचित झालं नसतं व महाभारत वेगळं घडलं असतं. कारण, अशा हिंसेतून येणारे शाप हिंसा करणार्‍या एकट्याला नाही, तर संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. बलात्काराच्या हिंसेतून मृत पावणार्‍या किती महिला आशीर्वाद देऊन जातात?, नव्हे त्या तडफडत शापच देतात.
 
 प्राण्यांना विचारशक्ती नसते, पण भावना असतात. मारले जाणारे किती प्राणी आशीर्वाद देऊन मरतात? ते शापच देतात. ‘शरादपी, शापादपी’ असं प्रतिकाराचं सूत्र द्रोणाचार्यांपासून चालत आलं आहे. म्हणजे, प्रतिकारास शक्ती कमी पडली तर शाप देईन, असा त्याचा अर्थ. पशुहिंसा तर सतत सुरूच असते. बरेच लोक पशू मारून खातात. अदृष्य सृष्टीत त्यांचे हे शाप एकवटून सर्वांनाच भोवतात. हे ब्रह्मांंड पूर्णपणे सूक्ष्म तरंगांवर चालतं, असे सर्व शापित तरंगे एकवटून ताकदवान बनतात, मग त्सुनामी येतात, भूकंप होतात, आगीत, पुरात माणसं मरतात. असं तरंगशास्त्राचे अभ्यास करणारे शास्त्रज्ञसुद्धा सांगतात. या विश्वात कारणाशिवाय काही घडत नाही. वाईट घटना घडण्यात माणसांची हिंसक वागणूकच बर्‍याच अंशी कारणीभूत ठरते. मग ती हिंसा शारीरिक, मानसिक आणि वाचिक यापैकी कोणतीही असो, तिचे दुष्परिणाम ठरलेलेच आहेत.
 
म्हणून योगशास्त्रात अहिंसा पालन करण्यास सांगितले आहे. शारीरिक, मानसिक, वाचिक त्याचा ऊहापोह आपण आधीच्या लेखात केलेला आहेच. आपला असा मत्सर होत असल्यास आपली, आपल्या कुटुंबाची प्रगती थांबते, आरोग्य बिघडते वगैरे आणि म्हणून, काही अपवाद वगळता अहिंसापालन करावे. अपवाद म्हणजे स्वसंरक्षणाला कायदा पण मान्यता देतो. स्वसंरक्षणासाठी/देशरक्षणासाठी केलेली हिंसा ग्राह्य आहे. म्हणून देशासाठी सीमेवर लढताना हिंसा करावीच लागते. सामोपचाराने लढाई मिटत असल्यास प्रयत्न जरूर करावेत. भगवान श्रीकृष्णांनी काय कमी प्रयत्न केलेत युद्ध टाळण्यासाठी, पांडवांची फक्त पाच गावांची मागणी असतानासुद्धा युद्ध झालेच. कारण, त्यामागे बर्‍यापैकी कोणत्या तरी प्रकाराची हिंसा व विषमताच कारणीभूत आहे. विषमता कमी करण्यास सत्पात्रीदान करणे हा पण उपाय आहे. त्याचा ऊहापोह आपण आधीच्या लेखात केलेला आहे.त्याकरिता आपला, आपल्या कुटुंबाचा व पर्यायाने समाजाचा विकास, प्रगती साधण्यासाठी आपण आपल्या जीवनात अहिंसा पालन करून निर्वैरता प्राप्त करावी.(क्रमशः)

 
डॉ. गजानन जोग

(लेखक योगोपचार तज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)