शेतमजूर ते यशस्वी शेतकरी

    20-May-2024   
Total Views |
Narayan Chendwankar

नारायण तुकाराम चेंदवणकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी. शेतमजूर ते यशस्वी शेतकरी हा त्यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख....
 
शेती काय उद्योग असतो का? त्यात काय यश मिळणार? असे एक गृहीतक असते. मात्र, हे गृहीतक शेतकरी नारायण चेंदवणकर यांनी बदलले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण चेंदवणकर या शेतकर्‍याला यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार नुकताच जाहीर झाला. त्यांच्यावर सन्मान, कौतुकाचा वर्षाव होत होता. मात्र, या सगळ्या सोहळ्यात नारायण यांना आईची आठवण येत होती. ती म्हणायची “कोठेतरी नोकरी कर. कामधंदा बघ. शेतीने काय होणार?” आपल्या एकुलत्या एका लेकराने शेतीत जीव जरी ओतला, तरी त्याचे भले होईल का, अशी तिला कायमच चिंता. या पार्श्वभूमीवर आज नारायण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यांत हुशार, यशस्वी शेतकरी म्हणून नावलौकिक कमविला. मात्र, शेतीचे यश, लेकराचा हा सन्मान पाहायला ती माऊली नव्हती. ती आधीच देवाघरी गेली होती.नारायण चेंदवणकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यशस्वी शेतकरी. तसेच, मधमाशी संवर्धन आणि त्यासंदर्भातील व्यवसायांमध्येही त्यांचे यश लक्षणीय. आजपर्यंत त्यांनी १२५ पेक्षा अधिक मधमाशांच्या पोळ्यांचे संवर्धन केले आहे. समर्थ रामदास स्वामींनी म्हटले आहे,
 
जे जे आपणासी ठावे,
ते इतरांसी सांगावे,
शहाणे करून सोडावे,
सकल जन
 
या ओवीनुसार नारायण यशस्वी शेतीचे गमक, मधमाशा पालन-संवर्धन व्यवसाय याविषयीचे प्रात्यक्षिक ज्ञान इच्छुकांना देतात. जिल्ह्यातील १४ शाळांमधील विद्यार्थ्यांना ते ‘शेती : यशस्वी व्यवसाय’ ही संकल्पना शिकवतात. डॉक्टर, अभियंते, ऑफिसर तर सगळ्यांनाच बनायचे आहे, पण नव्या पिढीमध्ये यशस्वी शेतकरी व्हावे, असे स्वप्न नारायण रूजवित आहेत. त्यांच्या शेतीविषयक इत्थंभूत वास्तविक आणि आधुनिक ज्ञानामुळे त्यांना अनेक ठिकाणी सल्लागार म्हणूनही बोलविले जाते. पुण्यातील एका नामांकित कंपनीने त्यांना सिंधुदुर्ग आणि परिसरातील काही सेवाभावी संस्थांमध्ये शेतकी सल्लागार म्हणूनही नियुक्ती केली आहे. ‘भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठाना’च्या माध्यमातून नारायण यांनी ओरस येथील तुरुंगातील जन्मठेपेच्या कैद्यांनाही शेती शिकवली. कैद्यांमध्ये सकारात्मकता वाढावी, यासाठी त्यांना शेती शिकवण्याचे शिवधनुष्य नारायण यांनी यशस्वीरित्या पेलले आणि ओरसच्या तुरुंगातील पडीक जागेवर शेतीचे नंदनवन फुलले. जन्मठेपेची शिक्षा भोगणारे ते कैदी शेतीत रमले. त्या शेतीतून पिकणारा भाजीपाला दुसर्‍या दोन तुरुंगात दैनंदिन स्वयंपाकासाठी पाठविला जातो. ही एक यशोगाथाच होती, तर अशा समाजशील शेतीतज्ज्ञ नारायण यांचा जीवनपट पाहू.
 
सिंधुदुर्गच्या कुडाळमधील बांबुळी गावचे तुकाराम आणि जिजाबाई चेंदवणकर हे हिंदू महार समाजाचे दाम्पत्य. जातीचा उल्लेख यासाठी की, या दाम्पत्याला तीन अपत्ये. त्यापैकी एक नारायण. कृषितज्ज्ञ म्हणून नारायण यांना गावात मान आहे. सर्वजातीय समाज नारायण यांना त्यांचेच सदस्य मानतो. त्यात ब्राह्मण, मराठा आणि सगळेच आले. सकल गावाच्या गळ्यातले ते ताईत. इतके यश, प्रेम मिळविणारे नारायण म्हणतात, “जातीवरून नाही, तर कर्मावरून गुणांवरून माणसाचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.” तर, नारायण यांचे पिता तुकाराम हे शेतमजुरी करत आणि आई जिजाबाई टोपल्या विणत. घरी दारिद्य्रच! त्या गावात बाबा आमटे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले मधुभाई पंडित यांनी सामूहिक शेती सुरू केली. त्यामध्ये तुकारामही सहभागी झाले. नारायण इयत्ता पहिलीत शिकत असतानाच त्यांच्या पित्याचा मृत्यू झाला. जिजाबाई यांच्यावर आकाश कोसळले. त्यावेळी मधुभाई यांनी नारायण यांना शिक्षणासाठी सहकार्य केले. नारायण हे त्यावेळी अभ्यासापेक्षा खेळात रमत. त्यामुळेच ते दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले.

शाळा सोडली. ते शेतमजुरी करू लागले. पुढे दुकानात विक्रेता म्हणून काम करू लागले. या सगळ्यात एक मात्र चांगली गोष्ट होती. ती म्हणजे, त्यांना वाचनाचा छंद होता. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सगळे साहित्य वाचले. त्यामुळेच, त्यांच्या आयुष्यात प्रेरणात्मक बदल झाला. याच काळात त्यांचा विवाह उज्ज्वला यांच्याशी झाला. साथ देणारी जीवनसाथी भेटली. थातूर-मातूर नोकरी करण्यापेक्षा शेती करायची, असे नारायण यांनी ठरविले. शेतमजुरी केल्यामुळे शेतीचे जुजबी ज्ञान होतेच. पण, वाचनाच्या छंदामुळे त्यांनी शेतीविषयक अभ्यास सुरू केला. त्या अभ्यासाचा उपयोग शेतीसाठी केला आणि त्यांचा शेतीव्यवसाय बहरला. शेतीविषयक ज्ञान मिळविताना त्यांना परागीभवन आणि मधमाश्यांचे महत्त्व कळले. त्यांनी मधमाशी संवर्धनासंदर्भातील पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. शेतीसोबत मधमाशी संवर्धन करावे, असे त्यांनी ठरविले. त्यासाठी ‘भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान’चे डॉ. प्रकाश देवधर यांनी खूप सहकार्य केले. आर्थिक मदत केली. नारायण यांनी मधमाशी संवर्धनाचा व्यावसायिक प्रयोग केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. मेहनत आणि पैसे वाया गेले. पण, नारायण यांनी हार मानली नाही. आपले काय चुकले, याचा त्यांनी शोध घेतला. एक वर्ष त्यासंदर्भात अभ्यास केला आणि आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात मधमाशी संवर्धनातील सगळ्यांत मोठे नाव म्हणजे नारायण चेंदवणकर आहे. नारायण म्हणतात, “पुढेही शेतीचे नवनवीन आणि यशस्वी प्रयोग करायचे आहेत. कोकणात समृद्ध शेतीची संकल्पना रूजली आहे, ती वैभवशाली, समृद्ध करायची आहे.” शेतमजूर ते यशस्वी शेतकरी म्हणून नावलौकिक मिळविणार्‍या नारायण चेंदवणकर यांचे यश प्रेरणादायी आणि समाजासाठी नक्कीच मार्गदर्शक आहे.

 


 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.