प्रकाशझळांचे प्रदूषण...

    20-May-2024   
Total Views |
Light pollution


वाढत्या पर्यावरणीय समस्यांविषयी आपण नेहमीच ऐकत, वाचत, पाहत असतो. यामध्ये प्रचंड प्रदूषण, तापमानवाढ, अधिवासांचे नुकसान, विविध प्रजातींचे नामशेष होणे असे अनेक मुद्दे येतात. यामध्येच एक अल्पपरिचित विषय म्हणजे प्रकाश प्रदूषण! होय, प्रकाशाचेसुद्धा प्रदूषण होते. ‘लाईट पोल्यूशन’ अर्थात प्रकाश प्रदूषणाची अनेक कारणे आहेत. प्रकाश प्रदूषण म्हणजे कोणताही अयोग्य, फार गरज नसलेल्या ठिकाणी अति प्रमाणात किंवा जास्त कृत्रिम प्रकाशाची उपस्थिती असणे.
 
 जगभरातील सिंगापूर, कतार आणि कुवेत या देशांमध्ये सर्वाधिक प्रकाश प्रदूषण आहे. त्याचबरोबर उत्तर अमेरिकेचा मोठा भाग, युरोप आणि मध्य आशिया या भागांमध्ये ही प्रकाश प्रदूषण मोठ्या प्रमाणावर आहे. एलइडी लाईट्स, हॅलोजन्स, विविध लॅम्पस अशा प्रकाश साधनांचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एवढंच नाही तर घरे, रस्ते, इमारती, कार्यालये हे कमी म्हणून की काय, अगदी होर्डिंग्जवरसुद्धा प्रकाशवर्षाव झालेला दिसतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकाश साधने वाढल्यामुळे आसमंत प्रकाशमान तर झाला, पण याचा निसर्गातील अनेक घटकांना मोठा फटका बसला आहे.उदाहरणार्थ, ग्रामीण नाही पण शहरी भागात असणार्‍या किती जणांनी रात्रीच्या वेळी चांदणं बघायचा प्रयत्न केलाय? हा प्रयत्न अनेकदा अपयशीच ठरलेला दिसतो. याचं कारण बर्‍याचदा आपल्याला आकाशात पाहिल्यावर चांदणं दिसतच नाही. हा अनुभव तुमच्यापैकी अनेकांनी घेतला असेलच. याला हवेतील प्रदूषण वगैरे अशी इतर काही कारणं असली तरी प्रकाश प्रदूषण हेही एक महत्त्वाचे कारण आहे. ते कसं? तर, प्रकाशात आपल्याला एखादी गोष्ट दिसते म्हणजे काय होते, तर त्यावर प्रकाश परावर्तित होऊन तो आपल्या दृष्टीस पडतो आणि मग त्याची प्रतिमा आपल्या डोळ्याच्या पटलावर उमटते. त्यामुळेच वैज्ञानिक दृष्टीने विचार केल्यास गडद अंधार असेल तेव्हा शुभ्र चांदणं पाहता येईल.
 
हेच कशाला, अगदी दैनंदिन आयुष्याचा विचार केला तर खोलीतली प्रकाश घालवल्यानंतर काही सेकंदांत आपल्याला खोलीतल्या सर्व वस्तू दिसू लागतात. याचाच अर्थ पूर्ण अंधार झाल्यानंतरसुद्धा खोलीत कुठून ना कुठून प्रकाश येत असतो. मानसशास्त्रीय अंगाने यामुळे व्यक्तीच्या निद्रा आरोग्यावर परिणाम होत असून, त्यामुळे निद्रानाश, चिडचिड असे परिणाम दिसतात. तसेच मानवी वागणुकीतही बदल झाल्याचे अहवाल उपलब्ध आहेत. मनोविकारांचे प्रमाणही यामुळे वाढले असल्याचे म्हंटले जाते. मानवी आरोग्यावर जर या प्रकाश प्रदूषणाचे इतके परिणाम दिसत असतील, तर अर्थातच त्याचे पर्यावरणावर आणि पर्यावरणीय परिसंस्थेवर परिणाम होतात. केवळ रात्रीच्या वेळी कृतिशील म्हणजेच निशाचर असणार्‍या प्राण्यांचा किंवा इतर प्रजातींचा अधिवास आणि सवयींना प्रामुख्याने फटका बसत आहे. रात्रीच्या वेळी अ‍ॅक्टिव्ह असणार्‍या या प्राण्यांना पूर्ण अंधाराची गरज असते, जेणेकरून ते योग्य पद्धतीने आपले जीवनचक्र पार पाडू शकतील. याचंच आणखी एक उदाहरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झालेला काजवा महोत्सव.

मुळातच स्वतः प्रकाशमान असलेले काजवे मोठ्या संख्येने पाहायला अनेक पर्यटक जातात. त्यावेळी काजवे पकडून किंवा झाडावरील काजव्यांची फोन आणि कॅमेर्‍याच्या माध्यमातून केली जाणारी फोटोग्राफी यामुळेही त्या काजव्यांना अंधाराच्या वेळी या प्रकाशाचा त्रास होतो, असे काही अहवाल सांगतात. एखाद्या प्राण्याचे जीवनचक्र बिघडले म्हणजे, ती संपूर्ण परिसंस्थाच विस्कळीत व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच प्रकाश प्रदूषणावर पर्याय शोधणे गरजेचे आहे. प्रकाशाला पर्याय किंवा उपाय असे ठोस नसले, तरीही यामध्ये प्रकाशाचा वापर कमी करणे त्याचबरोबर नको त्या ठिकाणी प्रकाशाचा विनाकारण वापर टाळणे, हे उपाय योग्य ठरू शकतील. प्रकाश व्यवस्थेवर केला जाणार अवाजवी खर्च आणि त्याला दिले गेलेले महत्त्व, यामुळे कोणकोणत्या घटकांवर परिणाम होतात, काय परिणाम होतात, त्यामुळे भविष्यात काय होऊ शकतं, या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. सारासार विचारातूनच योग्य निर्णय घेत अवाजवी, अयोग्य ठिकाणी आणि अयोग्य प्रमाणात होणार प्रकाशाचा वापर टाळत योग्य पर्यायांची निवड करायला हवी!



 

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.