नवी दिल्ली: गेल्या दहा वर्षात झालेल्या परिवर्तनामुळे भारताच्या बँकिंग क्षेत्राचा निव्वळ नफा इतिहासात प्रथमच ३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. बँकांचे आरोग्य सुधारल्याने गरीब, शेतकरी आणि एमएसएमई यांच्यासाठी कर्जाची उपलब्धता सुधारणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले की, गेल्या दहा वर्षांमध्ये प्रथमच देशाच्या बँकींग क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचे बदल झाले आहेत. यामध्ये प्रथमच भारतीय बँकींग क्षेत्राचा नफा ३ लाख कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवरही टिका केली. ते म्हणाले, ज्यावेळी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेत आले; त्यावेळी संपुआ सरकारच्या फोन बँकींग धोरणामुळे बँकींग क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. बँकांना एनपीएचा सामना करावा लागत होता आणि गरिबांना तर बँकांचे दरवाजे बंदच होते, असेही पंतप्रधानांनी म्हटले होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीदेखील या यशाचे कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या, २०२३-२४ या एक आर्थिक वर्षात बँकिंग क्षेत्राचा निव्वळ नफा ३ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याची ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने एका दशकात व्यावसायिकता आणि कोणताही राजकीय हस्तक्षेप बँकींग क्षेत्रामध्ये केला नाही आणि त्याचा परिणाम आता आपल्या समोर असल्याचे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३.१ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २.२ लाख कोटी रुपये होता, असा अहवाल नुकताच समोर आला आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा १.४ लाख कोटी रुपये होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३४ टक्के अधिक आहे. खाजगी बँकांचा निव्वळ नफा १.७ लाख कोटी रुपये आहे, तर गेल्या आर्थिक वर्षात तो १.२ लाख कोटी रुपये होता.