कानातील गुजगोष्टी...

    20-May-2024   
Total Views |
Kanhaiya Kumar
 
भारतमातेचे तुकडे करण्याचे स्वप्न पाहणार्‍या आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला कन्हैया कुमारला काँग्रेसने उमेदवारीच्या पायघड्याच अंथरल्या. दिल्लीतून काँग्रेसने उमेदवारी देऊन कन्हैया कुमारच्या वक्तव्याचे एकप्रकारे समर्थनच केलेले दिसते. ईशान्य दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार्‍या याच कन्हैया कुमारला निवडणूक प्रचारादरम्यान एका तरुणाने कानशिलात लगावली आहे. मुळात राजकारणात अपयशाचे उदाहरण म्हणजे कन्हैया कुमार. बिहारमधून मागील लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले खरे, परंतु त्याचा पराभव झाला. आपण ‘सीपीआय’च्या तिकिटावर बिहारमधून निवडून येऊ शकत नाही, याची जाणीव झाल्यानंतर लागलीच काँग्रेसमध्ये कन्हैय्याने उडी घेतली. काँग्रेसनेही देशविरोधी कन्हैयाचा सवयीप्रमाणे यथोचित सन्मान केला. कन्हैयाला पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने आलेल्या तरुणांनी त्याला कानशिलात मारली आणि शाई फेकली. यानंतर कन्हैया कुमारच्या समर्थकांनी तरुणाला पकडून बेदम मारहाण केली. या घटनेबाबत ‘आप’च्या महिला नगरसेवकाने पोलिसांत तक्रार केली आहे. दरम्यान, भाजपचे मनोज तिवारी यांच्याशी त्याची लढत आहे. कुणालाही मारहाण करणे किंवा कानशिलात लगावणे याचे नक्कीच समर्थन होऊ शकत नाही. परंतु, ज्याने कानशिलात लगावली, तो नेमके काय बोलला, हेही जाणून घेणे आवश्यक आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’, ‘अफजल आम्हाला लाज वाटते, तुझा खुनी जीवंत आहे’, अशा घोषणा कन्हैया कुमार देतो. आम्ही दोघांनीही त्याला गालात मारून प्रत्युत्तर दिले. जोपर्यंत आमच्यासारखे सनातनी जीवंत आहेत, तोपर्यंत कोणीही भारताचे तुकडे करू शकत नाही, असे व्हिडिओतील तरुण म्हणताना दिसतो. व्हिडिओमध्ये दोन्ही तरुण ‘भारतमाता की जय’, ‘भारतीय सेना झिंदाबाद’, ‘गोमाता की जय’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत आहेत. कन्हैयाने ‘सीपीआय’मध्ये असताना २०२० मध्ये बिहारमध्ये ‘जन-गण-मन यात्रा’ काढली होती, तेव्हादेखील त्याला अशाच विरोधाचा सामना करावा लागला होता. त्याच्या ताफ्यावर अनेक ठिकाणी हल्ले झाले. लोक ताफ्यावर अंडी, शाई, जळालेले मोबाईल आणि दगडफेक करत होते. त्यामुळे कन्हैयाने आता काँग्रेसचा आसरा घेतला असला तरीही देशाचे तुकडे करण्याची भाषा करणार्‍या व्यक्तीसाठी नागरिकांमध्ये किती द्वेष आहे, हे स्पष्ट होते.
 

सभेतून पळ, पराभवाचे फळ

 
लोकसभेच्या रणांगणातून आधीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पळ काढला आहे. अमेठी सोडून आता रायबरेलीमधून ते निवडणुकीच्या रिंगणात आहे. तत्पूर्वी पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी तर आधीच राज्यसभेद्वारे संसदेत पोहोचल्या आहे. आताही उत्तर प्रदेशात एका सभेमध्ये राहुल गांधी भाषण न करताच निघून गेले. त्यांच्या बरोबरीने सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही सभेतून काढता पाय घेतला. विशेष म्हणजे, ज्याठिकाणी ही सभा होती, तिथे एकेकाळी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू खासदार होते. उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळील फुलपूर येथे रविवारी झालेल्या संयुक्त रॅलीत मोठा गोंधळ उडाला. दोन्ही नेते मंचावर येताच, समर्थकांनी नियंत्रणाबाहेर जाऊन सुरक्षा कठडा तोडला. पोलिसांनी लाठीमार केला. या गोंधळात अनेक जण जखमी झाले आहेत. अखिलेश यांनी समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले खरे; मात्र त्याचा काहीएक फायदा झाला नाही. अखिलेशसोबत राहुल यांनीही हात वर करून लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. तरीही लोकांनी ऐकले नाही. आपले म्हणणे न ऐकल्याने अखिलेश यांचा संताप झाला. ते निघून जाताना त्यांना कार्यकर्त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र ते थांबले नाही. भाषण न करताच त्यांना मंच सोडावा लागला. आपलेच कार्यकर्ते ऐकत नसतील तिथे राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी जनतेला ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे सल्ले करी का द्यावे म्हणा. उलट, त्यांनी सर्वप्रथम आपल्या कार्यकर्त्यांना ‘मोहब्बत की दुकान’चा पाठ द्यावा. म्हणजे असं भर सभेतून पळून जावं लागणार नाही. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रत्येक आवाहनाला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पंतप्रधान जे आवाहन करतील, ते देशहिताचेच असेल, असे मानून जनतेने त्यांच्या आवाहनानुसार लॉकडाऊन काळात प्रशासनाला संपूर्ण सहकार्य केले. बंगालमध्ये तर एक अजब प्रकार समोर आला.एका काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्याच पक्षाचे अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांच्या बॅनरवरील फोटोला काळे फासले. त्यामुळे काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षाच्या अध्यक्षावर विश्वास नसेल, तर मतदार तरी विश्वास का म्हणून ठेवतील, असाही प्रश्न आहेच.
 
 

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.