"उद्धवजींचा मुंबईत खालून पहिला नंबर!"

आशिष शेलारांचा ठाकरेंना टोला

    20-May-2024
Total Views |

Uddhav Thackeray 
 
मुंबई : उद्धव ठाकरे आणि उबाठा सेनेचा प्रचार बघता मुंबईत त्यांचा खालून पहिला नंबर राहील, असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी लगावला आहे. सोमवारी सकाळी ७ वाजतापासून लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून आशिष शेलारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
 
आशिष शेलार म्हणाले की, "गेल्या काही दिवसांत उत्तर मध्य मुंबईत प्रचारादरम्यान नागरिकांचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद बघता महायुतीचे उमेदवार अ‍ॅड उज्ज्वल निकम यांचा विजय निश्चित आहे. आमचे विरोधक विशेषतः उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात गाठलेला खालचा स्तर पाहता निकालात उद्धवजींच्या पक्षाचा खालून पहिला नंबर राहील."
 
हे वाचलंत का? -  लोकसभेच्या अंतिम टप्प्यात सकाळी ९ पर्यंत 'इतकं' मतदान!
 
"उद्धवजी आणि उबाठा सेना प्रचंड घाबरलेले आहेत. मी एवढे पळपूटे उद्धवजी आणि त्यांचे कार्यकर्ते कधीच बघितले नाही. भाजप सोबत नसल्याने घबराट होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे ईव्हीएम, निवडणूक आयोग या सगळ्यांवर त्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. एवढी घबराट आणि पळपुटेपणा उद्धवजी तुमच्या पक्षाचा असेल तर रिंगणातून बाहेरच पडा," असे ते म्हणाले.
 
तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशाच्या या लोकशाहीच्या महोत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे आणि आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही आशिष शेलारांनी मुंबईकर मतदारांना यावेळी केले आहे.