घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाची उचित चौकशी करा : अभाविप

    17-May-2024
Total Views |

Ghatkopar Hording Accident

मुंबई (प्रतिनिधी) :
(Ghatkopar Hording Accident) मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात सोमवार, दि. १३ मे रोजी धुळीचे वादळ तसेच अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी अनेक ठिकाणी झाडे, पत्रे तसेच फलक पडण्याच्या घटना घडल्या. मुंबईतील घाटकोपर परिसरात हायवे जवळील जाहिरातीचे मोठे होर्डिंग याच वादळी वाऱ्यांमुळे शेजारील पेट्रोल पंपावर पडले. १०० पेक्षा जास्त नागरिकांवर उपचार सुरू असून दुर्घटनेत आत्तापर्यंत १४ निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शोक व्यक्त करत उचित चौकशी करण्याबाबत मागणी केली आहे.

हे वाचलंत का? : नागपूर येथे 'कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय'ला सुरुवात

"झालेल्या घटनेत हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणापासून मुकावे लागले असल्याचे आढळून आले आहे. शासनाने योग्य ती चौकशी करत दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी तसेच यापुढे तत्सम घटना होणार नाहीत याची खबरदारी बाळगावी.", असे मत अ.भा.वि.प. चे कोकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई यांनी व्यक्त केले आहे. दुर्घटनेतील उपचारार्थ नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत तसेच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या आत्म्यास परमेश्वर सद्गती प्रदान करो व त्यांच्या कुटूंबियांना दुःखातून सावरण्याकरता बळ देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.