‘माणूस जगला पाहिजे,’ या विचाराने मातंग समाजाच्या उत्थानासाठीच विचारकार्य करणार्या डॉ. हेमलता सोलवंडे. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
निवृत्ती समाजाच्या कामासाठी आळंदीला गेलेले. घरात त्यांची पत्नी सुभद्रा आणि सहा लहान लेकरे. अठराविश्व दारिद्य्र. त्यात पावसामुळे सुभद्राबाईंना मजुरीचेही काम मिळाले नाही. त्यामुळे घरात दोन दिवस अन्नाचा कण शिजला नव्हता. नेमका ढग फुटल्यासाारखा पाऊस कोसळू लागला आणि ते जुनेपुराणे, न जाणो कितीवेळा पडलेले आणि कसेबसे पुन्हा उभे केलेले घर कोसळले. कोसळत्या घराचा तो झालेला चिखल आजूबाजूला भरलेले पाणी, कोठे जायचे काय करायचे? त्या चिखलात पाण्यात घरचा दरवाजा तरंगत होता. चिखल पाण्यात बसण्यापेक्षा सुभद्रा यांनी भुकेने कळवळणार्या लेकरांना त्या दरवाजावर बसविले. तेवढेच चिखलापासून बचाव. पावसाचे पाणी आणि सुभद्राबाईंच्या डोळ्यांतील आसवे एक होऊन वाहत होती. हे सगळे त्या दरवाजावर भेदरून बसलेली त्यांची लहान लेक हेमलता पाहत होती. त्या लहान वयातच तिच्या मनात विचार आला की, परिस्थिती पालटायलाच हवी. त्यासाठी शिकायलाच हवे.
आज त्या हेमलता यांना सामाजिक कार्यासाठी मुक्ता साळवे प्रतिष्ठान पुणे, अण्णाभाऊ साठे फाऊंडेशन, ज्ञानज्योती मुक्ता साळवे प्रतिष्ठान, महिला विकास संस्था पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘एमए’, ‘बीएड’, ‘पीएचडी’ आणि ‘सेट’चीही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या हेमलता या सामाजिक कार्यासोबतच साहित्याचीही सेवा करतात. ‘खंडोबांची गाणी - एक लोकतत्वीय अभ्यास’ हा त्यांचा शोधप्रबंध प्रकाशित झाला आहे. येणार्या काळात ‘कवडसे’ हा कथासंग्रह, ‘कळ्या उमलताना’ कवितासंग्रह, ‘व्हय मी सावित्री बोलतेय’ एकांकिका, ‘कौंडिण्यपूर ते कुंडल’, ‘माझी शाहिरी नामदेव सोळवंडे-संपादन’ ही पुस्तके प्रकाशित होणार आहेत. संपर्कात येणार्या कोणाही गरजू गरिबांची मदत करावी, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरवावी, गरीब पित्याच्या लेकीचा विवाहखर्च उचलावा, मुलगा काय, मुलगी काय दोघांनीही उच्चशिक्षण घ्यावे, यासाठी, हेमलता काम करतात. पुणे परिसरात एक चांगल्या व्याख्यात्या म्हणून त्या सुपरिचित आहेत. भारतीय संतपरंपरा, प्राचीन संस्कृती, पाणिनी, संविधान, पंचायतराज अशा अगणित विषयांवर त्या व्याख्याने देतात.
सहज, सोप्या आणि अर्थपूर्ण प्रवाही भाषेतून विषय मांडणी केल्यामुळे हेमलता या लोकप्रिय व्याख्यात्या ठरल्या आहेत. आज हेमलता यांनी समाजामध्ये आदर्श प्रस्थापित केला आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यातील कष्टकरी संवेदनशील, समाजशील कुटुंबवत कुलधर्म संस्कार इज्जत जपणारी नायिका प्रत्यक्षात मानवरुपात असती तर? तर, नक्कीच हेमलता सोलवंडे या त्या नायिकांमध्ये समाविष्ट झाल्या असत्या!डॉ. हेमलता सोलवंडे यांचा हा प्रवास सोपा नाही. डॉ. हेमलता यांचे वडील निवृत्ती गायकवाड आणि आई सुभद्रा हे मूळचे आंबेगाव म्हणजे पुण्यातल्या एका खेड्यातले कुटुंब. दोघांना सहा अपत्ये. कुटुंबाकडे थोडी शेतजमीन होती. पण, त्यातून मिळकत शून्यच म्हणायला हवी. निवृत्ती हे अतिशय धर्मपारायण आणि कीर्तनकार. संत गाडगेमहराजांचा सहवास त्यांना लाभलेला. निवृत्ती आणि सुभद्रा हातपाय जमिनीवर टेकेपर्यंत पायी अनवाणी चालत विठुरायाच्या वारीला जात. मात्र, कुटुंबात अठराविश्व दारिद्य्रच. इयत्ता आठवीपर्यंत हेमलता यांना चप्पल काय असते, ते माहीत नव्हते. शाळेतून वह्या-पुस्तके मिळायची. घरी अन्नाला अन्न नव्हते. अशा परिस्थितीत वीज, नळ, शौचालय असणे शक्यच नाही. यासुद्धा परिस्थितीमध्ये मुलांनी शिकलेच पाहिजे, असे गायकवाड दाम्पत्याचे म्हणणे. त्यांच्या मुलांनीही या परिस्थितीमध्ये शिक्षणाचा ध्यास घेतला.
असो. सुट्टीच्या दिवशी वेळ मिळेल तसा हेमलताही मजुरीला जात. तरीही, त्यांनी शाळेमध्ये पहिला क्रमांक कधी सोडला नाही. त्यांना वाटे आपण डॉक्टर व्हावे. १९८८ साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. पण, शिक्षण घेतानाच जाणवले की, पैशांअभावी आपण वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाही. त्याच काळात घरची आर्थिक परिस्थितीही बिकटच होती. आई अजूनही कोंड्याचा मांडा करत घर चालवित होती. लवकरात लवकर चांगली नोकरी मिळावी, म्हणून मग त्यांनी ‘बीएड’ला प्रवेश घेतला. प्रवेश शुल्कासाठी मैत्रिणींनी मदत केली. प्रतिकूल परिस्थितीतही हेमलता शिकते, याचा या महाविद्यालयातील शिक्षकांना आणि प्राचार्यांना अभिमान, आनंद होता. हेमलताची ते लेकीची काळजी घ्यावी, तशी काळजी घेत. ‘बीएड’चे पहिले वर्ष संपले. दुसरे सुरू झाले. दुसर्या वर्षाचे शुल्क कसे भरणार? वर्ष वाया जाऊ शकत होते. त्यावेळी महाविद्यालयाच्या शिक्षकांनी, प्राचार्यांनी मिळून हेमलता यांचे दुसर्या वर्षाचे शुल्क भरले. या महाविद्यालयात जोशी, गाडगीळ, कांबळे, पाठक, कुलकर्णी बेलसरे, परचुरे इत्यादी शिक्षक होते.
समरस स्नेहशील समाजाचे दर्शन त्यावेळी हेमलता यांना झाले. पुढे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना नोकरी लागली. नोकरी करता करता त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नंदकुमार सोलवंडे या संघस्वयंसेवकाशी त्यांचा विवाह झाला. नंदकुमार अत्यंत सज्जन आणि अभ्यासू होते. त्यांच्या साथीने हेमलता यांचे सामाजिक भानही विस्तारत गेले. विवाहानंतर नोकरी करता करता त्यांनी ‘सेट’ची परीक्षा दिली. तसेच ‘लोकदेव खंडोबा’ या विषयावर ‘पीएचडी’ही केली. हे सगळे करत असताना, त्यांनी समाजातील गरजू गरीबांना स्वतःच्यापायावर उभे राहण्यासाठी, उच्चशिक्षित होण्यासाठी जागृत करणे, मदत करणे हे कार्य कायम ठेवले. आज हेमतला यांचे मातापिता आणि पतीही हयात नाहीत. त्या म्हणतात, “अण्णा भाऊ त्यांच्या साहित्यात म्हणतात - उकिरड्याचेही पांग फिटतात, मग गोरगरीब माणसाचे का नको? माणूस जगला पाहिजे.’ संपर्कातील माणूस खर्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यासाठी मी माझा खारीचा तरी वाटा उचलणार आहे. शून्यातून अस्तित्व घडवू पाहणार्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे.” तर अशा ‘माणूस जगला पाहिजे’च्या विचारांनी कार्य करणार्या डॉ. हेमलता सोलवंडे यांचे विचारकार्य समाजासाठी दीपस्तंभच आहे.