प्रदूषणमुक्त मुंबईचा श्वास, वृक्षारोपणाचा हरित ध्यास...

    14-May-2024   
Total Views |
Mumbais Green Glory
 
नुकतेच मुंबई शहराला सलग तिसर्‍यांदा ‘जागतिक वृक्षनगरी’ या बहुमानाने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने मुंबई शहरातील वृक्षगणना, वृक्षांचे प्रकार आणि एकूणच या महानगराला लाभलेल्या या हरित कवचाच्या संरक्षण आणि संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा हा लेख...

मुंबईमध्ये झाडे लावल्यावर एक चांगली गोष्ट घडते, ती म्हणजे हवा प्रदूषणावर बंधन येते. मुंबई हे असे शहर आहे, जिथे जास्त दाटीची लोकसंख्या आणि त्यातील वाहतूककोंडी, मोठ्या औद्योगिक हालचाली आणि अनेक विकासकामे व बांधकामे होत असल्यामुळे हवा कायम अशुद्ध राहते. ही अशुद्ध हवा रस्त्याच्या दुतर्फा लागवड केलेल्या झाडांमुळे शुद्ध राहते. हवेतील अनेक प्रदुषके झाडे खेचून घेतात व शुद्ध प्राणवायू बाहेर सोडतात. या वृक्षांमुळे निसर्गतः आपोआप हवेच्या दर्जात सुधारणा घडवून आणली जाते.वृक्ष वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड स्वत:कडे खेचून, तो त्यांच्या पोटात साठवून ठेवतात. त्यामुळे हे शहरात उभारलेले वृक्ष वातावरणातील हरितगृह वायूची व्याप्ती कमी करतात. याशिवाय हे वृक्ष शहर-वातावरणातील तापमान नियमित करतात व शहरवासीयांना उन्हाच्या जागी सावली पुरवितात. ठिकठिकाणी जी काँक्रीटची घरे व इतर गृहसामग्रीमुळे वाढलेली उष्णता कमी करण्याचे कामसुद्धा करतात.
 
आपण अनेक ठिकाणी बघितले असेल की, अनेक देशी वा स्थानिक वृक्ष आणि थोडे परदेशी वृक्ष हे मुंबईतील नागरिकांना आदर्श सेवा पुरवित आहेत. कारण, ही झाडे स्थानिक वातावरणाला व नैसर्गिकरित्या जोपासणार्‍या पर्यावरणाला सुयोग्य समजली जात आहेत. या लागवडीतील झाडांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.कोकोनट पाल्म, रेन ट्री, इंडियन महोगनी, वड, पिंपळ, इंडियन लॅबर्नुम, इंडियन कोरल ट्री, इंडियन आलमन्ड, जामुन, गोल्डन शॉवर ट्री, मट्टी ट्री, गेवा ट्री, अ‍ॅपल बेअर, सिता अशक, करिसा करंडा, चिकू, बांबू, चिंच इत्यादी. ही झाडे नागरिकांना उन्हाच्या वेळी सावली तर पुरवितात, शिवाय शहराला सुंदर स्वरुपसुद्धा प्रदान करतात. जंगली प्राण्यांना वस्ती पुरवितात. ही झाडे स्थानिक वातावरणाला आपलेसे करतात व परदेशी झाडांपेक्षा या देशी झाडांना देखभालीचा वेळ व खर्च कमी लागतो. ही झाडे जर आपल्या मुंबई शहरात उभारली, तर प्रादेशिक जैवविविधतेला स्थैर्य मिळेल आणि आरोग्यकारी व उपजीविकायुक्त असे मोठे काम होईल.
 
शहरात वृक्षांच्या उभारणी-मोहिमांमुळे शहराला अनेक वृक्षांची लागवड मिळेल व त्यातून शहराला सौंदर्य मिळेल. शिवाय, शहरात नागरिकांच्या आरोग्य व इतर सौख्याकरिता हरित वातावरण निर्माण होईल. वृक्ष उभारणीतून नैसर्गिक आणि शांत असे वातावरण निर्माण होईल. या अशा सुखकारी वातावरणामुळे नागरिकांना मानसिक तृप्ती व समाधान मिळेल.
 
मुंबईतील नागरी जंगले 

नागरी जंगलांकरिता मोठाल्या क्षेत्रांच्या जागा वृक्षांकरिता राखून ठेवलेल्या असतात. ही नागरी जंगले नागरिकांना चांगले स्वास्थ्य प्रदान करण्याच्या प्रक्रियेत मोलाचा हातभार लावतात. शिवाय, नैसर्गिक दृश्ये निर्माण करून नागरिकांना शांतता व समाधान देतात. मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे मिल्क कॉलनी अशी अनेक उद्याने महापालिकेने तयार केली आहेत. त्यातून नागरिकांना रोजच्या उठ-बस कामातून अशा नागरी उद्यानाला भेट दिल्यावर शांतता व सौख्याचा लाभ मिळू शकेल.
 
मुंबईतील वृक्षगणना
 
गेल्या चार वर्षांत मुंबई महापालिकेने वृक्षांची गणती पूर्ण केली. या गणतीमुळे मुंबईत एकूण सुमारे ३३.७ लाख वृक्ष असल्याचे समजते. या एकूण झाडांपैकी ४.२ लाख झाडे एकट्या आरे क्षेत्रातच आहेत. संजय गांधी उद्यानातील झाडे या गणनेत धरलेली नाहीत. या आधीची शिरगणती २००८ साली पूर्ण केली होती आणि त्यावेळी एकूण झाडे १९ लाख होती. गेल्या काही वर्षार्ंनंतरच्या काळात १४-१५ लाखांनी झाडांची संख्या वाढली आहे. या वृक्षांच्या वाढीला कारण म्हणजे, मुंबईत अनेक वृक्षलागवडीच्या मोहिमा महानगरपालिकेने हाती घेतल्या. शिवाय, विकासकामांमध्ये महापालिकेने असा नियम राबविला आहे की, विकासकांनीसुद्धा प्रकल्पाच्या आवारात झाडे उभारायला हवीत.
 
महानगरपालिकेने शिरगणती सुरू करण्याच्या आधी सर्व झाडांसाठी जीपीएस व जीआयएस प्रणाली प्रथमच सुरू केली होती. त्यामुळे प्रत्येक झाडाला एक वैयक्तिक असा नंबर मिळाला. ही झाडांची गणती २०१४ मध्ये सुरू झाली व ती महापालिकेने नेमलेल्या खासगी कंपनीकडून सुरू केली होती. या शिरगणतीच्या कामाला एकूण अडीच कोटींपेक्षा जास्त खर्च झाला आहे.या गणतीप्रमाणे बघितले, तर घाटकोपर भागात सर्वात जास्त म्हणजे २.९२ लाख झाडे असल्याचे समजते. त्याखालोखाल मालाडमध्ये २.८४ झाडे आढळून आली. भांडूपमध्ये २.५४ लाख, चेंबूरमध्ये २.१३ लाख, गोरेगावला १.८६ झाड, गोवंडी-मानखुर्दला १.६२ झाडांची गणना झाली. सगळ्यात कमी झाडे मरीन लाईन्स-झवेरी बझारला (५ हजार ७५६) झाडे मोजली, तर, मस्जिद-डोंगरी भागात ७ हजार ८१६ झाडांची गणना झाली.
 
मुंबई शहरात परदेशी व देशी अशी दोन्ही प्रकारची झाडे बघायला मिळतात. परंतु, देशी झाडांची संख्या आता जास्त होऊ घातली आहे. झाडे लागवडीच्या मोहिमांमध्ये हल्ली पालिकेच्या नवीन धोरणाप्रमाणे देशी झाडांची जास्तीत जास्त लागवड केली जाते. पूर्वी काही परदेशी झाडांची सुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. ती अशी - रेनफॉरेस्ट, गुलमोहर, पेल्लोफोरम इत्यादी. देशी झाडामध्ये तामन, तामारिन्ड, अशोक, नीम, एग्ले, पिंपळ, काजू, मेसुआ फेरा, बल्सामिक आणि क्युरान्ट इत्यादी. २००८च्या गणतीत १९ लाख झाडांपैकी आठ लाख झाडे देशी होती व इतर झाडे परदेशी होती. तर, २०१८च्या गणतीमध्ये २९.७५ लाख झाडांपैकी सुमारे १९ लाख झाडे देशी होती.परदेशी झाडांविषयी पालिका अधिकार्‍यांकडून कळते की, ही परदेशी झाडे ४० ते ५० वर्षांपूर्वीपासून मुंबईत आली आहेत आणि ती लवकर वाढणारी व सौंदर्य पुरविणारी आहेत. परंतु, ही झाडे मुंबईच्या मातीत जास्ती काळ तग धरत नाहीत. ही झाडे लवकर मरतात.

मुंबईतल्या मरणार्‍या झाडांच्या यादीत गुलमोहर व रेनफॉरेस्ट झाडांचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते.परंतु, प्रकल्पांसाठी मुंबईत गेल्या ११ वर्षार्ंत सुमारे ३९ हजार झाडे तोडली गेल्याचेही आकडेवारी सांगते.अमेरिकेत प्रत्येक एका नागरिकाच्या पाठी ६९९ झाडे, तर प्रत्येक भारतीयाच्या पाठी २८ झाडे असल्याचे २०२२ची आकडेवारी सांगते. प्रत्येक व्यक्तीपाठी किती झाडे, कोणत्या देशात लावली गेली, ते कंसात दर्शविले आहे.कॅनडा (१० हजार, १६३), अमेरिका (६९९), रशिया (४ हजार, ८५६), ऑस्ट्रेलिया (३ हजार, २६६), इंग्लंड (४७), फ्रान्स (२०३), ब्राझील (१ हजार, ४९४), चीन (१३०), श्रीलंका (११८), भारत (२८), बांगलादेश (६), पाकिस्तान (५) मुंबईत चार व्यक्तींमागे एक झाड आहे. दरवर्षी २५ हजार देशी झाडे पारंपरिक पद्धतीने लावली जातात, तर मागील दोन वर्षार्ंत मियावाकी पद्धतीने चार लाख झाडे लावली आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावणे आवश्यक आहे. तसेच, प्रत्येक वर्षी झाडे पडतात, मरतात वा तोडली जातात. त्याबद्दल दुप्पट झाडे लावणे अपेक्षित आहे.

काही झाडांविषयी विशेष माहिती
 
लाबुर्नूम झाडे तापमानातील फरकाला फार चांगली लढत देतात. संपूर्ण भारतात आढळणारा, परंतु सध्या दुमीर्र्ळ होत असलेला, मनमोहक, सर्वांना आकर्षित करणारा वृक्ष म्हणजे बहावा. ज्या वर्षी बहावा अधिक बहरतो, त्यावर्षी अधिक पाऊस होणार असल्याचे अनुमान काढले जाते. त्यामुळे, ‘बळीराजाला पावसाची पूर्वकल्पना देणारा’ म्हणूनही या झाडाची ओळख आहे. त्याचप्रमाणे ‘वैभवाची ओळख’ म्हणूनही तो ओळखला जातो. वाहतूक बेटावर पावसाचे आगमन होण्याचे संकेत ‘ल्युकोफायलम’ वनस्पतीला बहर आल्यावर संकेत मिळतात. परदेशी वृक्षांमुळे तापमानवाढ होत असल्याने अभ्यासकांनी मुंबईत देशी झाडांची लागवड करावी, अशी आग्रह मागणी केली जाते. म्हणूनच राज्यातील प्राचीन वृक्षांना संरक्षण देण्याचे ठरविले आहे. शहरामध्ये ५० वर्षांतील झाडांच्या जतनाचा निर्णय घेतला आहे व त्यांना हेरिटेज झाडांच्या यादीत सामील केले गेले आहे.


मुंबई शहरात वने बहरणार

उपनगरातील पाच भूखंडांची वृक्ष लागवडीसाठी निवड झाली असून, दीड लाख चौरस मीटर क्षेत्रफळात झाडांची लागवड होणार आहे.भूखंडांची निवड झालेली ठिकाणे पुढीलप्रमाणे - आनंदीबाई सुर्वे उद्यान, कुर्ला (२७ हजार चौ.मी.), चांदिवलीतील भूखंड (३३,४७४ चौ.मी.), वांद्रे किल्ला किल्ला (२६ हजार चौ.मी.), अण्णाभाऊ साठे उद्यान, कांदिवली (३८, हजार चौ.मी.), स्टेप गार्डन कांदिवली (१९ हजार चौ.मी.) तेव्हा, एकूणच काय मुंबईला पुन्हा एकदा हरितनगरी करण्यासाठी मुंबईकरांनीही आपापल्या स्तरावर का होईना, वृक्ष लागवड मोहिमेत खारीचा वाटा उचलायला हवा. ‘स्वच्छ मुंबई, हरित मुंबई’चे स्वप्न साकार करायचे असेल तर मुंबईकरांचे योगदानही या मोहिमेत अमूल्य ठरावे.
 
 
अच्युत राईलकर

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.