पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि संरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्नशील असलेली, तसेच पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचा ध्यास घेतलेली नगरची कन्या चैताली क्षीरसागर यांच्याविषयी...
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पर्यावरण शिक्षण आणि जनजागृतीचे काम करणारी एक तरूणी म्हणजे नगरची कन्या चैताली क्षीरसागर. नगरमध्ये दि. 30 नोव्हेंबर 1999 रोजी चैताली यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म आणि बालपण नेवाशाचे. शिक्षकी पेशातील कुटुंब असल्यामुळे त्यांची जडणघडणही तशीच झाली. त्यात वडिलांनी लावलेली वाचनाची सवय ही उत्तरायुष्यासाठी मोठी गुंतवणूक ठरली. वाचनाचा आणि नवनवीन ठिकाणी फिरण्याचा असे दोन्ही छंद आवडीने त्या आजवर जोपासत आहेत. आईवडिलांची नोकरी नेवास्यात असल्यामुळे चैताली यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. सुंदरबाई गांधी कन्या विद्यालयामध्ये त्यांनी प्राथमिकपासून ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
‘मुळा एज्युकेशन सोसायटी’च्या ज्ञानेश्वर महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण केल्यानंतर पुढे पदवी शिक्षणासाठी याच शिक्षण संस्थेच्या सोनई येथील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. ‘बीएससी केमिस्ट्री’ पूर्ण केलेल्या या मुलीने पुढे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयामधून 2022 साली पदव्युत्तर पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. सध्या त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून पर्यावरणशास्त्रामध्ये ‘पीएचडी’ करत आहेत.
विज्ञान क्षेत्रात शिक्षण झालेली ही मुलगी पर्यावरणामध्ये जनजागृतीचं इतकं मोठं काम उभारण्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली. ती घटना म्हणजे, ‘बीएससी’च्या पहिल्या वर्षी त्यांचे मार्गदर्शक शंकर लावरे यांच्यासमवेत त्यांनी ‘आविष्कार संशोधन वर्कशॉप’मध्ये सहभाग घेतला. यामध्ये त्यांनी जैविक किंवा सेंद्रिय कचर्यापासून द्रवरुप खताची निर्मिती करणारा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाला उत्तम प्रतिसाद मिळत गेला आणि अनेक पारितोषिकेही मिळाली. या प्रकल्पाला त्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळालाच, पण त्याचबरोबर राज्यस्तरीय तसेच देशपातळीवरही हा प्रकल्प द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. यानिमित्ताने वेगवेगळी राज्य तसेच अनेक ठिकाणी फिरण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच हा प्रकल्प म्हणजे त्यांच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’च ठरला. या प्रकल्पाच्या ‘पेटंट’साठी अर्ज करत, पुढे त्यांनी याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. ग्रामीण भागात येणारी नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या उत्पादनांना अनेकदा योग्य तो बाजारभाव मिळत नाही. तो मिळवून देण्याच्या दृष्टीने त्यांनी ‘लाक्शीकॉन बायोऑर्गनिक्स’ कंपनीची 2020 मध्ये स्थापना केली. यामध्ये नाचणी, बाजरी, ऑर्गेनिक धान्य अशा उत्पादनांच्या विक्रीला सुरूवात केली. तसेच या कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना प्रशिक्षितही करण्यात आले.
जवळजवळ तीन वर्षं कचर्यावर आणि पर्यावरणावर काम करण्याच्या अनुभवातून त्यांनी शोध घ्यायला सुरूवात केल्यानंतर सामान्यांमध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्येही जनजागृतीचा अभाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच पर्यावरणीय जनजागृतीचा ध्यास घेत, त्यांचे मार्गदर्शक डॉ. शंकर लावरे आणि त्यांनी स्वतः मिळून 2021 मध्ये 'MAESA’ म्हणजेच 'Maharashtra Envrionmental Sustainability Awareness Foundation'ची 2021 मध्ये स्थापना केली. या संस्थेचा पर्यावरण शिक्षण, संशोधन आणि संवर्धन या क्षेत्रांमध्ये काम करणे, हा उद्देश होता. शंकर लावरे हे या फाऊंडेशनचे संस्थापक- संचालक असून, चैताली या सह-संस्थापक आणि संचालकाचे काम पाहत आहेत. या संस्थेमार्फत आजवर 200हून अधिक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले असून, यामध्ये विविध प्रशिक्षणात्मक सत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण, परिषदा अशा गोष्टींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सातारा, वाई, नाशिक, पुणे, मुंबई अशा अनेक भागांमध्ये ‘मायेसा’ कार्यरत आहे. ‘मायेसा फाऊंडेशन’ अंतर्गत सध्या तीन मुख्य प्रकल्प सुरू असून, त्यामध्ये पहिला म्हणजे ग्रीन स्कुल प्रकल्प. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पर्यावरणाचे धडे देत विद्यार्थ्यांना पर्यावरणासंबंधी कृतिशील शिक्षण दिले जाते. 100हून अधिक शाळांमध्ये हे प्रबोधनाचे काम केले गेले असून, यामध्ये कचर्याच्या समस्या, हवामान बदल, तापमानवाढ, प्रदूषण अशा विषयांवर मार्गदर्शन केले गेले. तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीही हे कार्यक्रम घेतले जात आहेत.
या माध्यमातून पर्यावरण शिक्षणासाठी ऑनलाईन कोर्सेसची निर्मिती करण्यात आली असून, याचाही अनेक विद्यार्थी फायदा घेत आहेत. जवळजवळ 25 महाविद्यालयांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला असून, या कॉलेजेसमधून विविध सेमिनारच्या माध्यमातून जनजागृतीचे काम केले जाते. ‘बायोडायव्हर्सिटी डॉक्युमेंटेशन’ म्हणजेच जैवविविधतेच्या नोंदी करण्याबाबतही प्रशिक्षण दिले जाते. दुसरा महत्त्वपूर्ण प्रकल्प म्हणजे, ‘वॉटर क्वालिटी असेसमेंट प्रोजेक्ट.’ या माध्यमातून नद्या, पाणीसाठे, तलाव या जलस्रोेतांतील पाण्याची गुणवत्ता तपासण्याचे काम केले जाते. वाढती पाणी समस्या विचारात घेतानाच, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ही जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांना समाविष्ट केले जाते. या सर्व कामांचा यापुढे चांगल्या पद्धतीने विस्तार करण्याचा त्यांचा विचार असून पर्यावरण जनजागृतीचा ध्यास त्यांनी घेतला आहे. त्यांच्या या कामासठी त्यांना ‘पर्यावरण मित्र पुरस्कार’, ‘नारी शक्ती पुरस्कार’ अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक विकासाकडे यापुढे लक्ष देत तरूणांनी त्यादृष्टीने काम करायला हवे, असे मत त्या व्यक्त करतात. त्यांच्या या कार्यासाठी चैताली क्षीरसागर यांना दै. ‘मुंबई तरूण भारत’च्या शुभेच्छा!
लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.