शुद्ध नेमस्त भाषा आणि कृती

    01-May-2024   
Total Views |
ram
 
एकदा बोलण्या-चालण्यातलं चांगलं समजलं म्हणजे विवेक प्रत्ययास आला की, ते शुद्ध नियमितपणे आचरणात आणावे. यासाठी श्लोकाच्या शेवटच्या ओळीत स्वामी सांगताहेत की, लोकहो! शुद्ध आचरणाने वागणे तुम्ही सोडू नका. त्याची नियमितपणे अंमलबजावणी करा, त्यातच राहा. जानकीनायकाचा म्हणजे रामाचा विवेक तुम्ही अभ्यासला, तर शुद्ध नेमस्त वागण्याचा अर्थ उलगडेल.
 
मचरित्रात श्रीरामाच्या अंगी असलेल्या अनेक गुणांचे वर्णन आहे. रामाच्या विवेकाधिष्ठित विचारातून व प्रत्येक कृतीतून एक नवा आदर्श समोर येतो. त्यामुळे राम हा सद्गुणांचे भांडार आहे, असे म्हणावे लागते. शौर्य आणि पराक्रमाच्या बाबतीत रामाचा एकच बाण पुरेसा असतो. म्हणून, तो एकबाणी, रामाचे पत्नीवर एकनिष्ठ प्रेम म्हणून त्याची ओळख पत्नीच्या नावावरून ‘सीतापती’ अथवा ‘जानकीनायक’ अशी आहे. रामाचा विवेक आचरणात आणला, तर लोकांना निश्चितपणे आपल्या उद्धाराचा मार्ग सापडेल, असे स्वामींनी मागील श्लोक क्रमांक १३१ मध्ये उपपत्तीच्या स्वरूपात मांडले आहे. असा हा सैद्धांतिक उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी त्याचे उपयोजन समजले पाहिजे. उपपत्तीमागील विवेक विचारांचा विनियोग कसा करावा, हे आता स्वामी पुढील श्लोकात सांगत आहेत-
 
विचारूनि बोले विवंचूनि चालें।
तयाचेनि संतप्त ते ही निवाले।
बरें शोधिल्यावीण बोलों नको हो।
जनीं चालणे शुध नेमस्त राहो ॥१३२॥
 
परमेश्वराने भाषा हे विचार प्रकटीकरणाचे अप्रतिम साधन मानवाच्या हाती दिले आहे. आपल्या मनातील विचार आणि भावना दुसर्‍यापर्यंत पोहोचवायच्या असतील, तर ते आपण शब्दांद्वारे भाषेच्या माध्यमातून प्रकट करतो. त्यामुळे भाषेला, शब्दांना माणसाच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. भाषा ही अंतःकरणातून येत असल्याने भाषेवरून माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होते. मृदू स्वभावाच्या माणसाची भाषा साधी सोपी, अहंकारविरहित असल्याने ती दुसर्‍याचे अंतःकरण सहसा दुखावत नाही. तसेच काही लोकांचा स्वभाव गर्विष्ट, उर्मट असतो. अशावेळी त्यांची भाषा, स्वभाव वैशिष्ट्येेे दाखवणारी मग्रूर अशी आढळते. आढ्यताखोर माणसाचा समज असा असतो की, गर्विष्टपणात आपले मोठेपण सिद्ध होऊन एकंदरीत समाजात, लोकांत आपला रूबाब वाढेल. पण, तसे घडत नाही. लोक अशा गर्विष्ठ माणसाला टाळण्याचा प्रयत्न करतात. आपल्या भाषेच्या अवगुणांनी ही माणसे वेगळी पडतात. यासाठी स्वामींनी या श्लोकाच्या पहिल्या ओळीत सांगून टाकले की, ‘विचारूनि बोले.’ याचा अर्थ आपण अत्यंत विचारपूर्वक शब्दांचा वापर केला पाहिजे. विवेकी पुरुष हे चांगले जाणतो. कारण, मुखातून बाहेर पडलेला शब्द हा धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे असतो.
 
एकदा तो बाहेर पडला, तर त्याला आपल्याला परत माघारी घेता येत नाही. अहंकाराने, तुच्छतेने, मत्सराने उच्चारलेले विखारी शब्द समोरच्या माणसाच्या अंतःकरणाला जाऊन भिडतात. क्वचित प्रसंगी त्याला घायाळ करतात. शस्त्राघाताने शरीराला झालेली जखम कालांतराने भरून येते. त्वचेवरील जखम बरी करून ती त्वचा मूळ स्वरूपाकडे आणण्याचा नैसर्गिक प्रयत्न असतो. परंतु, शब्दाने दुखावले गेलेले मन, तो सहसा विसरत नाही. हा प्रत्येकाचा नित्याचा अनुभव आहे. माझ्या पूर्वायुष्यात सुमारे ५० वर्षांपूर्वी शाब्दिक आघाताने झालेला मानसिक त्रास मी विसरलो नाही, तसा माझ्या तोंडून पूर्वी निघून गेलेला कडवट वाग्बाण दुसरेही विसरले नसतील. तेव्हा ‘विचार करून मगच बोलावे’ हा समर्थोपदेश मोलाचा आहे. अविवेकी बोलण्यातून अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. असे वादविवादाचे प्रसंग टाळायला हवेत. मागे श्लोक १०९ मध्ये स्वामी सांगतात की ‘जनीं वादवेवाद सोडूनि द्यावा’, ते शाब्दिक जखमा टाळण्यासाठीच! दासबोधातही समास १४.१ मध्ये निःस्पृहाची शिकवण सांगताना स्वामींनी म्हटले आहे की, ‘दुर्जनासी तं डो नये’ ‘भांडविता भांडो नये’, ‘अति वाद करू नये.’ समर्थ महंताला आपल्या कार्यासाठी मठावर पाठविताना जो उपदेश करीत, तो त्यांचे शिष्य गिरिधरस्वामी यांनी स्वानुभवाने लिहून ठेवला आहे. त्यातील या ओळी पाहा-
 
निरोपिती कोठे वाद घालू नको।
भक्ति सोडू नको, राघवाची॥
 
समर्थांच्या मते, सर्व प्रकारचे वादविवाद अहंकारातून निर्माण होतात. तेव्हा अहंकाराला जिंकण्यासाठी विवेकाचा वापर करावा. ‘विवेके अहंभाव याते जिणावे’ असे समर्थांनी श्लोक क्रमांक ११० मध्ये सुचविले आहे. बोलण्याप्रमाणे आपल्या कृतीवरही बरेच काही अवलंबून असते. प्रत्येक परिणामांचा साधकबाधक विचार करून तारतम्य बुद्धीने कृती केली पाहिजे. रागाच्या भरात अथवा भावनेच्या आहारी जाऊन केलेली अविवेकी कृती माणसाचे नुकसान करू शकते. कारण, त्या कृतीत बुद्धीवर संमोहाने ताबा मिळवला असल्याने योग्य-अयोग्य किंवा न्याय्य- अन्याय्य याचे भान राहत नाही. त्या कृतीत फक्त अहंकार आणि स्वार्थ असू शकतो. अविवेकी कृतीतून स्वार्थी इच्छा, क्रोध आणि लोभ हे वाढीस लागतात. भगवद्गीतेत तर म्हटले आहे की, काम (इच्छा), क्रोध, लोभ ही आत्म्याचा नाश करणारी नरकाची दारे आहेत. माणसाने त्यांचा त्याग करावा (गीता श्लोक १६.२१) हा उपदेश आध्यात्मिक स्वरूपाचा वाटला तरी त्याचे प्रापंचिक महत्त्व ओळखून स्वामींनी या श्लोकात सांगितले आहे की, ‘विवंचूनि चाले’ विवंचूनि याचा अर्थ विवेक सांभाळून, त्या कृतीच्या परिणामांचा साधकबाधक विचार करून मगच केलेली कृती. हे पथ्य आपण पाळले नाही, तर भविष्यात पश्चात्तापाची वेळ येते. चित्त शांत झाल्यावर आपण असे कसे वागलो, याचे नवल वाटते. अशी वेळ येऊ नये म्हणून विवेक सांभाळून कृती केली पाहिजे.
 
माणसाच्या बोलण्या-चालण्यावरून त्याच्या अंतःकरणाची परीक्षा करता येते. त्यानुसार, विवेक सांभाळून वागणार्‍या माणसाचे बोलणे आणि त्याने केलेली कृती विचारपूर्वक असते. अशा माणसाच्या आचरणात एक सुसंगती असते. त्याच्या वेगवेगळ्या वेळी बोलण्यात आणि कृतीत कधीही विरोध आढळत नाही, धरसोड वृत्ती दिसून येत नाही. कारण, विवेकामुळे त्याचे चित्त सदैव शांत असते. शांत चित्ताने तो नेहमी प्रसन्नचित्त असतो. त्याच्या ठिकाणी सकारात्मकता असते. अशा विवेकी माणसाच्या सहवासात संसार दुःखाने पोळलेली त्रस्त निराश माणसे आली, तर त्यांचेही चित्त शांत होऊ लागते. विचारी माणसाच्या सहवासात स्वार्थ आणि अहंकार तात्पुरते दूर गेल्याने मनातील वादळे कमी होतात. हा इतरांचा फायदा होऊन विचार करून बोलण्या-वागण्याची त्यांना गोडी वाटते. हा सारा निरीक्षणाचा, अभ्यासाचा भाग असल्याने चांगले शोधून नंतरच बोलावे. चांगले शोधल्याशिवाय बोलू नये. (बरें शोधिल्यावीण बोलों नको हो) एकदा बोलण्या-चालण्यातलं चांगलं समजलं म्हणजे विवेक प्रत्ययास आला की, ते शुद्ध नियमितपणे आचरणात आणावे. यासाठी श्लोकाच्या शेवटच्या ओळीत स्वामी सांगताहेत की, लोकहो! शुद्ध आचरणाने वागणे तुम्ही सोडू नका. त्याची नियमितपणे अंमलबजावणी करा, त्यातच राहा. जानकीनायकाचा म्हणजे रामाचा विवेक तुम्ही अभ्यासला, तर शुद्ध नेमस्त वागण्याचा अर्थ उलगडेल व तुम्ही तो कधी सोडणार नाही.
७७३८७७८३२२

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..