नाशिक : नाशिक लोकसभेसाठी महायूतीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांना नाशिकचे तिकीट देण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेत कोणाला उमेदवारी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, आता याठिकाणी हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
बुधवार, १ मे रोजी शिवसेनेने आपल्या अधिकृत 'X' अकाऊंवर हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली. दुसरीकडे, महाविकास आघाडीने उबाठा गटाचे राजाभाऊ वाजे यांना नाशिकमध्ये उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेना विरुद्ध उबाठा गटात लढत होणार आहे.
नाशिक लोकसभेसाठी महायूतीच्या अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती. यामध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नावाचाही समावेश होता. याशिवाय दोन दिवसांपूर्वी नाशिक लोकसभेसाठी स्वामी शांतिगिरी महाराजांनीही शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
मात्र, आता नाशिकच्या जागेचा प्रश्न मिटला असून याठिकाणी हेमंत गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. हेमंत गोडसे २०१४ पासून नाशिकमध्ये खासदार आहे. त्यांना आता पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. दरम्यान, याठिकाणी शिवसेना आणि उबाठा यांच्यापैकी कोण आपला गड राखतो हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.