मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालघरच्या जागेबाबत महत्वपूर्ण खुलासा केला आहे. पालघरच्या जागेबाबत भाजप निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी बुधवारी नाशिक येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री छगन भुजबळदेखील उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "पालघरच्या जागेबाबत भाजप निर्णय घेणार आहे. शिंदेंसोबत १३ खासदार आले होते पण ते आता १६ जागा लढत आहेत. राष्ट्रवादी ६ जागा लढत आहे. त्यामुळे काही जागा कमीजास्त झालेल्या आहेत. दरम्यान, पालघरसुद्धा एकमताने आमच्याकडे येणार आहे.
"ही काही साधी निवडणूक नसून २२ लाख मतदारांची निवडणूक आहे. जनतेला मोदीजींना मत द्यायचं आहे. त्यामुळे महायूतीने कोणताही उमेदवार दिला तरी शेवटी मोदीजींनाच मत जाणार आहे. महायूतीमध्ये सर्वांनाच तडजोड करावी लागते," असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राज ठाकरेंच्या सभांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "आम्ही राज ठाकरेंच्या सभा नियोजित केलेल्या आहेत. नाशिकमध्येही त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे, संभाजीनगर आणि ज्याठिकाणी राज ठाकरेंचे युनिट आहे त्याठिकाणी ते सभा घेणार आहेत," अशी माहिती बावनकुळेंनी दिली.