मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि त्यांच्या केंद्रीय समितीच्या प्रतिनिधी वासुकी उमानाथ (Vasuka Umanath) यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संघाबद्दल निराधार खोटे पसरवण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी केला होता. त्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) आणि वासुकी उमानाथ यांच्या विरोधात अल्टिमेटम जारी केला आहे. त्यांनी माफी न मागितल्यास कायदेशीर कारवाई करू, असा इशारा रा.स्व.संघ उत्तर तमिळनाडूचे पी. नरसिंहन यांनी एका निवेदनातून सोमवारी दिला.
वासुकी उमानाथ यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संघाबद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट केला होता. 'नवी दिल्ली येथे ३.५ लाख चौरस फुटांवर ४५०० कोटी खर्चून संघाचे कार्यालय बांधले जात आहे. बजेट ऑडिट नाही, आयटी रिटर्न नाही, रेकॉर्ड नाही; काहीतरी रहस्यमय घडत आहे,' असे त्यात लिहिले होते. याची सत्यता न तपासता तामिळनाडूच्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीने (मार्क्सवादी) वासुकी यांच्या विधानाचे उघडपणे समर्थन केले. त्यामुळे त्यांच्याविरोधात संभाव्य मानहानीच्या खटल्याचा इशारा देणारे अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटल्यानुसार, समाजविरोधी लोक संघाबद्दल अनेक अफवा आणि अपशब्द पसरवत आहेत. संघ अशा अपशब्दांना प्रतिसाद देत नाही, या वस्तुस्थितीचा ते फायदा घेतात आणि द्वेषपूर्ण प्रचार करत राहतात. कोणत्याही पुराव्याशिवाय पसरवल्या जात असलेल्या खोट्या आरोपाचा संघ तीव्र निषेध करतो. त्यांनी माफी न मागितल्यास रा.स्व.संघ न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करेल, असा इशारा देत आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केंद्र सरकारच्या अनेक उपक्रमांबद्दल चुकीची माहिती प्रसारित करण्याचा एकच मनाचा अजेंडा सातत्याने राबवल्याचे स्पष्ट दिसत आहे.