मधमाशी संवर्धनाद्वारे ‘नाही रे’ गटातील समाजबांधवांचे आर्थिक सक्षमीकरण करणारे, पुण्यातील अमित अभय गोडसे. त्यांच्या विचारकार्याचा घेतलेला, हा मागोवा...
'हा वेडा झाला आहे. आयटी क्षेत्रातली चांगली नोकरी सोडून, हा मधमाशांची पोळी शोधत फिरतो? याचे लक्षण ठीक नाही. अरेरे! याचे बिचारे आईबाप.’ लोक अमित गोडसे यांच्याबाबत काही वर्षांपूर्वी म्हणायची. अमित अभय गोडसे. मॅकेनिकल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण घेतलेला आणि आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी असणारा तरूण. अमित यांचा सामाजिक अभ्यास चांगलाच आहे. एका सुस्थापित कुटुंबातील होतकरू तरुणानेे चांगली नोकरी, भवितव्य सोडून मधाचे पोळे वाचवणे, हे काम करणे म्हणजे समाजासाठी हे अतार्किकच होते. मात्र, अमित त्यांच्या विचारकार्यापासून तसूभरही ढळले नाहीत. आयटी क्षेत्रातली नोकरी सोडल्यानंतर, पूर्ण बचत केलेले पैसे त्यांनी मधमाशांचे संवर्धन कसे करावे? पुण्यातील मधमाशांच्या पोळ्याची हानी होऊ नये, यासाठीच्या शिक्षणामध्ये आणि कार्यावर खर्च केली. हे का? तर अमित पुण्याला ज्या सोसायटीत राहायचे, तिथे मधमाशांनी पोळे तयार केले. मधमाशांच्या भीतीमुळे सोसायटीने पेस्ट कंट्रोल केले. पेस्ट कंट्रोलने पोळे विषारी झाले आणि मधमाशा मरून गेल्या. तेव्हा अमित यांच्या मनात प्रश्न आला की, लोकांना मध हवे; मात्र मधमाशा नकोत?
योगायोग असा की, अमित दुसर्याच आठवड्यात मित्रासोबत त्याच्या मालेगावच्या घरी गेले. तिथे शेती होती आणि मधमाशांसाठींची पेटीही होती. मित्राच्या बाबांशी बोलताना, अमित यांना कळले की, निसर्गात जे परागीभवन होते. त्यामध्ये मधमाशा ७० ते ७२ टक्के भूमिका निभावतात. वृक्षराजी, फळ-फुले आणि एकंदर निसर्ग वाचवण्यासाठी मधमाशा वाचवणे गरजेचे आहे. मधमाशा वाचवण्यासाठी काही तरी केलेच पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात घर करून राहिला. मग त्यांनी पुण्यातील ’केंद्रीय मधुमक्खी पालन केंद्रा’तून एक महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स केला. कोर्सदरम्यान त्यांना मधमाशा, मध आणि त्यातून होणारे निसर्ग संवर्धन तसेच वनवासी समाजाची आर्थिकता याबाबत माहिती मिळाली. जंगलात राहणार्या बांधवाच्या आर्थिक क्षमतेसाठी मधमाशी संवर्धन आणि मधपोळ्यांचा योग्य वापर त्यांना शिकवला पाहिजे. निदान आपण जिथे राहतो, त्या शहरातील मधपोळी संवर्धन, मधमाशा संवर्धन केलेच पाहिजे. असा त्यांनी ठाम विचार केला. हे काम करण्यासाठीस, त्यांनी नोकरी सोडली. २०१७ साली त्यांनी ’बी बास्केट’ नावाची स्टार्टअप कंपनी सुरू केली. सुरुवातीला मधमाशा संवर्धनाची गरज, मधपोळे आणि त्यांची निर्मिती त्यातून समाजाची आर्थिक मिळकत याबाबत ते जनजागृती करू लागले. आजपर्यंत ’बी बास्केट’ने पुण्यातील १२ हजारांच्या वर मधपोळ्यांना वाचवले आहे, त्यातून मधमाशा बाहेर काढून, त्यांना दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. यातून निसर्गाचे संवर्धन होत आहे.
लोक पोळे हटवण्यासाठी, पेस्ट कंट्रोल करतात, त्यात मधमाशा मरतात, पोळे विषारी होते आणि मधही विषारी होते. लोक पेस्ट कंट्रोलसाठी जे पैसे देतात, त्याच पैशात ’बी बास्केट’ ते पोळे वाचवतात आणि याच कामात शहरातील काही तरूण सहभागी झाले असून, त्यांना रोजगारही मिळाला आहे.ध्येयवेड्या अमित यांच्या जीवनाचा मागोवा घेतला. अमितचे वडील अभय गोडसे हे सरकारी क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत, तर आई गृहिणी. मात्र, तिला निसर्ग संवर्धनाची आवड. अत्यंत सुसंस्कारीत आणि देशाभिमानी कुटुंब. अमित यांचे आजोबा पांडुरंग आणि वडील अभय यांनी आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगला होता. गोडसे कुटुंब रा. स्व. संघांशी संबंधित. पद्मश्री निवेदिता भिडे या अमित यांच्या आत्या.गोडसे कुटुंब मूळचे अमरावतीचे. पण, स्थायिक झाले छत्तीसगढ येथे. अमित लहाणपणापासूनच अभ्यासात हुशार. निसर्गाबद्दल त्यांना खूप प्रेम आणि जिज्ञासा होती. ते दुसरीला असताना, एक घटना घडली. ’महात्मा का हत्यारा गोडसे गोडसे गोडसे’ इयत्ता दुसरीत शिकत असणार्या, अमित यांना त्यांच्याच वर्गातील मुलांनी चिडवले होते. आपल्या आडनावाबद्दल अमित यांना कुतूहल निर्माण झाले, त्यांनी अभ्यास केला. १९४८ सालाची आणि त्यापूर्वीची परिस्थिती अभ्यासली. गांधीजींच्या हत्येनंतर अमितच्या आईच्या आई-बाबांची कोल्हापूरची शाळा जाळण्यात आली.
गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या शाळेच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्यासाठी, कर्जाने पैसे घेतले होते. ते पैसेही शाळेसोबत जळाले. काही उरले नाही, म्हणून ते रायपूरला निघून गेले. दुसरीकडे, अमित यांचे आजोबा अभय गोडसे हे जिथे कामाला होते, तिथून त्यांना दृष्टिदोषाचे कारण सांगून काढून टाकण्यात आले आणि पुढे त्यांना आडनावावरून कुठेही नोकरी मिळाली नाही. इतकेच काय? आडनाव गोडसे म्हणून घरातील मुलींचे विवाहही जमत नव्हते. हे सगळे जाणून घेतल्यानंतर, अमित यांना वाटू लागले की, प्रत्येकाची आपली विचारधारा असते, ध्येय असते. आपले ध्येय जातपातविरहित मातृभूच्या कल्याणाचे आहे. ज्यातून देश आणि समाजाचे भले होईल तेच करायचे. सत्याला सत्य अन्यायाला अन्यायच म्हणायचे. जे योग्य वाटेल, ते निर्भयपणे करायचे. त्यामुळेच उच्चशिक्षित तरूण मधमाशांची पोळी काढण्याचे काम करतो, असे म्हणून अनेकांनी त्यांची निंदा केली, उपहास केला तरीसुद्धा अमित आपल्या ध्येयापासून ढळले नाहीत. यापुढेही अमित यांना मधमाशी संवर्धनातून निसर्ग संवर्धन करायचे. ”मधासंदर्भातील व्यवसायातून वनवासी बांधवांचे आर्थिक सक्षम करायचे आहे. ही सुद्धा माझ्या लाडक्या देशाची सेवाच आहे,” असे अमित म्हणतात. अमित सारखे ध्येयवेडे आणि कार्यशील तरूणच या देशाची खरी संपत्ती आहे, हे नक्की.