मुंबई (विशेष प्रतिनिधी) : दापोली तालुक्यातील आंजर्ले किनाऱ्यावर डाॅल्फिनच्या (anjarle dolphin) वासराचे (पिल्लू) मृत शरीर रविवार दि. ७ एप्रिल रोजी वाहून आल्याचे आढळून आले. या वासराच्या तोंडाला प्लास्टिकचे रीळ अडकलेले होते (anjarle dolphin). शिवाय त्याच्या शरीरावर जाळ्यामध्ये गुरफटल्याच्या खुणा देखील होत्या. शवविच्छेदनामध्ये त्याच्या फुफ्फुसामध्ये पाणी साठल्याचे आढळून आले. त्यामुळे जाळ्यात अडकून बुडल्याने या वासराचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (anjarle dolphin)
सध्या आंजर्ले किनाऱ्यावर कासव महोत्सवाची रेलचेल सुरू आहे. अशातच महोत्सवात सहभागी झालेल्या वन्यजीव निरीक्षक मानसी वर्दे यांना रविवारी पहाटे किनाऱ्यावर डाॅल्फिनचे मृत शरीर आढळून आले. या डाॅल्फिनच्या चोचीसारख्या तोंडामध्ये प्लास्टिकचे रीळ अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी यासंबंधीची माहिती लागलीच वन विभागाला कळवली. दापोली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मृत डाॅल्फिनचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनामध्ये आम्हाला डाॅल्फिनच्या फुफ्फुसामध्ये पाणी साठल्याचे आढळले आणि त्याच्या फुफ्फुसावर अनेक छिद्र देखील पडली होती, अशी माहिती वनपाल सावंत यांनी दिली.
महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रामध्ये 'इंडियन ओशन हम्पबॅक डाॅल्फिन' ही प्रजाती प्रामुख्याने आढळते. त्यांच्या पिल्लांना वासरु असे म्हटले जाते. आंजर्ले किनाऱ्यावर वाहून आलेले मृत डाॅल्फिनचे शरीर हे एक दोन महिन्यांचे डाॅल्फिनच्या वासराचे शरीर असल्याचा अंदाज सागरी जीवशास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. त्याच्या तोंडात अडकलेले प्लास्टिकचे रीळ हे निरीक्षणाअंती मासे पकडण्याच्या जाळीचे असल्याचे समोर आले आहे. तसेच डाॅल्फिनच्या शरीरावर जाळ्यामध्ये गुरफटल्याच्या खुणा देखील दिसून आल्या आहेत. डाॅल्फिन हे सस्तन प्राणी असल्याने त्यांना हवेतून श्वास घ्यावा लागतो. परिणामी जाळ्यात अडकून त्यामध्ये गुरफटल्याने पाण्याता बुडून या डाॅल्फिनच्या मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.